Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
ठळक बातम्या
****
** दुबार
पेरणीसाठी सरकारकडून बियाणांची व्यवस्था - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
**
जात पंचायतविरोधी
कायद्याची अधिसूचना काल राज्य सरकानं जारी
**
शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहिल्यामुळेच
सरकारची कर्जमुक्तीची घोषणा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
आणि
**
राज्य सहकारी
बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांचं निधन
****
राज्यात
पावसानं पाठ फिरवल्यामुळे अनेक भागात दुबार पेरणीचं संकट ओढवलं असून येत्या दोन - तीन
दिवसात पाऊस न झाल्यास जवळपास १५ टक्के क्षेत्रात दुबार पेरणी करावी लागेल, अशी शक्यता
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.
जून
महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ४० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली
होती., असं सांगत दुबार पेरणीसाठी सरकारकडून बियाणांची व्यवस्था केली असल्याचं त्यांनी
सांगितलं. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पेरणी झालेल्या भागात पंचनामे करण्यास प्रारंभ
केला असल्याचं ते म्हणाले.
****
एखाद्या गुन्ह्यात शिक्षा
झालेल्या आमदार आणि खासदारांना आजीवन निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यात यावा, या मुद्द्यावर
निवडणूक आयोगानं काहीही भूमिका न घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त
केली आहे. हे संसदेचं कार्यक्षेत्र असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय याबाबत आदेश देऊ शकत
नाही, अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे. निवडून येणाऱ्या प्रतिनिधींना किमान शिक्षणाची
आणि वयाची अट घालण्यात यावी, अशा आशयाच्या एका जनहितार्थ याचिकेच्या सुनावणी दरम्यान,
सर्वोच्च न्यायालयानं
ही नाराजी व्यक्त केली. या याचिकेची पुढील
सुनावणी येत्या १९ तारखेला ठेवण्यात आली आहे.
****
येत्या चोवीस तारखेपासून सुरू होत असलेल्या, राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चार अध्यादेश, पाच प्रस्तावित अध्यादेश,
सात प्रलंबित विधेयकं आणि तेरा नवीन विधेयकांसह, अन्य काही प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर
ठेवले जातील अशी अपेक्षा आहे. विधीमंडळ कार्यमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. तीन आठवड्यांच्या कालावधीत या अधिवेशनात १५ दिवस कामकाज होणं अपेक्षित आहे.
****
आधार कार्डशी संबंधित सर्व प्रकरणांची सुनावणी पाच न्यायाधीशांचं
घटनापीठ करेल, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. विविध कल्याणकारी योजनांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या सरकारच्या
निर्णयाला आव्हान देणाऱ्या, सगळ्या याचिकांची सुनावणी हे घटनापीठ
येत्या अठरा तारखेला करेल. माहितीच्या खाजगीपणाचा अधिकार, हा मुद्दाही या सुनावणीदरम्यान
विचारात घेतला जाणार आहे.
****
तुरूंग
आणि न्यायालयं यांच्यात दूर दृष्य संवाद प्रणाली नुसती सुरू करू नका, तर गरजेनुसार
ती वापरता येईल, याकडेही लक्ष द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य
सरकारला दिले. औरंगाबाद शस्त्रास्त्र प्रकरणातला आरोपी शेख नईमनं, सुरक्षे
अभावी न्यायालयात हजर न केल्याबद्दल दाखल केलेल्या अर्जाची सुनावणी करताना, न्यायालयानं
हे निर्देश दिले. येत्या ऑक्टोबर पर्यंत राज्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये दूर दृष्य
संवाद प्रणाली उभारण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं यापूर्वीच राज्य सरकारला
दिले आहेत. राज्यात ५८३ न्यायालयांमध्ये अशी प्रणाली सुरू करण्यात आली असून, त्यापैकी
फक्त ६३ न्यायालयांमध्येच ती कार्यान्वित
आहे. राज्य सरकारनं आपलं म्हणणं येत्या दोन आठवड्यात मांडावं, असे
आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
जात
पंचायतविरोधी कायद्याची अधिसूचना काल
राज्य सरकानं जारी केली. ४ जुलैपासून हा कायदा राज्यात लागू
झाला आहे. जातपंचायतीचं दबावतंत्र वापरून एखाद्या व्यक्तीस बहिष्कृत केल्यास, संबंधितांना
तीन वर्षांची शिक्षा, आणि एक लाख रुपये दंडाची
तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. सामाजिक बहिष्कार टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची
नेमणूक करण्यात आली असून, जात पंचायतीच्या बैठकांना प्रतिबंध करण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात
आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या बाबत जनजागृती मोहीम राबवली होती.
