Wednesday, 5 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 05.02.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 05 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
अयोध्येत राम मंदीर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र स्वायत्त विश्वस्त मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदीर उभारण्यासह इतर सर्व संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी हे विश्वस्त मंडळ स्वायत्त असेल. मंदीर उभारण्यासाठी रामजन्मभूमीचा सदुसष्ट एकर क्षेत्राचा संपूर्ण भूखंड या विश्वस्त मंडळाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. संपूर्ण देशानं परिपक्व आणि संयमी भूमिकेतून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचा स्वीकार केल्याबद्दल पंतप्रधानांनी देशवासियांचं अभिनंदन केलं.
अयोध्येत बाबरी मशीद उभारण्यासाठी पाच एकर जमीन देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने भूखंड देण्याचा निर्णय घेतला असून, उत्तरप्रदेश सरकारनेही या निर्णयाला सहमती दर्शवल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
सोशल मीडिया खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासंदर्भात लोकसभेत सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केली. आज प्रश्नोत्तराच्या तासात, काही खासदारांनी पोर्नोग्राफी संकेतस्थळांवर प्रतिबंधांसंदर्भात मांडलेल्या प्रश्नाचं कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून उत्तर घेताना, लोकसभाध्यक्षांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला, कायदेमंत्र्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत, सदनात चर्चा घेण्यास संमती असल्याचं सांगितलं. आतापर्यंत नऊ हजारावर पोर्नोग्राफी संकेतस्थळांवर बंदी घातल्याचं कायदेमंत्र्यांनी सांगितलं.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा - सीएए आणि त्यासंदर्भातले इतर विषय हे भारताचे अंतर्गत विषय आहेत. त्यात परकीय नागरिकांनी हस्तक्षेप करू नये, यासाठी एकमतानं एक ठराव संमत करावा, असं मत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात व्यक्त केलं. सभापती तसंच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी, देसाई यांच्या मताशी पूर्ण सहमती व्यक्त करत, भारताच्या या अंतर्गत मुद्यात इतर राष्ट्रांनी व्यक्त होण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं.
****
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवही- एनसीआर-चा सगळ्या धर्मांच्या लोकांवर परिणाम होणार असून, राज्यात एनसीआर लागू करू देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध नाही, मात्र राज्यात एनआरसी लागू करण्याला परवानगी देणार नाही, असं ठाकरे यांनी सांगितलं. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यापूर्वी केंद्र सरकारनं राज्य सरकारला विश्वासात घेतलं नसल्याची टीका ठाकरे यांनी यावेळी केली.
****
वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर करण्याबाबत महाराष्ट्र सरकार आगामी काळात प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक नुकतीच मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. महानगरांमधल्या इमारतींमध्ये पाण्याचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना विकासकांना दिल्या जातील, असंही पाटील यांनी सांगितलं.
****
वृत्तपत्र विक्रेता आणि वितरकांच्या विविध मागण्यांचं निवेदन आज राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना देण्यात आलं. नांदेड इथे आज महाराष्ट्र राज्य वृतपत्र विक्रेता - वितरक  संघटनेच्या शिष्टमंडळानं देसाई यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. राज्यातल्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचं आश्वासन देसाई यांनी यावेळी दिलं.
****
जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर शहराच्या बाहेर शाल्टंग भागात आज काही अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका जवानाला वीरमरण प्राप्त झालं. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन अतिरेकीही ठार झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या बळावर निर्धारित षटकांत चार बाद तीनशे ४७ धावा करत, यजमान संघासमोर तीनशे ४८ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलँडच्या अकराव्या षटकात बिनबाद छपन्न धावा झाल्या होत्या.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...