Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 February
2020
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०५ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यातल्या
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार
करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
** राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचा
राजीनामा
** यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकीत महाविकास
आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी
** राज्यात 'संगीत, नृत्य आणि कला विद्यापीठ' सुरु
करण्याबाबत शासन पुढाकार घेईल-सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
आणि
** १९ वर्षाखालील
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा १० गड्यांनी पराभव करत भारताची अंतिम फेरीत
धडक
****
राज्याच्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार
करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईत काल ग्रामविकास
विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. रस्त्यांचा आराखडा तयार करतांना महत्वाच्या रस्त्यांच्या
कामांची प्राथमिकता निश्चित करावी, असं ते म्हणाले. ज्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आलं आहे, त्यांच्यावर
रस्त्यांची जबाबदारी निश्चित केली जावी, तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या
उपक्रमांना अधिक गती देण्यात यावी, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा, अशी
मागणी खासदार डॉ नरेंद्र जाधव यांनी काल राज्यसभेत शून्य प्रहरात केली. कोणत्याही भाषेला
अभिजात दर्जा देण्यासाठी आवश्यक असलेले निकष मराठी भाषा पूर्ण करत आहे. जागतिक समाज
जीवनाच्या पटलावर मराठी भाषा आपलं वेगळेपण टिकवून आहे, म्हणून मराठीला अभिजात भाषेचा
दर्जा मिळायला हवा, असं डॉक्टर जाधव यावेळी म्हणाले.
बॉम्बे हायकोर्टाचं नाव बदलून मुंबई हायकोर्ट करावं,
ही मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केली. गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून
प्रलंबित असलेला हा प्रश्न याच अधिवेशनात मार्गी लावावा, असं राऊत यांनी नमूद केलं.
महिला सुरक्षेसाठीचे कायदे अधिक कडक करण्याची गरज
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. त्या काल लोकसभेत शून्य प्रहरात
बोलत होत्या. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं घडलेल्या जळीत कांडाकडे नवनीत राणा यांनी
यावेळी लक्ष वेधलं. दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींना
फाशीची शिक्षा होऊनही, फाशीची अंमलबजावणी पुढे ढकलली जात असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
****
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर
यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
अध्यक्षपदाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आपण उपस्थित केलेला मुद्दा विचारार्थ ग्राह्य
धरल्यानंतर हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. आयोगामध्ये गेल्या साडेतीन
वर्षांत खूप काम करता आलं, विविध उपक्रम राबवले, महिलांना शक्य तेवढा न्याय देण्याचा
प्रयत्न करता आला, या सर्व कामांचं समाधान असल्यांही त्या म्हणाल्या.
****
येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातल्या सर्व महापालिका, नगरपालिका,
ग्रामीण भाग एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्याची सूचना, पर्यावरण
मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. राज्यातले विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि
जिल्हाधिकाऱ्यांशी ठाकरे यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला,
त्यावेळी ते बोलत होते. प्लास्टिकच्या घातक परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक
महापालिका, नगरपालिका काय करू शकते याचा आराखडा येत्या २० फेब्रुवारीपर्यंत सादर करावा,
असंही त्यांनी सांगितलं.
****
वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथं पेट्रोल टाकून जाळण्याचा
प्रयत्न करण्यात आलेल्या प्राध्यापिकेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातल्या
सूत्रांनी दिली आहे. या तरुणीवरील उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून
करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. हा खटला जलदगती न्यायालयात
चालवला जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्य महिला आयोगानं
या प्रकरणी वर्धा पोलीस अधिक्षकांना अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेला न्याय
मिळावा यासाठी हिंगणघाटमधे काल बंद पाळण्यात आला. या घटनेतल्या आरोपीचं वकीलपत्र कोणीही
घेऊ नये, असं आवाहन जिल्हा बार असोसिएशन केलं आहे.
****
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेवरून विधान परिषदेत
प्रतिनिधी पाठवण्याच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं विजय मिळवला. शिवसेनेचे दुष्यंत
चतुर्वेदी यांनी भाजप उमेदवार सुमीत बाजोरिया यांना तब्बल ११३ मतांनी पराभूत केलं.
या निवडणुकीत सर्व ४८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात चतुर्वेदी यांना २९८ मतं
मिळाली तर भाजपचे सुमीत बाजोरिया यांना १८५ मतं मिऴाली. सहा मतं अवैध ठरली.
****
पुण्यातल्या एल्गार परिषदप्रकरणी, एन आय ए अर्थात
राष्ट्रीय तपास संस्थेनं, प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर दाखल केला आहे. सध्या तुरुंगात
असलेल्या नऊ जणांसह ११ जणांविरोधात एनआयएनं, यूएपीए अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक
कायदा आणि भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांतर्गत आरोप ठेवले आहेत. पुणे पोलिसांनी
तपास करताना भारतीय दंडसंहितेचं, १२४- अ हे देशद्रोहासंबंधीचं कलमही लागू केलं होतं.
एनआयएच्या एफआयआर मध्ये मात्र हा आरोप ठेवलेला नाही. तसंच सरकारविरोधात युद्ध पुकारण्याचा
प्रयत्न करण्यासंदर्भातलं कलम १२१, यासंबंधीच्या कट कारस्थानाबाबतचं कलम १२१-अ, आणि
गुन्हेगारी कटासंदर्भातलं कलम १२०- ब, यांचाही एनआयएच्या या एफआयआरमध्ये समावेश नाही.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
राज्यात येणाऱ्या काळात अधिकाधिक कलाकार घडावेत यासाठी
'संगीत, नृत्य आणि कला विद्यापीठ' सुरु करण्याबाबत शासन पुढाकार घेईल, असं सांस्कृतिक
कार्यमंत्री अमित देशमुख यांनी संगितलं. सांस्कृतिक संचालनालयातर्फे भारतरत्न पंडित
भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ
सतार वादक पंडित अरविंद परिख यांना देशमुख यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला, त्यावेळी
ते बोलत होते. पाच लाख रुपये, मानपत्र तसंच मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज जालना जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. दावलवाडी इथल्या महाराष्ट्र हायब्रिड सिडस कंपनी आणि अन्न अमृत फाऊंडेशन
संचलित मध्यान्ह भोजन आहार योजनेचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.
****
नांदेड-वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीनं नांदेड
शहरातल्या इतवारा भागात अग्नीशमन दल उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन काल आमदार
मोहन हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर श्रीमती दिक्षा धबाले, उपमहापौर
सतिश देशमुख तरोडेकर हे उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं दोन किराणा दुकानांवर
अन्न आणि औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून जवळपास सात लाख रुपयांचा गुटखा
आणि पान मसाला जप्त केला. या प्रकरणी दुकान मालक कोंडीराम गादेकर, राजकुमार डवरे आणि
रामकृष्ण मोटे यांच्याविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
अल्पवयीन विद्यार्थिनींच्या छेडछाड प्रकरणी नांदेड
पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली आहे. स्वप्नील शृंगारे असं या शिक्षकाचं नाव असून,
प्राथमिक शाळेतल्या दहा वर्ष वयाच्या एका विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवून शृंगारेने
तिची छेड काढल्याची तक्रार या विद्यर्थिनीनं केली, त्यावर विद्यार्थिनीच्या पालकांनी
शाळेत जाऊन शृंगारेला मारहाण केल्यावर हा प्रकार समोर आला. शृंगारेनं आणखी चार मुलींना
अशाच प्रकारे त्रास दिल्याचंही चौकशीतून समोर आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड - औरंगाबाद नांदेड या विशेष गाडीची मुदत एक फेब्रुवारी ते ३१ मार्च-
२०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला असून, आजपासून या गाडीला तीन डब्बे कायम स्वरूपी
वाढवण्यात येणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक
उपिंदर सिंह यांनी ही माहिती दिली.
****
अहमदनगर - औरंगाबाद रस्त्यावर गजराजनगर जवळ असलेल्या
गादी कारखान्याला काल दुपारी भीषण आग लागली. आगीमध्ये कारखान्यातल्या सर्व वस्तू आणि
कच्चा माल जळाला असून, लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. शॉर्ट सर्किटनं ही आग लागली
असून, अग्निशमन दलाच्या प्रयत्नानं काही तासानंतर आग विझवण्यात आली.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या
सामन्यात भारतानं पाकिस्तानचा १० गडी राखत दणदणीत पराभव केला. प्रथम फंलदाजी करत पाकिस्तानचा
संघ ४३ षटकात १७२ धावाच करु शकला. भारतानं हे लक्ष्य ३६व्या षटकातच पूर्ण केलं. अंतिम
सामना येत्या रविवारी खेळला जाणार आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आज हॅमिल्टन इथं होणार असून, सकाळी
साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
या मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्माच्या ऐवजी
मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला आहे. तर कसोटी संघात पृथ्वी शॉ ने पुनरागमन केलं
आहे. २१ फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते
तसंच साखर डायरीचे संपादक, अजित नरदे यांचं काल सकाळी निधन झालं. नरदे यांच्या अकाली
निधनाने शेतकरी चळवळीमध्ये कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे असं मत शेतकरी संघटनेचे
नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
****
No comments:
Post a Comment