Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 15 February 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १५ फेब्रुवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
वैज्ञानिकांनी
`फाईव्ह जी` जोडणी आणि कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्याची
गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं वैज्ञानिक आणि
औद्योगिक संशोधन परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. जागतिक दर्जाची उत्पादनं विकसित करण्यासाठी
पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालण्याची आवश्यकता असल्याचं ते यावेळी
म्हणाले. नावीऩ्यपूर्ण प्रयोगांची आवश्यकताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी
नमुद केली.
****
अंमली पदार्थांच्या तस्करीवर
नियंत्रण आणण्यासाठी बिमस्टेक राष्ट्रांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत असं आवाहन
भारतानं केलं आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासंबंधीच्या बिमस्टेक राष्ट्रांच्या
संमेलनात गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी काल नवी दिल्लीत यासंदर्भांतले भारताचे
प्रयत्न आणि उपाययोजनांविषयी माहिती दिली. या तस्करीला आळा घालण्यासाठी संबंधित राष्ट्रांनी आपले अनुभव आणि
गुप्त माहितीची देवाण घेवाण करणं आवश्यक आहे, असंही केंद्रीय गृहराज्यमंत्री यावेळी
म्हणाले.
****
दूरसंचार क्षेत्रातल्या कंपन्यांनी आपली प्रलंबित
देणी लवकरात लवकर फेडण्याकरता निधीची व्यवस्था करायला हवी असं मत भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी व्यक्त केलं आहे. दूरसंचार
कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला १ लाख ४७ हजार कोटी रुपयांचा महसूल द्यावा असे निर्देश
सर्वोच्च न्यायालयानं दिले असूनही या कंपन्यांनी त्यांचं पालन केलेलं नाही, त्यामुळे
या कंपन्यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानाननेची कारवाई का करू नये अशी विचारणा
न्यायालयानं केली आहे. त्यासंदर्भात बातमीदारांनी विचारलेल्या प्रश्नाला रजनीश कुमार काल मुंबईत उत्तर देत होते. कोणत्याही दूरसंचार कंपनीने स्टेट बँकेकडे कर्जासंबंधी
संपर्क साधलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण
मंडळ, `सीबीएसई`च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या आहेत.
दहावीची परीक्षा २० मार्च पर्यंत असेल तर बारावीची परीक्षा ३० मार्चला संपेल. केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला यावर्षी १८ लाख ८९ हजार विद्यार्थी
बसत असून १२ लाखांहून अधिक विद्यार्थी बारावीची
परीक्षा देत आहेत.
****
परवडणाऱ्या घरांची निर्मिती
ही काळाची गरज असून `प्रधानमंत्री आवास योजना` या दिशेनं झपाट्यानं वाटचाल करत असल्याचं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत डॉ. सुरेश हावरे यांच्या
`नॅनो हाउसिंग` या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. घरांचे दर ठरवताना एखाद्या
शहरातल्या लोकांची घर विकत घेण्याची क्षमताही लक्षात घेण्याची गरज असल्याचं गडकरी यांनी
यावेळी म्हटलं.
****
विमुक्त जाती, भटक्या
जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी अनुदानात आता सोळा
इतर शुल्कांचा समावेश करण्यात आला आहे. अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित
महाविद्यालयांतल्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा
हे अनुदान मिळणार असल्याची माहिती बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी
दिली आहे.
****
केंद्र शासनाकडे प्रलंबित
असलेल्या राज्यातल्या विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करणाऱ्या राज्य संसदीय समन्वय समितीच्या
अध्यक्षपदावर खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहचावं आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी
प्रयत्नशील राहावं, असं आवाहन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद
इथं मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. निवडणुकांपेक्षा पक्ष बांधणी आणि नागरिकांच्या
समस्या महत्वाच्या असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. आगामी औरंगाबाद महापालिका
निवडणुकीनिमित्त ठाकरे हे तीन दिवसांपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत.
****
बीड जिल्ह्याच्या पालवण इथल्या सह्याद्री देवराई
प्रकल्पावर काल पहिल्या वृक्ष संमेलनाचा समारोप झाला. उपचार घेऊन बरा झालेल्या गरुडाला
सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते मुक्त करुन या संमेलनाचा समारोप करण्यात आला.
या संमेलनात अकरा ठराव संमत करण्यात आले. देवराईचं संवर्धन, वडाच्या तोडणीस बंदी, वड तोडीचं उल्लंघन
करणाऱ्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा, वृक्षारोपण करताना भौगोलिक रचनेनुसार
स्थानिक वृक्षांचा समावेश करावा, आदी ठरावांचा यात समावेश आहे.
*****
***
No comments:
Post a Comment