Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
ठळक बातम्या
** खाद्य तेलांवरचं आयात शुल्क वाढवण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी
** गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जल आराखडा, राज्य सरकारला सादर
** खोटी गृह निर्माण संस्था स्थापन करून शासनाचा
भूखंड मिळवल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासह
१७ जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
** राज्याच्या अनेक भागात पावसाचं
पुनरागमन; मराठवाड्यातही चांगला पाऊस
** आणि
** नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या
थेट खरेदीला सुरुवात
****
राज्यात तेलबियांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं खाद्य तेलांवरचं आयात शुल्क वाढवावं, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. क्रूड पाम तेलावरचं आयात शुल्क गेल्या दोन
वर्षांपासून साडेसात ते साडेबारा टक्के असून, हे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे कच्च्या खाद्य तेलावरचं
आयात शुल्क ३५ टक्के तर रिफाईंड खाद्य तेलावरचं आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवावं,
असं मुख्यमंत्र्यांनी वाणिज्य मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आयात शुल्कात वाढ केल्यामुळे सरकारवर बोजा न पडता, आठ हजार कोटी रुपये अबकारी शुल्क मिळेल, असंही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात
नमूद केलं आहे.
****
राज्यातल्या १२ जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची भीती निर्माण झाली असून, सरकारनं
दुबार पेरणीकरता शेतकऱ्यांना खते आणि बियाणं मोफत पुरवण्याची तसंच पतपुरवठ्यासंदर्भात
मदत करण्याची तयारी सुरू करावी, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते.
पीक कर्ज वितरण तसंच सरकारकडून पेरणीसाठी जाहीर दहा हजार रुपये अनुदान योजनेच्या संदर्भात तूर्तास मिळणारी माहिती समाधानकारक नसल्याचं, विखे पाटील म्हणाले. जुलैच्या मध्यापर्यंत अनेक बॅंकांनी कर्ज वितरणाचं जेमतेम ५० टक्के उद्दीष्ट गाठलं असून, योजनेंतर्गत जेमतेम एक कोटी रूपये वितरण झाल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी,
राज्य सरकार नवे दिशा निर्देश जारी करण्याचा विचार करत असल्याचं शासनाच्या एका वरिष्ठ
अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. २००८ साली
तत्कालीन सरकारनं दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची योग्य अंमलबजावणी
व्हावी, आणि गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी नवीन दिशानिर्देश जारी करणार
असल्याचं या अधिकाऱ्यानं, पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
****
गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जल आराखडा, समितीचे अध्यक्ष के पी बक्षी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल सादर केला. राज्यातल्या इतर खोऱ्यांचेही आराखडे तयार करुन, राज्याचा संपूर्ण एकात्मिक जल आराखडा तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. एखाद्या खोऱ्याचा असा अभ्यासपूर्ण आराखडा बनवणारे महाराष्ट्र हे देशातलं आघाडीचं राज्य असून, महाराष्ट्रातला ही अशा प्रकारचा हा पहिलाच आराखडा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मुंबईच्या ओशिवरा भागात तुलसी
कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावानं खोटी गृह निर्माण संस्था स्थापन करून, शासनाचा भूखंड प्राप्त करत त्यावर इमारत बांधल्या प्रकरणी राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासह १७ जणांविरोधात राज्य लाच लुचपत
प्रतिबंधक विभागानं काल फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हे दाखल झालेल्या इतर आरोपींमध्ये मुंबई गृहनिर्माण
आणि क्षेत्रविकास मंडळासह विविध विभागाचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या
इमारतीवर छापा टाकत महत्वाचे दस्तऐवज आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र
सदन घोटाळा तसंच बेनामी संपत्ती बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अंमलबजावणी
संचनालय आणि आयकर विभागानं भुजबळ कुटूंबियांविरूद्ध यापूर्वी कारवाई केली आहे. याप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ सध्या
कारागृहात आहेत.
****
राज्यातल्या कारागृहांमधल्या अनागोंदीसंदर्भात न्यायालयीन चौकशी करून, दोषींवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. भायखळा तुरुंगातलं मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण, नागपूर कारागृहात कैद्यांकडे शेकडो मोबाईल सापडणं, कारागृहातल्या महिला अधिकाऱ्यांचं लैंगिक शोषण, असे अनेक प्रकार समोर येत असून, यासंदर्भात अद्याप कोणतीही चौकशी झाली नसल्याचा आरोप मलिक यांनी केला.
गोमांस बाळगल्याच्या संशयावरून होणाऱ्या मारहाणीच्या
घटनांच्या संदर्भात बोलताना मलिक यांनी, रेडा तसं म्हैस या प्राण्यांचं मांसही बीफ
या प्रकारात मोडतं, आणि त्यावर बंदी नाही, याबाबत सरकारनं जनजागृती करावी, असं म्हटलं
आहे.
दरम्यान, मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी काल महिला खासदारांच्या पथकानं भायखळा तुरुंगाला भेट देऊन, कैद्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
****
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातले अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई
करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. २०११
ते २०१५ या कालावधीत एका अमेरिकन कंपनीनं महामार्ग प्राधिकरणातल्या अधिकाऱ्यांना सुमारे
दहा लाख अमेरिकन डॉलर्स एवढी लाच दिल्याचा ठपका अमेरिकेतल्या न्याय विभागानं ठेवला
आहे. यासंदर्भात महामार्ग प्राधिकरणानं चौकशी सुरू केली आहे.
****
राज्याच्या अनेक भागात पावसानं
काल पुनरागमन केलं. मराठवाडा, विदर्भ, खानदेशासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. नाशिक शहर परिसरात काल रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
मराठवाड्यात औरंगाबाद,
बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसानं काल
हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरात काल सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, काल दुपारनंतर
पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उस्मानाबाद शहर परिसरात रिमझिम सरी कोसळल्या मात्र
ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. परभणी शहर परिसरात रात्री उशीरा
सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातही अनेक भागात जोरदार पाऊस झाला.
जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पावसानं समाधानकारक हजेरी लावल्याचं वृत्त आहे. नांदेड
तसंच बीड जिल्ह्यात अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान पुढच्या चार
दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
****
भारतीय स्टेट बँकेनं आपल्या नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर
-एनईएफटी तसंच रियअल टाईम ग्रॉस सेटलमेंट-
आरटीजीएस या आंतरबँक निधी हस्तांतरण करण्याच्या सुविधांच्या शुल्कात ७५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय
घेतला आहे. याशिवाय
एक हजार रूपयांपर्यंत इमेडिएट पेमेंट सेवा- आयएमपीएसच्या माध्यमातून पैसे दुसऱ्या खात्यात
पाठवण्यासाठीचं शुल्क रद्द केलं आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होतील. इंटरनेट तसंच मोबाईल
बँकिंग वापरणाऱ्या सुमारे पाच कोटी २७ लाख ग्राहकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
****
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची
भाषा विषयांची २० गुणांची तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळानं
काल घेतला. यामुळे आता भाषा विषयाची लेखी परीक्षा ही १०० गुणांची असणार आहे.
****
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या
थेट खरेदीला काल नागपूरजवळ हिंगणा इथं सुरुवात झाली. हिंगणा तहसील कार्यालयात सार्वजनिक
बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण
कुरुंदकर यांनी पहिल्या काही खरेदी खतांवर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रकल्पासाठी जमीन
देणारे पहिले शेतकरी राम साहू यांची अंदाजे सव्वा हेक्टर जमीन शासनाने ५९ लाख ११ हजार
रुपयांना खरेदी केली. या वेळी १२० शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या प्रकल्पाला देण्यासाठी
इरादापत्रेही दिली.
****
लातूर इथल्या माहेर अस्थिव्यंग
मुलीच्या निवासी विद्यालयातल्या मुलींनी आणि शिक्षकांनी त्यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी
काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर थाळी वाटी वाजवून
आंदोलन केलं. गेल्या अकरा महिन्यांपासून प्रलंबित असलेले शिक्षकांचे पगार करावे, विद्यार्थ्यांचं
पालनपोषण अनुदान द्यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी इथं
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाल्याच्या घटनेला काल एक वर्ष झालं. या
अनुषंगानं काल मराठवाड्यात ठिकठिकाणी मूक मोर्चे काढून पीडितेला श्रद्धांजली अर्पण
करण्यात आली.
****
शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी आवश्यक असणारी शिक्षक पात्रता परीक्षा येत्या २२
जुलैला होणार असून, त्यासाठी राज्यभरातून दोन लाख ९७ हजार २५४ अर्ज आले आहेत.
****
No comments:
Post a Comment