Sunday, 20 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 20.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                                Language Marathi         

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** उत्तर प्रदेशात उत्कल एक्सप्रेसचे चौदा डबे घसरले; २३ प्रवासी ठार तर, शंभराहून अधिक जखमी

** राज्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाचं पुनरागमन; मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस

** औरंगाबाद महापालिकेत वंदे मातरम च्या मुद्यावरून गदारोळ

आणि

** भारत श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ

****

उत्तर प्रदेशात पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस रेल्वे गाडीचे चौदा डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात २३ प्रवासी ठार तर, शंभराहून अधिक जण जखमी झाले. मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली इथं काल संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी यामागे  घातपाती कारवाया असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

****

दिवाळखोरी कायद्यामुळे कर्ज देणारे आणि घेणाऱ्यांच्या संबंधांमध्ये बदल झाला असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत “दिवाळखोरी कायदा : बदलतं परिदृष्य” या विषयावर आयोजित परिषदेत काल बोलत होते. बुडीत कर्जाची समस्या सोडवून तोट्यात गेलेले उद्योग वाचवणं हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याचं सांगत, जेटली यांनी दिवाळखोरीत असलेल्या कंपन्यांना आश्वस्त केलं. कर्जाऊ रकमा बुडीत होऊ देणारी व्यवस्था बदलली पाहिजे, असंही जेटली म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी यावेळी बोलताना, बुडीत कर्जाच्या समस्येचं निर्धारित वेळेत निराकरण करण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बँकांनी पुनर्भांडवल उपलब्ध करावं अशी सूचना केली. नऊ पूर्णांक सहा दशांश टक्के बुडीत कर्ज असणं हा चिंतेचा विषय असल्याचं पटेल म्हणाले.

****

वस्तू आणि सेवाकर - जीएसटी अंतर्गत विवरणपत्र दाखल करण्यास पाच दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता व्यावसायिकांना येत्या शुक्रवारी पंचवीस ऑगस्टपर्यंत विवरणपत्र दाखल करता येणार आहे. याआधी विवरणपत्र दाखल करण्याची मुदत आज संपणार होती मात्र, काल संबंधित संकेतस्थळावरून विवरणपत्र भरण्यात व्यत्यय येत असल्यानं, मुदतवाढ देण्यात आली.

****

राज्यात येत्या तीन वर्षात सर्व शेतकऱ्यांचे कृषी पंप सौर ऊर्जेवर चालवणार असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल वर्धा इथं एका कार्यक्रमात बोलत होते. प्रत्येक गावामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सौर पथदिवे, ग्राम पंचायतीची नळ योजना आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना सौर वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात येईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न देता निवडणुकीच्या आकडेवारीत गुंतलं असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. आतापर्यंत किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, ते जाहीर करावं असं आवाहन तटकरे यांनी केलं. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी कोणामार्फत होत आहे हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत गेल्या जुलै मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येऊ शकेल. येत्या २४ ऑगस्टला विद्यार्थ्याना गुणपत्रिका संबधित महाविद्यालयात मिळतील.

****

राज्यात जवळजवळ पंधरा दिवसांच्या खंडानंतर पावसाचं पुनरागमन झालं. काल काही भागात पावसानं हजेरी लावली. मराठवाड्यातही औरंगाबादसह बीड, जालना, परभणी, लातूर, नांदेड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

परभणी जिल्ह्यात जवळपास दीड महिन्याच्या खंडानंतर काल दमदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात सकाळपासून काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती, मात्र सायंकाळच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नांदेड जिल्ह्यातही किनवट, देगलूर, बिलोली, अर्धापूर आणि नांदेडसह अनेक तालुक्यात चांगला पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला, मात्र या पावसामुळे अनेक भागांचा वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. औरंगाबाद शहर तसंच जिल्ह्यात काल दुपारनंतर सुरू झालेला रिमझिम पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. बीड जिल्ह्यात अंबाजोगाईसह बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बीड, उस्मानाबादसह परभणी इथं पहाटेपर्यंत पाऊस सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. हिंगोली तसंच जालना जिल्ह्यातही पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या, यामुळे पिकांना जीवदान मिळालं असलं, तरी जलाशयांमध्ये पाणी पातळी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

