Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06
February 2020
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०६ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** अयोध्येत राम मंदीर उभारण्यासाठी विश्वस्त संस्था स्थापन
** सहकारी बॅंकांमधल्या व्यवहारांना भारतीय
रिझर्व्ह बँकेचे नियम लागू करण्याचा
केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय
** महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये
गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे गृहविभागाला आदेश
** यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा; न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉ. पुरुषोत्तम भापकर, यांच्यासह ३५ जणांचा गौरव
आणि
** पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव
****
अयोध्येत राम मंदीर उभारण्यासाठी विश्वस्त संस्था स्थापन
करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत याबाबत घोषणा केली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असं या विश्वस्त मंडळाचं नाव असणार आहे. अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदीर उभारण्यासह इतर सर्व संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी
हे विश्वस्त मंडळ स्वायत्त असेल. मंदीर
उभारण्यासाठी रामजन्मभूमीचा सुमारे सदुसष्ट एकर क्षेत्राचा संपूर्ण भूखंड या विश्वस्त
मंडळाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. संपूर्ण देशानं परिपक्व आणि संयमी भूमिकेतून सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात दिलेल्या या निर्णयाचा स्वीकार केल्याबद्दल पंतप्रधानांनी
देशवासियांचं अभिनंदन केलं.
अयोध्येत बाबरी मशीद उभारण्यासाठी पाच एकर जमीन देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्णयानुसार भूखंड देण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला
असून, उत्तरप्रदेश सरकारनंही या निर्णयाला
सहमती दर्शवल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. यामुळे सहकारी बॅंकांमधल्या व्यवहारांना भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम लागू होणार असून, प्रशासकीय बाबी मात्र सहकार विभागाकडेच राहणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर वार्ताहांशी
बोलताना ही माहिती दिली. या
निर्णयामुळे सहकारी बँकांच्या कामकाजात अधिक जबाबदारी आणि पारदर्शकता येईल, तसंच सहकारी बँकांनाही व्यापारी बँकांप्रमाणे नियामक आवश्यकतांची
पूर्ती करावी लागेल, असं
ते म्हणाले.
महाराष्ट्रात डहाणूजवळ वाढवण इथे मोठं बंदर उभारण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं
कालच्या बैठकीत तत्वत: मान्यता
दिली.
****
कापूस खरेदीसाठी अठराशे कोटी रुपयांच्या शासन हमीला राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या
बैठकीत मान्यता देण्यात आली. या
हंगामातल्या कापूस खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस
उत्पादक पणन महासंघानं बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जावर ही शासन
हमी देण्यात आली आहे.
राज्याच्या नागरी भागात सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या पहिल्या टप्प्यालाही राज्य
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
****
लोकसभेत काल औरंगाबादचे खासदार इम्तियाज
जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड आणि
वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथं घडलेल्या महिला जळीत कांडाच्या
मुद्याकडे सदनाचं लक्ष वेधलं. अनेक
सदस्यांनी, विशेषत: सगळ्या पक्षांच्या महिला खासदारांनी, देशभरात महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सदनात आवाज उठवला. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी खासदारांनी केली.
****
राज्यातल्या महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
गंभीर दखल घेतली असून,
गुन्हेगारांवर तातडीनं कडक कारवाई करण्याचे आदेश गृहविभागाला दिले आहेत. महिला आणि
बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून, यात हयगय करणाऱ्यांना माफी नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
शिक्षण आणि रोजगारामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्याच्या कायद्याला
वैध ठरवणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्याला सर्वोच्च न्यायालयानं नकार
दिला आहे. हे प्रकरण दीर्घकाळापासून सुरू असून यावर विस्तृत सुनावणी होण्याची
आवश्यकता असल्याचं मत न्यायालयानं काल झालेल्या सुनावणीदरम्यान नोंदवलं. मराठा आरक्षणाच्या समर्थनात तसंच विरोधात अनेक याचिका दाखल झाल्या
आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या
सतरा मार्चला होणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी देखरेख आणि समन्वय समितीच्या
अध्यक्षपदाचा आमदार विनायक मेटे यांनी, राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याकडे मेटे यांनी काल राजीनामा पत्रं सादर केलं. राज्यात महाविकास आघाडीच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यामुळे
महाराजांच्या स्मारकाचं काम आघाडीच्या विचारानं व्हावं, म्हणून राजीनामा देत असल्याचं, मेटे
यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी आणि त्यांना सकस आहार मिळावा यासाठी सरकार माध्यान्ह
भोजन योजनेसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून काम करत आहे, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून जालना इथं उभारण्यात आलेल्या
पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण बारवाले केंद्रीय
स्वयंपाक गृहाचं लोकार्पण काल राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जालन्यातल्या
या केंद्रीय स्वयंपाकगृहातून पहिल्या टप्य्यात पन्नास हजार विद्यार्थ्यांना भोजन दिलं
जाणार आहे.
अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चौतिसाव्या दीक्षान्त समारंभालाही
राज्यपाल उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी
आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करुन देश विकासाचा संकल्प घ्यावा असं आवाहन त्यांनी
यावेळी केलं.
****
उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीनं दिल्या
जाणाऱ्या वर्ष २०१८ साठीच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची काल घोषणा
करण्यात आली. राज्यातल्या ३५ जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या त्यांना समजून घेताना
या पुस्तकाला शाहू महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या शैक्षणिक
षटकार या पुस्तकाला कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, गणेश घुले यांच्या सुंदर माझी शाळा या पुस्तकाला बालकवी पुरस्कार, तर लातूरचे विलास सिंदगीकर यांच्या बाजार या कथासंग्रहास दिवाकर
कृष्ण पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल प्रोझोन मॉल इथं, प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या हस्ते झालं. महोत्सवाच्या माध्यमातून दर्जेदार चित्रपट दाखवल्यामुळे प्रेक्षकांना
जगभरात काय सुरू आहे, हे
समजण्यास मदत होते, असं
ते म्हणाले. उद्घाटन सोहळ्यानंतर यंदाचा
राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेतस गुजराथी भाषेतला चित्रपट ‘हेल्लारोनं महोत्सवाची सुरूवात झाली.
****
परभणी महानगरपालिकेल्या हद्दीत स्वच्छतेच्या कामांची तपासणी करण्यासाठी १६ बचत
गटांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. स्वच्छतेबाबत
शासनाच्या निर्णयाचं उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या बचत गट महिलांना ओळख पत्र देण्यात येणार असून, वसूल केलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम त्यांना देण्यात येणार
आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे
केली आहे. पवार यांनी काल गडकरी यांची
भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं. औसा
मतदारसंघातल्या सात रस्त्यांसाठी अंदाजे ८० कोटी खर्च अपेक्षित असून, जवळपास १४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचं कामही
प्रलंबित असल्याचं आमदार पवार यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
लातूर इथल्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या
आधुनिक बाजार आवार प्रकल्पाची आमदार धिरज देशमुख यांनी काल पाहणी केली. पाणी, वीज, वाहनतळ यांच्यासह वाहतूक कोंडी होणार नाहीत असे रस्ते असावेत, शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाहीत, अशी सर्व सोयी सुविधांनी युक्त अद्ययावत बाजार समिती असावी, असं ते यावेळी म्हणाले.
****
न्यूझीलंडमधे सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यात
काल हॅमिल्टन इथल्या पहिल्या सामन्यांत न्यूझीलंडनं भारताचा चार गडी
राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करत भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी
३४८ धावाचं आव्हान ठेवलं होतं. ते यजमान संघानं ४८ षटकं आणि एका चेंडुत पूर्ण
केलं. टेलरला सामनावीर घोषित करण्यात
आलं. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं
एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथल्या साईबाबा नागरी सहकारी बँकेला २०१९च्या बँको पुरस्कारानं
सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्या
श्रेणीच्या सगळ्या निकषांची पूर्तता केल्याबद्दल या बँकेला सलग पाचव्या वेळेस हा राष्ट्रीय
स्तरावरचा पुरस्कार मिळाला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या पाच पालिकांतल्या सहा नगरसेवक पदांसाठी आज पोटनिवडणूक होणार
आहे. या निवडणुकीची मतमोजणी उद्या
शुक्रवारी होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातल्या अंधारी इथल्या जळीतकांडातल्या पीडित
महिलेचा काल रात्री मृत्यू झाला. गेल्या रविवारी आरोपीनं या महिलेला अंगावर पेट्रोल
टाकून पेटवलं होतं. आरोपी संतोष मोहिते याला न्यायालयानं १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस
कोठडी सुनावण्यात आली आहे.
***
वृत्तपत्र विक्रेता आणि वितरकांच्या विविध मागण्यांचं निवेदन काल राज्याचे उद्योगमंत्री
सुभाष देसाई यांना देण्यात आलं. नांदेड
इथं काल महाराष्ट्र राज्य वृतपत्र विक्रेता -
वितरक संघटनेच्या शिष्टमंडळानं देसाई
यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. राज्यातल्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय लवकरच
घेतला जाणार असल्याचं आश्वासन देसाई यांनी यावेळी दिलं.
****
परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीतल्या पिकांसह
फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या नुकसानीचे
पंचनामे करण्याची मागणी करत काल परभणी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये सडलेली फळं
फेकून आंदोलन केलं.
****
No comments:
Post a Comment