Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 9 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
***
विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देणं महत्वाचं असल्याचं प्रतिपादन
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. ई शिक्षणाला चालना देण्यासाठी स्वयम, स्वयं
प्रभा आणि राष्ट्रीय शैक्षणिक संकलन या तीन डिजिटल उपक्रमांना
आज राष्ट्रपतींच्या हस्ते सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
२०२० पर्यंत उच्च शिक्षणात प्रवेश वाढवणं, हे या उपक्रमाचं उद्दीष्ट आहे. तळागाळातल्या
लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराची
आवश्यकता राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केली.
स्वयम उपक्रमाअंतर्गत इयत्ता नववी पासून ते पदव्यूत्तर पर्यंत सर्व
अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध करुन दिला जाणार आहे. स्वयं प्रभा अंतर्गत ३२ डीटीएच वाहिन्यांच्या माध्यमातून चोवीस तास उच्च शिक्षणाचे कार्यक्रम प्रसारित करण्यात
येणार आहेत. तर राष्ट्रीय शैक्षणिक संकलन उपक्रमात ऑनलाईन शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना
प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या अंमलबजावणीत काही अडचणी येत असतील, तर त्या
लवकरच दूर केल्या जातील, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू
यांनी म्हटलं आहे. ते आज चेन्नई इथं जीएसटीवर आधारित परिषदेत बोलत होते. जीएसटी हे
भ्रष्टाचार कमी करण्यासाठी एक महत्वाचं साधन असल्याचं ते म्हणाले.
****
‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजनेच्या’ माध्यमातून ३४ हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी कुठलीही अट न ठेवता सरसकट देण्यात आली असून, यामुळे
दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या ८२ टक्के
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘मी
मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी योजनेविषयी ते आज
बोलत होते. या योजनेचा खऱ्या शेतकऱ्यांना लाभ
मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणार
असल्याचं ते म्हणाले. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असं त्यांनी सांगितलं. सर्वात मोठी कर्जमाफी देणारं
महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमू्द केलं.
****
शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीच्या योजनेत भ्रष्टाचार होऊ नये, आणि
गरजु व्यक्तींनाच याचा लाभ मिळावा
यासाठी राज्य सरकार आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कर्जमाफी योजना राबवणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी सांगितलं आहे. कर भरण्यात परदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी
राज्य सरकार डिजिटल पद्धतीचा अवलंब करणार असल्याचंही ते म्हणाले.
****
लेखकाची
बांधिलकी कोणत्या वर्गाशी आहे, ही बाब महत्त्वाची असल्याचं, प्रसिद्ध लेखक तथा डॉ बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांनी म्हटलं आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आज औरंगाबाद इथं आयोजित लक्ष्मीकांत देशमुख यांच्या
समग्र साहित्यावरच्या चर्चासत्राच्या उद्घाटनपर बीजभाषणात कोत्तापल्ले बोलत होते. दिवसभर
चाललेल्या या चर्चासत्रात देशमुख यांच्या साहित्यावर मान्यवरांनी निबंध सादर केले.
****
आषाढी
एकादशीसाठी राज्यभरातून पंढरपूर इथं गेलेल्या पालख्या तसंच दिंड्यांचा परतीचा प्रवास
आजपासून सुरू झाला. संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं दुपारी बारा वाजेच्या सुमारास पैठणकडे
प्रस्थान केलं. दहा दिवसांचा पायी प्रवास करून, ही पालखी येत्या एकादशीला पैठणला पोहोचेल.
****
चार हजार चारशे अकरा अमरनाथ यात्रेकरुंची दहावी तुकडी आज पहाटे
कडक सुरक्षे व्यवस्थेखाली जम्मूहून रवाना झाली. १४० वाहनांच्या या तुकडीत तीन हजार
३१६ पुरुष, ७६३ महिला आणि ३३२ साधुंचा समावेश आहे.
****
जम्मू
काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून
भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे दोन जवान ठार झाले. तर पाकिस्तानच्या
५ नागरिकांचाही मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. भारताने पाकिस्तानच्या काही चौक्याही उद्धवस्त
केल्या असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ
अभिनेत्री सुमिता सन्याल यांचं आज सकाळी कोलकाता इथं निधन झालं, त्या ७१ वर्षांच्या
होत्या. सुमिता सन्याल यांनी अनेक बंगाली तसंच हिंदी चित्रपटातून भूमिका साकारल्या.
आनंद, गुड्डी, मेरे अपने, आदी हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका विशेष प्रसिद्ध
आहेत.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज टी ट्वेंटी क्रिकेट सामना
होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. सामन्यासाठी
वेस्ट इंडिजनं ख्रिस गेलचा संघात समावेश केला आहे.
****
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी आलेल्या अर्जावर
विचार करण्यासाठी क्रिकेट सल्लागार समितीची उद्या मुंबईत बैठक होणार आहे. या पदासाठी
रवी शास्त्री, वीरेंद्र
सेहवाग, टॉम मूडी, यांच्यासह दहा उमेदवारांनी अर्ज केला आहे
****
No comments:
Post a Comment