****
परदेशात मागणी असलेल्या द्राक्षाचे नवीन वाण राज्यातल्या शेतकऱ्यांना
उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासंदर्भात काल कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या
उपस्थितीत कृषी आणि अन्न प्रक्रिया उत्पादक निर्यात विकास प्राधिकरण -अपेडा, महाराष्ट्र
द्राक्ष बागायतदार संघ, द्राक्ष संशोधन केंद्राचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईत
बैठक झाली. हे वाण राज्यात उपलब्ध होण्याकरिता इच्छुकांकडून निविदा मागविण्याकरिता
द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे जागतिक स्तरावर निविदा काढण्यात येणार असल्याचं फुंडकर
यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय बाजारात राज्यातून दोन लाख मेट्रीक टन द्राक्षांची दर
वर्षी निर्यात केली जाते.
****
शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना
खंबीरपणे उभी राहिल्यामुळे सरकारला कर्जमुक्तीची घोषणा करावी लागली. असं शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या
सभेत काल ते बोलत होते. गरिबांचा आवाज म्हणून शिवसेना सत्तेत असल्याचं त्यांनी स्पष्ट
केलं. ज्या ३६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, त्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी
करत शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला सरकार का मागं पुढं पाहत आहे? असा सवालही ठाकरे यांनी
यावेळी केला.
ठाकरे यांनी काल जळगाव
जिल्ह्यातल्या पाळधी इथं शेतकऱ्यांशी संवाद साधतांना आपण सत्तेशी नव्हे तर शेतकऱ्यांशी
बांधिल असल्याचं सांगितलं.
****
सततच्या दुष्काळाला कंटाळलेल्या शेतकऱ्याला नियमांच्या
बंधनात न अडकवता, सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी, जालना जिल्ह्यातल्या रेवगाव इथल्या
शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली
आहे. गेल्या पाच वर्षांपासून सतत पाऊस नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, त्याला
अटी आणि शर्तीमध्ये अडकवू नये, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
राज्य सहकारी बँकेचे
माजी अध्यक्ष सहकार महर्षी रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांचं काल लातूर जिल्ह्यातल्या तळेगाव इथं निधन झालं. महाराष्ट्र
राज्य कृषी आणि विपणन महासंघाचं संचालक, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. उदगीर खरेदी
विक्री संघाचे संस्थापक संचालक तसंच यशवंत अर्बन बँकेचे संचालकपदही त्यांनी भूषवलं
होतं. आज दुपारी एक वाजता तळेगाव इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहेत.
****
छोट्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून, कृषीविषयक धोरण ठरवण्याची गरज असल्याचं
मत, शेती विषयाचे अभ्यासक, पत्रकार सुनील तांबे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल
औरंगाबाद इथं, ‘शेतकऱ्यांची आंदोलनं आताच का?‘, या विषयावरच्या व्याख्यानात बोलत होते. साखर कारखान्यांप्रमाणे सामुहिक शेतीचा प्रयोग राबवल्यास, शेतकऱ्यांच्या
परिस्थितीत बदल होईल, अशी आशा त्यांनी
व्यक्त केली. कृषी क्षेत्रातल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतीचं उत्पादन वाढलं असलं,
तरी शेतकऱ्यांचं
उत्पन्न वाढलं नसल्याचं मतही
त्यांनी यावेळी नोंदवलं.
****
कर्जमाफीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असून राज्यातल्या सर्व
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार असल्याचं काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं. सरकारच्या कर्जमाफी विरोधात काँग्रेस
पक्षानं कालपासून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या राज्यव्यापी आंदोलनाची बुलढाणा इथं
सुरुवात केली, त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका
केली.
****
९ ऑगस्टला मुंबईत काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या
प्रचाराची सुरूवात काल औरंगाबाद इथं करण्यात आली. आरक्षण आणि इतर मागणीसाठी निघणाऱ्या
या मोर्चात सहभाग वाढवण्याकरता प्रचार रथ तयार करण्यात आला असून हा रथ महाराष्ट्रभर
फिरणार आहे.
****
महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत काल इंग्लंड
मधल्या ब्रिस्टॉल इथं, ऑस्ट्रेलिया संघानं भारतीय संघाचा आठ गडी राखून पराभव केला.
भारतानं प्रथम फलंदाजी करत, पूनम राऊतच्या शतकाच्या जोरावर ५० षटकात २२६ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियानं हे आव्हान ४६ व्या षटकातचं पूर्ण केलं.
दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली
राज महिलांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज
बनली आहे. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाबरोबर काल झालेल्या सामन्यात, मितालीनं सहा हजार
धावांचा टप्पा पूर्ण करत विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या शार्ले
एडवर्डच्या नावावर होता. मितालीनं १६४ डावांमध्ये सहा हजार धावांचा टप्पा गाठला.
****
डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या, विविध प्रवर्गातल्या अधिसभा सदस्य निवडणुकीसाठी,
मतदार नोंदणीची मुदत, येत्या १९ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment