Wednesday, 16 August 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 16 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****
केंद्रीय मंत्रिमंडळानं आज माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी एकच स्थायी निधी कोष उभारण्याला मान्यता दिली आहे. या निधीमुळे खर्च करण्याची कोणतीही मर्यादा राहणार नाही. माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी मिळालेले कर या खात्यात जमा करुन, हा निधी शिक्षण क्षेत्रातल्या विविध योजनांसाठी वापरला जाऊ शकेल. देशभरातल्या माध्यमिक आणि उच्च शिक्षणातल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

****
जम्मू-काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा गोळीबार केला. आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास मेंधर परिसरातल्या मानकोटे क्षेत्रात भारतीय छावण्या आणि निवासी भागात नियंत्रण रेषेपलिकडून गोळीबार करण्यात आल्याचं संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. यात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

****
देशातल्या ग्रामीण भागातले पोस्टमन आणि इतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेल्यानं ग्रामीण पोस्ट खातं ठप्प झालं आहे. कमलेश चंद्र आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करा, ग्रामीण भागामध्ये पोस्ट खात्यात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आणि पेन्शन लागू करावी या आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

****
सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएला केरळमधल्या हिंदू महिलेच्या धर्मांतर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. केरळमधल्या शफीन जहान यानं एका हिंदू महिलेशी विवाह केला होता. त्यानंतर त्या महिलेनं इस्लाम धर्म स्वीकारला होता. मात्र, केरळ उच्च न्यायालयानं त्यांचा हा विवाह नामंजूर केला होता. या निर्णयाला संबंधित व्यक्तीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं एनआयएला चौकशीचे आदेश दिले.

****
बैलगाडा शर्यत क्रूर खेळ असल्याचं सांगून सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं या शर्यतींना परवानगी देण्यास मनाई केली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आयोजकांना आता राज्यात कुठेही बैलगाडा शर्यतींचं आयोजन करता येणार नाही. राज्य सरकारनं अधिसूचना काढली असली, तरी शर्यतीदरम्यान बैलांना इजा होणार नाही याबाबत सरकार नियमावली तयार करत नाही, तोपर्यंत शर्यतींसाठी परवानगी देता येणार नाही. राज्य सरकारनं यासंदर्भात दोन आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे. बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. अजय मराठे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

****
लातूर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या फक्त ३८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकासाठी मांजरा प्रकल्पातून पाणी सोडावं, अशी मागणी मराठवाडा विकास मंडळ आणि लातूर, उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बी. बी. ठोंबरे यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे केली आहे. मांजरा धरणातून लातूर, कळंब, अंबाजोगाई, आदी शहरांचा पाणीपुरवठा होत असल्यानं, त्यासाठी वार्षिक २५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे खरीपासाठी उपयुक्त ४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडल्यानंतरही वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याचं ठोंबरे यांनी पालकमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****
महिला शौचालय वेळेत न बांधता शासनाकडून मिळालेल्या तब्बल पावणे तीन लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा प्रकार धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या किरकवाडे ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरपंच आणि ग्रामसेवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निधी मिळून देखील प्रत्यक्ष गावात शौचालय वेळेत न बांधता तो निधी खासगी कामासाठी वापरल्याचं चौकशीत उघड झालं आहे.

****
मराठवाड्यातल्या संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन करुन मराठवाड्याची गुणवत्ता सिद्ध करावी, असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर बी. ए. चोपडे यांनी केलं आहे. विद्यापीठाच्या उस्मानाबाद इथल्या उपकेंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उस्मानाबाद उपकेंद्राला लवकरच पूर्णवेळ संचालक नियुक्त केले जाणार असून, उपकेंद्रातल्या सोयी सुविधा, तसंच पूर्णवेळ प्राध्यापक नियुक्तीसाठीही प्रयत्न केले जातील, असं कुलगुरु यावेळी म्हणाले. यावेळी माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****
नागपूर-मुंबई-नागपूर नंदिग्राम एक्सप्रेसला नांदेडच्या किनवट तालुक्यातल्या बोधडी बुजुर्ग इथं थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतला आहे. हा थांबा सहा महिन्याच्या कालावधीसाठीच असेल, असं दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...