Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 13 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
देशात डिजिटल आर्थिक व्यवहारांना चालना देण्याबाबत सरकारनं
अत्यंत वेगानं पावलं उचलली असून, विमुद्रीकरणामुळे तीन वर्षांचं उद्दीष्ट फक्त सात
महिन्यात गाठता आलं असल्याचं मत भारतीय स्टेट बँकेनं व्यक्त केलं आहे. यासंदर्भात बॅंकेनं
केलेल्या सर्वेक्षणानुसार, गेल्या सात महिन्यात देशात ७० हजार कोटी रुपयांचे डिजिटल
व्यवहार झाले असल्याचं समोर आलं असून, यामुळे ग्राहक किमतीवर आधारित महागाई निर्देशांकात
सुमारे एक टक्क्यानं घट झाली असल्याचा दावा स्टेट बँकेनं केला आहे.
****
भारतीय संशोधकांनी एका नव्या आकाशगंगेचा शोध लावला आहे.
आपल्या आकाशगंगेपासून सुमारे चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या दीर्घिकांचा अतिशय
घन असा महासमूह भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधला असून, त्याला सरस्वती असं नाव दिलं
आहे. पुण्यातल्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स
- आयुकाच्या पुढाकारानं हे संशोधन केल्याचं समोर आलं आहे.
****
भारत संचार निगम लिमिटेडच्या अत्याधुनिक नेक्स्ट जनरेशन
ऑप्टीकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क - एन जी ओ टी एन तंत्रज्ञानाचं आज केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री
मनोज सिन्हा यांच्या हस्ते मुंबई इथं उद्घाटन झालं. बीएसएनएलच्या नेटवर्कचं आधुनिकीकरण
आणि हाय स्पीड ब्रॉड बॅण्ड सेवा देशाला प्रदान करत असल्याबद्दल सिन्हा यांनी बीएसएनएलची
प्रशंसा केली.
****
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली
इथं देशातल्या पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वे गाडीचं उद्घाटन झालं. सोळाशे हॉर्सपॉवरच्या
या रेल्वेत विशेष बॅटरी बॅंक असून, याचा रात्रीच्या वेळेत गाडी सुरु ठेवण्यासाठी उपयोग
केला जाणार आहे. दिल्लीच्या सराय रोहीलाहून हरीयाणामधल्या फारुख नगरपर्यंत ही रेल्वे
धावणार आहे.
****
लातूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा पूर्ण नियोजनबद्ध आराखडा
तयार करावा, त्यास तात्काळ मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिली आहे. ते आज मुंबई इथं लातूर जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. कामगार कल्याण
मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर, लातूर जिल्हा परिषदेचे
अध्यक्ष मिलींद लातुरे यावेळी उपस्थित होते. लातूर शहरातला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी,
तसंच महापालिकेनं सर्व कामकाज डिजीटल करावं, त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, असं
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी गोपनीय अहवाल व्यवस्थापन
करण्यासाठी महापार या वेबपोर्टलचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते झालं. तसंच राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेनं नियुक्त होणाऱ्या गट- अ आणि गट-
ब अधिकाऱ्यांसाठी, अखिल भारतीय नागरी सेवांप्रमाणे परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबवण्यासाठी, राज्य सरकार, यशदा आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये
सामंजस्य करारही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागानं
हाती घेतलेले उपक्रम पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील असं
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
आठव्या नाट्य ऑलिम्पिकचं यजमानपद भारताला मिळालं आहे.
पुढच्या वर्षी १७ फेब्रुवारी ते आठ एप्रिल या कालावधीत देशभरातल्या १५ शहरांमध्ये हे
नाट्य ऑलिम्पिक होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा, नॅशनल स्कूल
ऑफ ड्रामा - एनएसडीचे अध्यक्ष रतन थिय्यम आणि संचालक डॉ. वामन केंद्रे यांनी ही घोषणा
केली. १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत या नाट्य ऑलिम्पिकचं उद्घाटन होणार असून, आठ एप्रिलला
मुंबईत समारोप होणार आहे. या दोन महिन्यांच्या नाट्यमहोत्सवामध्ये ५०० नाटकांबरोबर
सुमारे ७०० कलाकृतींचे प्रयोग केले जातील.
****
राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मुंबई, सातारा,
उस्मानाबाद इथं पाऊस सुरु आहे. नाशिक शहरात काल रात्रीपासून संततधार सुरु असल्यानं
गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
असल्यानं आपत्ती विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोकण रेल्वे मार्गावर कणकवली सिंधुदुर्ग
दरम्यान बोर्डवे इथं पावसामुळे रुळावर माती आल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली
आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र अद्याप जास्त प्रमाणात पाऊस पडला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासात नऊ पूर्णांक
९७ मिली मीटर पावसाची नोंद झाली.
****
लातूर इथं आज शिवसेनेच्या वतीनं अमरनाथ यात्रेवर झालेल्या
दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शहरातल्या गांधी चौकात दहशतवाद्यांविरुद्ध घोषणाबाजी
करण्यात आली.
****
औरंगाबाद शहरात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रादेशिक
परिवहन अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. विविध नियमांचा भंग केल्यानंतर त्यानुसार दंड आकारण्यात
येणार आहे.
****
No comments:
Post a Comment