Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 AUG. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
****
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची
आज मुंबई इथं बैठक सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित आहेत.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसह आगामी सर्व निवडणुका भाजप जिंकेल, असा विश्वास दानवे
यांनी यावेळी व्यक्त केला.
****
अमेरिकेनं पाकिस्तानात सक्रिय असलेली
दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं या संघटनेवर अनेक निर्बंध लादले असून, त्यांची अमेरिकेत
असलेली संपत्ती जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या संघटनेकडून काश्मीरमध्ये
अनेक दहशतवादी कारवाया सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं हा निर्णय घेतला. भारतानं
या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या
तरुण व्यापार्यांसोबत नवीन भारताच्या निर्माणासंबंधी चर्चा करणार आहेत. ही चर्चा वर्ष
२०२२ पर्यंत नवीन भारत निर्माण, डिजिटल इंडिया, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकासावर
केंद्रीत असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आसाममध्ये पूर परिस्थिती कायम असून, पुरासंबंधी
घटनांमध्ये मृत व्यक्तींची संख्या आता ४० वर पोहोचली आहे. जिल्ह्यातल्या ३४ लाख लोकांना
पुराचा फटका बसला आहे.
बिहारमध्येही मुसळधार पाऊस सुरु असून,
१४ जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ओडीशामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त
करण्यात आला आहे.
दरम्यान, आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये
आलेल्या पुरामुळे पूर्व भारतात जाणार्या सगळ्या रेल्वे गाड्या २० ऑगस्ट पर्यंत रद्द
करण्यात आल्या आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ ऑगस्टला
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या श्रृंखलेचा
हा ३५वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य
शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम वर
किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या लोअर दूधना धरणाच्या
क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या उजव्या कालव्याला तीन ठिकाणी मोठं भगदाड
पडलं आहे. यामुळे डिग्रस ईथल्या शेतक-यांच्या शेतातली माती दूरवर वाहून गेल्यानं नुकसान
झाले आहे. अशा प्रकारचं काम करणा-या ठेकेदारांची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी करत
आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात बंधार्यांची कामं
हाती घेताना टँकरग्रस्त गावांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री रामदास कदम
यांनी दिले आहेत. ते औरंगाबाद इथं जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. गावांमध्ये
पाणीवाटप संस्थेनं जबाबदारी घेऊन पाण्याचं योग्य नियोजन करावं, तसंच प्रत्येक गावात
कोल्हापूर बंधा-यांचे दरवाजांची दुरुस्तीवर लक्ष द्यावं, असं कदम यांनी सांगितलं.
****
२०१७-१८ या आर्थिक वर्षात शेतकर्यांना
अल्पकालिन पीक कर्ज घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं
सांगितलं आहे. व्याज सहाय्य योजनेअंतर्गत शेतकर्यांना सवलत देण्यासाठी आधार अनिवार्य
करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना दिले आहेत. बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेत
ही माहिती देण्यात आली.
****
मराठवाड्यात मागील आठ दिवसात ३४ शेतकर्यांनी
आत्महत्या केल्याचं राज्य सरकारच्या अहवालात म्हटलं आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्यानं
खरीप पीकांना धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे या आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज
व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी एक जानेवारी ते १५ ऑगस्ट या कालावधित ५८० शेतकर्यांनी
आत्महत्या केली, त्यात सर्वात जास्त १०७ शेतकरी बीड जिल्ह्यातले असल्याचं विभागीय आयुक्तांनी
संकलित केलेल्या या अहवालात सांगण्यात आलं आहे. मराठवाड्यात यावर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा
खूप कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे विभागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्व
स्तरांतून होत आहे.
****
येत्या २० ते २४ सप्टेंबर दरम्यान पुण्यात
राष्ट्रीय सायकल अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणारा महाराष्ट्राचा
संघ निवडण्यासाठी नाशिकमध्ये येत्या १९ आणि २० तारखेला राज्यस्तरीय खुल्या निवड चाचणी
स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या खेळाडूंनी
आपली नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्हा सचिवांशी संपर्क साधावा, असं
आवाहन महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशननं केलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य तायक्वांदो अजिंक्यपद
स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा सबज्युनिअर आणि ज्युनिअर गटाचा संघ रवाना झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर इथं या स्पर्धा होत आहेत.
****
No comments:
Post a Comment