Tuesday, 11 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 11.02.2020 TIME - 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 11 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद  
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निकालांचे कल हाती येत असून सत्ताधारी आम आदमी पार्टी सत्तरपैकी अठ्ठावण्ण जागांवर आघाडीवर आहे. भाजप बारा जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीत सकाळी आठ वाजता एकवीस केंद्रांवर ही मतमोजणी सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी शनिवारी सुमारे साडे बासष्ट टक्के मतदान झालं होतं.  दरम्यान, आम आदमी पार्टी तिसऱ्यांदा सत्तेवर येईल हे प्रत्येकाला माहिती होतं, अशी प्रतिक्रीया काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केली आहे. प्रारंभीचे कल भाजपच्या बाजुचे नसल्याचं स्पष्ट असल्याचं भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे. जे काही निकाल येतील त्यासाठी आपण जबाबदार असू, अशी प्रतिक्रीयाही तिवारी यांनी नोंदवली आहे.
****
अनुसूचित जाती-जमातींसाठीच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारनंदिली आहे. नोकरी आणि पदोन्नतीत अनुसूचित जाती-जमातींचं आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटलं आहे. त्यावर काल राज्यसभेत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी निवेदन दिलं. त्या खटल्यात केंद्र सरकार पक्षकार नव्हतं, तसंच कोणतंही प्रतिज्ञापत्र सरकारनं दिलेलं नव्हतं, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गियांच्या कल्याणासाठी बांधील आहे, असं त्यांनी सांगितलं.
****
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप या महिन्याच्या चोवीस तारखेला भारताच्या दोन दिवसीय राजकीय दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रंप त्यांच्यासोबत असतील. ते या दौऱ्यामध्ये नवी दिल्ली आणि गुजरातमधील शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान ते समाजाच्या विविध गटांतील व्यक्तींशी चर्चा करणार असल्याची माहिती एका सरकारी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
****
भारताला एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची विक्री करायला अमेरिकेनं मंजुरी दिली आहे. याची अंदाजे किंमत १८६ कोटी अमेरिकी डॉलर एवढी आहे. कोणत्याही हवाई हल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला समर्थ आणि सक्षम करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल.
****
केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत अधिसूचित केलेल्या नियमानुसारच वाहनांची नोंदणी करावी, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं सर्व राज्यांना दिले आहेत. काही वाहनांकडे कायदेशीर प्रमाणपत्र असताना देखील काही राज्य या वाहनांची नोंदणी करत नाही, असं केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. वाहन पद्धतीमुळे वाहन निर्मात्यांनी वाहन निर्मितीच्यावेळी सुरक्षाविषयक सर्व मानकांची पूर्तता केली आहे की नाही याची माहिती मिळते. त्यामुळे वाहनांची नोंदणी लवकर होते, असंही या मार्गदर्शक सूचनांमधे नमूद केलं आहे.
*****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा साठावा दिक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपति भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्राध्यापक अश्विनीकुमार नांगिया हे समारंभाला उपस्थित आहेत.
****
इंग्रज अधिकाऱ्यांना भारतीय भाषा शिक्षणासाठी कोलकाता इथून सहा भाषांत पुस्तकं छापण्यात आली होती आणि तेंव्हापासून भारतीय भाषांमधील साहित्य येऊ लागलं, असं प्रतिपादन ज्येष्ठ भाषा अभ्यासक, विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी केलं आहे. ते काल नांदेड इथं थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या अडोतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. `भाषा, राष्ट्रवाद आणि लोकशाही` विषयावर डॉ. देवी यांनी यावेळी व्याख्यान दिलं.  
****
सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ इथं लोकमंगल साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळं प्रदूषण होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कारखान्याच्या धुराच्या काजळीमुळे शिरापूर परिसरातील फळबाग शेती संकटात आली असून विहिरींचं पाणीही इथं प्रदूषित होत असल्याचं यात म्हटलं आहे.
****
न्यूझीलंडनं भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा सतराव्या षटकात एक बाद एकशे सहा धावा केल्या आहेत. मार्टीन गुप्तीलनं अर्धशतक झळकवलं आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडमधील बे-ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं सात बाद २९६ धावा केल्या. यात के. एल. राहुलच्या एकशे बारा आणि श्रेयस अय्यरच्या बासष्ट धावांचा समावेश आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...