Wednesday, 5 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 04.02.2020 TIME 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक०४ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राजकीय नेत्यांचं दूरध्वनीवरचं संभाषण ध्वनीमुद्रित करण्याच्या प्रकरणाचं तथ्य तपासण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
** अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आणि विम्याचे दावे एका आठवड्यात निकाली काढण्याचे कृषी मंत्र्याचे निर्देश
** शासकीय वसतीगृहांसाठीही प्रत्येक जिल्ह्यात मध्यवर्ती भोजनगृह योजना सुरु करणार
आणि
** औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज नगरसेवकांचे  प्रभाग आरक्षित
****
राज्यातल्या तत्कालिन भारतीय जनता पक्ष प्रणीत सरकारनं राजकीय नेत्यांचं दूरध्वनीवरचं संभाषण ध्वनीमुद्रित केल्याच्या आरोपातले तथ्य तपासण्यासाठी राज्य सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. अतिरिक्त मुख्य गृहसचिव श्रीकांत सिंह आणि गुप्तहेर विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती सहा आठवड्यात चौकशी पूर्ण करील, असं देशमुख यांनी सांगितलं. गेल्या सरकारच्या कार्यकाळात नेत्याचं दूरध्वनीवरचं संभाषण ध्वनीमुद्रित करून त्याचा गैरवापर झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचं, गृहमंत्र्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
****
राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं झालेल्या नुकसान भरपाईची निश्चिती आणि विमा दावे एका आठवड्याच्या आत निकाली काढावेत, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. खरीप हंगामामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेली पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मिळावी यासाठी कृषीमंत्र्यांनी काल विमा कंपन्यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कंपन्यांनी विमा दावे तत्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना लाभ तातडीनं मिळावा, आठवड्याभरात दावे निकाली काढतानाच त्याचा अनुपालन अहवालही सादर करावा, असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.
****
सहाय्यक प्राध्यापकांच्या वरिष्ठश्रेणी आणि निवडश्रेणीनुसार पदोन्नती करताना विलंब टाळण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय असावा, अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. औरंगाबाद विभागातल्या प्राध्यापकांच्या विविध अडचणीसंदर्भात काल मुंबईत विधान भवनात आढावा बैठक झाली, त्यावेळी सामंत बोलत होते. तासिका तत्वावरील पदासाठी पात्र उमेदवार न मिळाल्यास पदव्युत्तर पदवीधर यांना संधी मिळावी, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत नसून, त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, यंदा शंभरावं नाट्य संमेलन साजरं करणार आहे. या नाट्यसंमेलनाचं स्वागताध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वीकारलं आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या विनंतीवरून हे पद स्वीकारत असल्याचं, पवार यांनी एका ट्वीट संदेशाद्वारे जाहीर केलं आहे. या ऐतिहासिक शंभराव्या संमेलनाला येत्या २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनी सांगली इथून प्रारंभ होत असून, चौदा जूनला गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनी मुंबईत समारोप होणार आहे.
****
आदिवासी विभागातल्या शासकीय वसतीगृहांप्रमाणेच सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहांसाठीदेखील प्रत्येक जिल्ह्यात मध्यवर्ती भोजनगृह योजना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांना सारखेच आणि उत्तम जेवण देण्याचा प्रयत्न या मध्यवर्ती भोजनगृहामार्फत केला जाईल, असं ते म्हणाले.
****
महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार असून आज मुंबई महाविकास आघाडीच्या पहिल्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
****
१६ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. ब्राझीलच्या बार्बरा पाझ यांच्या ‘बाबेंको, टेल मी व्हेन आय डाय’ या माहितीपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचं सुवर्ण शंख पटकावलं. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पावसाचा निबंध या लघुपटानं सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार पटकावला, तर सर्वोत्कृष्ट ॲनिमेशनपटाचा पुरस्कार जर्मनीच्या इजाबेला प्लुसिन्स्का यांच्या पोर्टेट ऑफ सूझन आणि भारतीय दिग्दर्शक दिवाकर एस के यांच्या द फॉक्स ऑफ द पामग्रोव्ह या चित्रपटांना विभागून देण्यात आला. 
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत काल काढण्यात आली. एकूण एकशे पंधरा प्रभागांपैकी सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष गटासाठी प्रत्येकी ३० प्रभाग आरक्षित झाले असून, अनुसूचित जाती महिलांसाठी ११, अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी अकरा, अनुसूचित जमाती महिला आणि पुरुष प्रवर्गांसाठी प्रत्येकी एक तर इतर मागास प्रवर्ग पुरुष तसंच महिला प्रवर्गासाठी अनुकमे सोळा तसंच पंधरा प्रभाग आरक्षित झाले आहेत. या वॉर्ड आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे त्यांची त्याच वॉर्डातून पुन्हा निवडणूक लढवण्याची आशा संपुष्टात आली आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारतीय असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या नागरीकत्वाला बाधा पोहोचवण्याचा उद्देश नसून तीन देशातल्या धार्मिक हिंसाचाराला बळी पडलेल्यांना संविधानाच्या चौकटीत राहून नागरिकत्व देण्यासंदर्भात आवश्यक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर शुभांगी पांचाळ यांनी दिली आहे. लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाच्या सामाजिकशास्त्र अभ्यास मंडळाच्यावतीनं ‘नागरिकत्व सुधारणा कायदा- २०१९  समज आणि गैरसमज’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधून आलेल्या अल्पसंख्यांक समुदायाला कायदेशीररित्या नागरिकत्व देण्यासंदर्भात तरतूद असल्याचं पांचाळ यांनी सांगितलं.
****
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प -पोखरा योजनेत लातूर तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या गावांचा समावेश करण्याच्या मागणीचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिलं. या योजनेत लातूर तालुक्यातल्या केवळ ३६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या सर्व गावांना दुष्काळाची झळ बसली असून पोखरा योजनेत प्रसिद्ध झालेल्या गावांच्या यादीत या सर्व गावांची नावं समाविष्ट करावीत, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात ११६ तीव्र कुपोषित बालकं आढळली आहेत. या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी ग्राम बालविकास केंद्रातून उपचार सुरू करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे हिंगोलीचे वार्ताहर
जिल्ह्यातील १ हजार ८९ अंगणवाड्या मधून ९७ हजार ६७८ बालके तपासल्यानंतर  मध्यम वजनाची ८ हजार ४२२ तर तीव्र कमी वजनाची १ हजार ७६१ बालके आढळली. १६६ बालके तीव्र कुपोषित असून त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी ग्राम बालविकास केंद्रांची स्थापना केली आहे.  १५ जानेवारीपासून सुरू झालेल्या केंद्रात तीव्र कुपोषित बालकांना ८४ दिवस औषधोपचार व इ.डी.एन.एफ. नुट्रिशयन देण्यात येणार आहेत.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या ४ विषय समित्यांच्या सभापती पदासाठी काल निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या सुशीला पाटील बेटमोगरेकर यांची निवड करण्यात आली असून बाळासाहेब पाटील रावनगावकर, संजय अप्पा बेळगे, रामराव नाईक यांची विविध विषय समिती सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
****
गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये लातूर जिल्ह्यात आलेली दुष्काळी परिस्थिती पाहता लातूर महानगरपालिकेनं सहायक अनुदान मिळण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल दिल्या. मुंबईत लातूर महानगरपालिकेतल्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीस लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****
वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथं काल एका प्राध्यापक तरुणीला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याची घटना घडली. काल सकाळी साडे सात वाजता ही घटना घडली. सदर प्राध्यापक तरुणी दारोडा गावची रहिवासी असून, वर्धा इथल्या मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विषयाची प्राध्यापक आहे. ही तरुणी ४० टक्के भाजली असून, तिला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
राज्यात काल मध्यरात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणा गावाजवळ डंपर आणि क्रूझरची धडक होऊन झालेल्या अपघाता १२ जणांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यात आटपाडी इथं मोटार विहिरीत कोसळून पाच जण ठार झाले.
****
जालना जिल्ह्यात काल तीन वेगवेगळ्या दुचाकींच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. जालना-मंठा मार्गावर सिंधीकाळेगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात जालना पंचायत समितीचे माजी उपसभाती गणेश नरवडे यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर याच रस्त्यावर काही अंतरावर झालेल्या अन्य एका दुचाकी अपघातात घोडेगाव इथल्या सुरेश खांडेभराड यांचा मृत्यू झाला.
****



No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...