Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 19 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
संयुक्त जनता दलानं आज पाटण्यात
झालेल्या त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही
आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शरद यादव यांच्या गटानं नितीश कुमार
यांच्या या निर्णयाला विरोध करत जन अदालत नावानं बैठक आयोजित केली आहे. नितीश कुमार
यांनी बिहारच्या जनतेनं दिलेल्या जनमताचा अनादर केला असल्याचा आरोप शरद यादव यांनी
केला आहे.
****
भारतीय रिजर्व्ह बँकेनं सार्वजनिक
क्षेत्रातल्या बँकांच्या थकीत ठेवीचा प्रश्न सोडवण्यासाठी या बँकांचं पुनर्भांडवलीकरण
करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच वसूल न होणाऱ्या कर्जाचं नऊ पूर्णांक सहा दशांश टक्के
प्रमाण ही योग्य बाब नसल्याचं सर्वोच्च बँकेनं म्हटलं आहे. रिजर्व्ह बँकेंचे गव्हर्नर
उर्जित पटेल हे आज मुंबईत दिवाळखोरीवर आयोजित परिषदेत बोलत होते. सार्वजनिक बँकांना
ठराविक मुदतीत आवश्यक भांडवल जमवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सरकार आणि आरबीआय चर्चा
करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
सैन्यातल्या डॉक्टर आणि वैद्यकीय
अधिकाऱ्यांसाठी सरकारनं जास्तीचा वेतनास मंजूरी दिली आहे. वैद्यकीय अधिकारी आणि दंतवैद्यकास
७५ हजार रुपये एवढे वेतन मिळणार असल्याचं सैन्य दलाच्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तसंच माजी सैनिकांसाठीच्या सहयोगी आरोग्य योजनेसाठी काम करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांना ८७
हजार पाचशे एवढे वेतन मिळणार आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण
सभेत आज ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरुन प्रचंड गोंधळ झाला. ‘वंदे मातरम्’नं सर्वसाधारण
सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली, मात्र यावेळी एमआयएमचे दोन नगरसेवक जागेवरच बसून राहिल्यानं
शिवसेनेनं त्यांच्यावर आक्षेप घेतला. यावरुन नगरसेवकांनी केलेल्या गोंधळामुळे सभा सुरु
झाल्यानंतर लगेचच दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. यादरम्यान सभागृहात माईकची तोडफोड
आणि नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकारही घडला. या नगरसेवकांवर कारवाई
करण्याची मागणी करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला.
दरम्यान, एमआयएमच्या या दोन नगरसेवकांना
एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. या गोंधळामुळे महापालिकेचं कामकाज आज दिवसभरासाठी
तहकूब करण्यात आलं. यावेळी महापालिकेच्या बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड
घोषणाबाजी केली.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची
जयंती उद्या ‘सद्भावना दिन’ म्हणून पाळण्यात येणार आहे. यानिमित्त आज सर्व शासकीय कार्यालयात
सद्भावना दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज उपस्थितांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी
राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी मंत्रालयातले
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातही
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सद्भावना शपथ
दिली. सर्व कर्मचाऱ्यांनी भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा करावी,
असं भापकर यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात जवळजवळ पंधरा दिवसांच्या
खंडानंतर पावसाचं आगमन होत आहे. आज काही भागात पावसानं हजेरी लावली.
परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून
पावसाला सुरुवात झाली. सेलू, पुर्णा इथं दमदार पावसानं हजेरी लावली. परभणी जिल्ह्यात
दीड महिन्याच्या खंडानंतर पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
मुंबई उपनगर, ठाणे, नांदेड, बीड,
लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि धुळे जिल्ह्यातही आज पावसानं हजेरी लावली.
दरम्यान, मराठवाड्यासह राज्यात
काही ठिकाणी येत्या २३ तारखेपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली
आहे.
****
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर
यांना मध्यप्रदेश सरकारनं केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आज नंदुरबारमध्ये सरदार सरोवर
विस्थापितांनी स्वातंत्र्य हक्काची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध आंदोलन केलं.
यावेळी मेधा पाटकरांसह सरदार सरोवर विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची त्वरीत सुटका
करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलकांनी केंद्र, मध्यप्रदेश तसंच महाराष्ट्र शासनाविरोधात
घोषणाबाजी केली.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान पाच
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार असून, पहिला सामना दांबोला
इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधी झालेली
तीन सामन्यांची कसोटी मालिका भारतानं तीन - शून्यनं जिंकली आहे.
****
क्रीडा मंत्रालयानं यावर्षीच्या
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पॅरालिम्पिक खेळाचे प्रशिक्षक सत्यनारायण यांचं नाव यादीतून
काढून टाकलं आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल असल्यानं हा निर्णय घेतल्याचं क्रीडा
मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. रिओ पॅरालिम्पिक खेळात सुवर्ण पदक मिळवलेल्या
मरियप्पन थंगवेलूचे ते प्रशिक्षक आहेत.
****
No comments:
Post a Comment