Wednesday, 16 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 16.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जून महिन्यात १७ दिवस पाऊस झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण घसरलं आहे. विभागात आतापर्यंत ६० टक्केही पाऊस झाला नाही.

पावसाने मोठी विश्रांती घेतल्यामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील खरिपाची पिके संकटात सापडली आहेत. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांत तुलनेत पावसाच्या नोंदी चांगल्या असल्या, तरी पावसात खंड पडल्यामुळे पेरण्या वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, येत्या चार दिवसांत मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणेनं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आर्थिक सहकार्य देण्याच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी आज श्रीनगर आणि उत्तर काश्मीरमधल्या १२ ठिकाणी छापे घातले. अजूनही ही छापेमारी सुरु असून, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केल्याचं वृत्त नाही. काही फुटिरतावादी गट काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून पैसे घेऊन, दहशतवाद्यांना पुरवत असल्याप्रकरणी हा तपास सुरू आहे.

****

कनिष्ठ न्यायालयातल्या नियुक्त्या जास्त पारदर्शक करण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या पुढाकाराचं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कौतुक केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. या प्रस्तावित मध्यवर्ती निवड यंत्रणेला विरोध करणाऱ्या राज्यांनी याबाबतच्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

बिहारमध्ये पूरपरिस्थिती अद्याप गंभीर असून, पुरासंबंधी घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या ९१ वर पोहोचली आहे. राज्यातल्या १२ जिल्ह्यातल्या ९६ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. नेपाळमधल्या मुसळधार पावसामुळे बिहारमधल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं पूर परिस्थितीत सुधारणा होत आहे.

****

बैलगाडा शर्यतीसंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यावर न्यायालयानं बैलगाडा शर्यतीला मनाई कायम ठेवत यावरील सुनावणीला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. बैलगाडा शर्यतीबाबत नियमावली तयार करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.

****

लहान मुलांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल या धोकादायक ऑनलाईन खेळाच्या सर्व लिंक्स ताबडतोब हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं गुगल, फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, मायक्रोसॉफ्ट आणि याहू या कंपन्यांना दिले आहेत. कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या सूचनेनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं या कंपन्यांना यासंदर्भात पत्र पाठवलं आहे.

****

उत्तराखंडमधल्या मालपा इथं ढगफुटीच्या घटनेतल्या मृतांची संख्या आता २५ वर पोहोचली आहे. यामध्ये सात जवानांचा समावेश आहे. या भागातल्या अनेक व्यक्ती अजूनही बेपत्ता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची भिती वर्तवण्यात येत आहे.

****

औरंगाबादच्या जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या आरोग्य सेवक आणि नियमित क्षेत्र कर्मचारी पदाच्या लेखी परिक्षेची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांना येत्या रविवारी सकाळी नऊ वाजता सिडकोतल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात नियुक्ती आदेश आणि पदस्थापना देण्यात येणार आहे. जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.  

****

गायक, बंदिशकार डॉ. स. भ. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारोह शास्त्रीय संगीत सभेने होणार असून, शनिवारी सायंकाळी सरस्वती भुवनच्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीत हा कार्यक्रम होईल. यावेळी डॉ. मोहन देशपांडे आणि डॉ. अलका देव - मारुलकर यांचं गायन होणार आहे.

****

राज्यातल्या वास्तूशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करेल असं आश्वासन औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिलं आहे. औरंगाबाद इथल्या वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी शहरातल्या सलीम अली सरोवरासह तीन ठिकाणी स्वकल्पनेतून सुशोभीकरण केलं, काल त्याची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री कदम बोलत होते. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करुन हे सुशोभीकरण केल्याबद्द्ल कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं. हा प्रकल्प सर्वांसाठीच आदर्श असल्याचं ते पुढं म्हणाले.

****

भारत आणि नेदरलँडदरम्यान झालेली दोन हॉकी सामन्यांची मालिका भारतानं दोन - शून्यनं जिंकली आहे. या मालिकेतल्या विजयामुळे जागतिक हॉकी क्रमवारीत भारताचा संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...