Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
पंढरपूर इथं आज काल्याच्या
प्रसादानं आषाढी वारीची सांगता झाली. राज्यभरातून आलेल्या संतांच्या पालख्या तसंच दिंड्या
गोपाळपुरात काल्याच्या प्रसादासाठी दाखल झाल्या होत्या. पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांच्या
पालखी सोहळ्याची पांडुरंगाच्या मुख्य मंदिरासमोर काल्याच्या प्रसादानं सांगता झाली,
दुपारी बारा वाजेच्या दरम्यान पालखी परतीच्या प्रवासासाठी पैठणकडे मार्गस्थ झाली.
****
गुरुपौर्णिमा आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त सोलापूर जिल्ह्यातल्या
श्रीक्षेत्र अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात आज पहाटे काकडा
आरती करण्यात आली. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
अहमदनगर
जिल्ह्यात शिर्डी इथं भाविकांनी मध्यरात्रीपासूनच साईबाबांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या
आहेत. विश्वस्त मंडळाच्या वतीनं भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या
इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचं
वेळापत्रक जाहीर झालं आहे. तोंडी परीक्षा उद्या १० जुलै पासून, तर लेखी परीक्षा १८ जुलै पासून सुरु
होणार आहे. शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली.
****
राज्यात ६ ते १४ वर्षे वयोगटातली ६४ हजार मुले शाळाबाह्य असल्याची माहिती राज्य
सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केली
आहे. यासंदर्भात न्यायालयात दाखल एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं सरकारकडे ही माहिती मागितली होती. मात्र, केवळ या वयोगटाच्या सर्वेक्षणानं शाळाबाह्य मुलांचं चित्र स्पष्ट होत
नसल्यानं,
३ ते ६ वर्षे वयोगटातल्या मुलांचं सर्वेक्षण आवश्यक असल्याचं या याचिकेत
म्हटलं आहे, त्यानुसार न्यायालयानं आता ३ ते ६ वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
****
शिक्षणाकरता सरकारकडून शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या मुलींच्या
लग्नाकरता देखील ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजना सुरु करत असल्याचं केंद्रीय
अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं आहे. ते हैदराबाद इथं बोलत
होते. देशातल्या १०० ठिकाणी लवकरच कौशल्य विकास केंद्रं सुरु करण्यात येतील, तसंच वस्तू
आणि सेवा करासंदर्भातलं प्रशिक्षणही त्यात देण्यात येईल, असं नक्वी यांनी सांगितलं.
****
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतल्या एका आरोपीला उत्तर प्रदेशातल्या बिजनौर
जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. कादीर अहमद असं त्याचं नाव असून, कटकारस्थान रचणं
आणि ज्वलनशील पदार्थ तसंच बंदी असलेली शस्त्रास्त्र बाळगण्याचा त्याच्यावर आरोप आहे.
गुजरातच्या जामनगर इथल्या न्यायालयानं १९९५ मध्ये त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं
होतं.
****
औरंगाबाद
हिस्ट्री सोसायटीच्या वतीनं ऐतिहासिक औरंगाबाद लेणीवर आज हेरिटेज वॉक घेण्यात आला.
इतिहास संशोधक डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी आणि पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डॉ.
शिवाकांत वाजपेयी यांनी इतिहासप्रेमी नागरिकांना लेणीच्या स्थापत्यकलेची माहिती दिली.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी स्वच्छता मोहिमही राबवली.
****
आगामी
दोन महिन्यात शेतकर्यांच्या मालाला बाजारात चांगला भाव कसा मिळेल यासाठी प्रामाणिक
प्रयत्न करू अशी ग्वाही राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे.
बीड इथं राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी
त्यांनी कृषी आयोग आणि शेती उत्पादन या विषयावर आपली भूमिका मांडली.
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीत जुलै आणि ऑगस्ट २०१६ मध्ये विक्री
केलेल्या कांद्याचं अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक
खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी
दिली आहे. कांदा अनुदानाबाबत काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी बाजार समितीत संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
नागपूर
इथं आयोजित
आंतरराष्ट्रीय पुल आणि बोगदे बांधकाम परिषदेचा आज समारोप होत आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रातले ४५०
प्रतिनिधी या
परिषदेला उपस्थित आहेत. काल या परिषदेत पहिल्या
सत्राचं उद्घाटन राज्याचे
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते
झालं, यावेळी
बोलताना पाटील यांनी, पुलांची निर्मिती करताना
टिकाऊपणावर भर द्यावा, अशी सूचना केली.
****
लंडन
इथं सुरु असलेल्या विम्बम्डन खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा
आणि तीची जोडीदार बेल्जिअमची क्रिस्टन प्लिपकेन्स महिला दुहेरी प्रकारात उप उपान्त्य
फेरीत पोहोचल्या आहेत. उपउपान्त्य फेरीत त्यांचा सामना मार्टिना हिंगिस आणि चान यंग
जान यांच्याविरुद्ध होणार आहे. सानिया मिश्र दुहेरीच्याही उपउपान्त्य फेरीत पोहोचली
आहे.
****
No comments:
Post a Comment