Friday, 14 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad HLB 14.07.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१४ जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
गृहमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज विरोधी पक्षांना चीन संबंधी आणि काश्मीरमधल्या परिस्थितीची माहिती देणार आहेत. या बैठकीत विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. येत्या १७ तारखेपासून सुरु होणाऱ्या  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चीन आणि काश्मीर मुद्यावर विरोधकांच्या सहमतीसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
महिलांसाठी असलेल्या सोळाशे पेक्षा अधिक राष्ट्रीय संघटनानी लोकसभा आणि राज्य विधिमंडळात महिलांना ३३ टक्क्यांऐवजी ५० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेलं महीला आरक्षण विधेयक येत्या १७ जुलै पासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडणार असून, त्यासाठी “आता ३३ टक्के नाही, ५० टक्के” असं घोषवाक्य तायर करण्यात आल्याचं पीटीआय च्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना तालुक्यातल्या सर्व सहकारी संस्थांनी ३१ मार्च २०१७ अखेरचं लेखापरीक्षण ३१ जुलैपर्यंत करुन घ्यावं असं आवाहन सहाय्यक निबंधक विष्णु रोडगे यांनी केलं आहे. लेखा परीक्षण करुन न घेणाऱ्या संस्थावर अवसायानाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
औरंगाबाद इथं आज अभिषेकी रंग हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंडित नाथ नेरलकर फाऊंडेशन ट्रस्ट तर्फे आयोजित हा कार्यक्रम आज संध्याकाळी सहा वाजता सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात होणार आहे. नांदेडचे गायक अभिजीत अपस्तंभ हे आपली कला सादर करणार असून, कार्यक्रमाला श्रोत्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे. 
****
राज्यातल्या कारागृहांमधल्या अनागोंदीसंदर्भात न्यायालयीन चौकशी करून, दोषींवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची भाषा विषयांची २० गुणांची तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळानं काल घेतला. यामुळे आता भाषा विषयाची लेखी परीक्षा ही १०० गुणांची असणार आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...