Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 06 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ६ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भारतातल्या
अल्पसंख्याकांसह कोणत्याही नागरिकाला काहीही धोका नसल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी नमूद केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
प्रारंभी केलेल्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला पंतप्रधान आज
उत्तर देत होते. जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याऐवजी काँग्रेस पक्ष चुकीच्या
मार्गावर जात असल्याचं, सांगतानाच, लोकांची दिशाभूल करू नये, असंही पंतप्रधान म्हणाले.
सर्वांनी एकत्र येऊन देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
केलं. यानंतर अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्ताव लोकसभेनं आवाजी मतदानानं मंजूर केला. सध्या
राज्यसभेत पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत
आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी
पंतप्रधानांच्या या भाषणावर सदनाबाहेर पत्रकारांशी बोलताना टीका केली आहे. इतर अनेक
मुद्यांवर बोलणारे पंतप्रधान, बेरोजगारीच्या मुद्यावर काहीही बोलत नाहीत, याकडे राहुल
गांधी यांनी लक्ष वेधलं.
****
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकाच
वेळी घेण्याबाबत सरकार
विचार करत आहे. आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी ही माहिती दिली.
संसदेच्या स्थायी समितीनं, निवडणूक आयोगासह विविध पक्षांशी
चर्चा केल्यानंतर
या मुद्याचा आढावा घेतला असून आपल्या अहवालात काही शिफारसी केल्या आहेत. हा
मुद्दा विधीआयोगाकडे विचारार्थ
पाठवला असल्याचं, प्रसाद यांनी सांगितलं
****
शिक्षकांवर निवडणुकीची जबाबदारी देण्याचा
मुद्दा आज राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. शून्य काळात भारतीय जनता पक्षाचे हरनाथ सिंह
यांनी हा मुद्दा उपस्थित करत, शिक्षकांकडे आधीच अध्यापनाची महत्त्वाची जबाबदारी आहे
त्यातच त्यांनी निवडणुकीशी संबधित कामं देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर
त्याच परिणाम होतो असं सांगितलं.
****
राज्यातल्या पाणथळ जागांबाबत दिशाभूल करणारी
माहिती सादर केल्याबाबत पर्यावरण विभागाच्या अवर सचिवांविरोधात कारवाई का करु नये, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं
राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत दोन आठवड्यात
खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयानं आज दिले. राज्यभरात पाणथळ
जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका
न्यायालयात दाखल करण्यात आली होती, त्यावर न्यायालयानं हे निर्देश दिले.
****
सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत
कमी दराची असावी, याबाबत शासन सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री डॉ.नितीन
राऊत यांनी दिली. आज मुंबईत वीज ग्राहक संघटनेसोबत झालेल्या वीज दर प्रश्नासंदर्भातील
बैठकीत ते बोलत होते. वीजदरांसंदर्भात
राज्य वीज नियामक आयोग -एमईआरसीकडे
प्रस्ताव आला असून त्यासाठी जनसुनावणी घेण्यात येतील,
असंही त्यांनी सांगितलं.
****
उच्च शिक्षणानं नवी
पिढी सुसंस्कृत आणि संस्कारक्षम होत असताना, या पिढीनं माता, मातृभाषा, भारतमाता आणि
निसर्गमाताचं संरक्षण करावं, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.
कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठाच्या ५६ व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात ते आज बोलत
होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित होते, उच्च
शिक्षणात आता विद्यापीठ अनुदान आयोग ‘कुलगुरू शिक्षण प्रणाली’ ऐवजी ‘गुरूकुल शिक्षण
पध्दती’ आणणार असल्यानं, विद्यार्थ्यांनी राजकीय कटपुतळी होवू नये, यासाठी विद्यापीठ
महाविद्यालयांनी त्यांना असामाजिक घटकापासून दूर ठेवावं. असं आवाहन पटवर्धन यांनी केलं.
****
मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्य हस्ते आज ठाणे इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण
सोहळा पर पडला. बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण इतिहास आणि त्यांच्या जीवनप्रवासाची
सर्वसमावेश माहिती या स्मारकात संग्रही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
विविध नागरी कामांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला.
****
वस्त्रोद्योगाला पारंपरिक
ऊर्जा प्रकल्पाद्वारे वीज उपलब्ध करुन देत, या क्षेत्राचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
असं वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितलं आहे,
ते आज मुंबईत विधानभवनात वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या आढावा बैठकीत बोलत होते. सहकारी सुतगिरण्यांना सौरऊर्जेचे प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनामार्फत अनुदान
मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अहमदनगर जिल्ह्यात
राहुरी इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी
आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आज आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक-विद्यार्थी संवादाचं
आयोजन करण्यात आलं होतं. या शास्त्रज्ञ विद्यार्थी संवादात पदव्युत्तर, आचार्य पदवी
तसंच प्राध्यापक वर्ग असे एकूण २३० विद्यार्थी सहभागी झाले होते. कुलगुरु डॉ. के.पी.
विश्वनाथा, हवामान आधारीत शेती आणि जलव्यवस्थापन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. सुनिल
गोरंटीवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
****
No comments:
Post a Comment