आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ फेब्रुवारी
२०२० सकाळी ११.०० वाजता
****
निर्भया सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणी
चौघा दोषींच्या फाशीच्या शिक्षेला मिळालेल्या स्थगितीला आव्हान देण्यासाठी केंद्र सरकारनं
दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे.
शनिवारी आणि रविवारी विशेष सुनावणी घेतल्यानंतर, न्यायमूर्ती
सुरेश कुमार कैट यांनी या याचिकेवरचा आदेश, दोन फेब्रुवारीला राखून ठेवला होता.
****
बँकांच्या ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्याच्या
दृष्टीनं रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या बँकांमधल्या ठेवींच्या विमा संरक्षणाची सीमा वाढवण्याचा
निर्णय कालपासून लागू झाला. आतापर्यंत, विमा संरक्षित बँकांमध्ये प्रत्येक ठेवीदाराच्या
एक लाख रुपयांच्या ठेवीला असलेल्या संरक्षणाची व्याप्ती वाढवण्यात आली असून, आता पाच
लाखांच्या ठेवीला हे संरक्षण मिळणार आहे.
****
पंढरपूर इथल्या विठ्ठल मंदिरात आज फुलांची सजावट करण्यात
आली आहे. माघी यात्रा आणि जया एकादशी निमित्त पंढरपूर इथे भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पर्यावरण रक्षणासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशानं
उस्मानाबाद इथे आज सकाळी सायकल फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या
नेतृत्वाखाली ही फेरी काढण्यात आली. यावेळी,वृक्ष लागवड,वृक्ष संगोपन आणि सायकलचा वापर
याबाबत जिल्हाधिका-यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
****
वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथे महिला प्राध्यापकाच्या
अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या घटना ताजी असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातही अशीच घटना
घडली असल्याचं उघडकीला आलं आहे. सिल्लोड तालुक्यातल्या अंधारी या गावात रविवारी रात्री
घडलेल्या घटनेत महिला सुमारे पंचाण्णव टक्के भाजली असून तिच्यावर औरंगाबाद इथे उपचार
सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय
क्रिकेट सामन्यात भारतानं ४५ षटकांत तीन बाद दोनशे एक्क्याण्णव धावा केल्या आहेत. अखेरचं
वृत्त हाती आलं तेव्हा श्रेयय अय्यर एकशे तीन
तर के एल राहूल ६२ धावांवर खेळत होते.
****
No comments:
Post a Comment