****

पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल भूकंपाचा धक्का बसला. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर चार पूर्णांक पाच एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू सातारा जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात ढाकाळे गावाजवळ असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची जयंती आज ‘सद्भावना दिन’ म्हणून पाळण्यात येत आहे. यानिमित्त काल बहुतांश शासकीय कार्यालयात सद्भावना दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सद्भावना शपथ दिली. राजीव गांधी यांच्या जयंतीपासून येत्या ५ सप्टेंबरपर्यंत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यात येणार असून त्याअंतर्गत कार्यक्रमाचं नियोजन करण्याचे निर्देश नांदेड जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल ‘वंदे मातरम्‌’ च्या मुद्यावरुन प्रचंड गदारोळ झाला. ‘वंदे मातरम्‌’नं सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली, मात्र यावेळी एमआयएमचे दोन नगरसेवक जागेवरच बसून राहिल्यानं शिवसेनेनं त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. यावरुन झालेल्या गदारोळामुळे सभा सुरु होताच दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. यादरम्यान सभागृहात माईकची तोडफोड तसंच नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. दरम्यान, एमआयएमच्या त्या दोन नगरसेवकांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. या गोंधळामुळे महापालिकेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार असून, पहिला सामना दांबोला इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधी झालेली तीन कसोटी सामन्यांची मालिका भारतानं तीन - शून्यनं जिंकली आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं विद्यार्थ्यांना सर्व पुस्तकं एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ‘इब्स्को डिस्कव्हरी सर्व्हिस’ नावाचा उपक्रम सुरु केला आहे. कुलगुरु डॉ. बी ए चोपडे यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं. या माध्यमातून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेलं साहित्य विद्यार्थ्यांना एका क्लिक वर उपलब्ध होणार आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आज सातवं अंबाजोगाई साहित्य संमेलन होणार आहे. कादंबरीकार मंदा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. चार सत्रांमध्ये होणाऱ्या या एक दिवसीय संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन, आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीनं दिले जाणारे पुरस्कार आजच्या या संमेलनात प्रदान केले जाणार आहेत.

****

छायाचित्रांमध्ये फक्त माणसातच नव्हे तर समाजात सुध्दा परिवर्तन करण्याची ताकत असते, असं मत लातूरचे  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त लातूर इथं आयोजित छायाचित्रकार संमेलनात ते काल बोलत होते. उस्मानाबाद इथंही विविध वृत्तपत्रं तसंच वृत्तवाहिन्यांच्या छायाचित्रकारांचा गौरव करण्यात आला. जालना इथंही यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी छायाचित्रकारांचा गौरव केला.

****

नांदेड रेल्वे विभागातर्फे काल विनातिकिट प्रवाशांवर केलेल्या धडक तिकीट तपासणी मोहिमेत एकाच दिवशी ४०५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत या प्रवाशांकडून एक लाख वीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

****

शासनानं शासकीय सेवांमध्ये पदोन्नतीसाठीचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बदलण्यासाठी संसदेत आवाज उठवणार असल्याचं, लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात बोलत होते.

****

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात उस्मानाबाद इथं अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या शेतक-यांना नुकसानीपोटी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून २५९ कोटी रूपये द्यावेत अशी मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे. काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हात पावसाअभावी खरीप पिकं धोक्यात आली असून या पिकांचे तातडीनं पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी २५ टक्के अग्रीम रक्कम लगेच द्यावी, नागरिकांना पाणी पुरवठा करावा, आदी मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.

****

नांदेड जिल्ह्यातला माहूर तालुका येत्या सप्टेंबर अखेर उघड्यावर शौचापासून मुक्त करणार असल्याचा विश्वास माहूर - किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे. काल माहूर इथं आयोजित सरपंच आणि ग्रामसेवकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. य मोहिमेत नागरीकांनी सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

****

बीड जिल्हा नियोजन समितीवर निवडून द्यायच्या सदस्यांचं आरक्षण आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.या निवडणुकीद्वारे एकूण ३२ सदस्य निवडून द्यायचे आहेत उद्यापासून येत्या २४ तारखेपर्यंत नामनिर्देशपत्रं दाखल करता येणार आहेत.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اکتوبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 October-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبر...