Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ सप्टेंबर २०१७
सकाळी ६.५० मि.
****
** मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते पायाभरणी
** छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी
अर्ज करण्यासाठी सात दिवस मुदतवाढ
** अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर हजर व्हावं - महिला आणि बालविकास विभागाचं आवाहन
आणि
** स्वच्छता हीच सेवा अभियानाला आजपासून प्रारंभ
****
मुंबई - अहमदाबाद या देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनमुळे विकासाचा वेग वाढणार असल्याचा विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासमवेत पंतप्रधान मोदी यांनी काल अहमदाबाद इथं
या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी केली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी उपस्थित होते. भारतीयांसाठी हा दिवस ऐतिहासिक असून, अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं हे
एक पाऊल असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी यावेळी केलेल्या भाषणात, बुलेट ट्रेनमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेची भरभराट झाली, तशीच भारताचीही होईल, अशी आशा व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आपल्या भाषणात, या प्रकल्पामुळे देशात मोठं परिवर्तन
होणार असल्याचं मत व्यक्त केलं. ८८ लाख कोटी रुपयांचा हा
प्रकल्प, ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित
आहे.
दरम्यान, या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुंबईत बोईसर इथल्या शेतकऱ्यांनी
विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पासाठी संभाव्य भू संपादनाच्या
निषेधार्थ या शेतकऱ्यांनी काल बोईसर रेल्वेस्थानकाबाहेर काळे झेंडे फडकावत, घोषणाबाजी केली.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत सात दिवस वाढ करण्यात आली आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी काल ही माहिती दिली. आता शेतकऱ्यांना येत्या २२ सप्टेंबर पर्यंत कर्जमाफीचे
अर्ज दाखल करता येणार आहेत. आतापर्यंत राज्यातल्या
४९ लाख ५६ हजार ३०५ शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले असून, अजून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होणं बाकी असल्यानं ही
मुदतवाढ देण्यात आली. भारनियमन तसंच इंटरनेट सेवेत येणाऱ्या
खंडामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्याची
मागणी केली जात होती.
****
पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा
कराच्या कक्षेत आणण्यासाठी जीएसटी परिषदेनं विचार करावा, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सरकारी तेल कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत
ते बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर नियंत्रण
आणण्यास मात्र त्यांनी नकार दिला
****
वस्तू आणि सेवा कर जीएसटीमुळे येत्या
काही महिन्यांत अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील, असं राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं
आहे. जीएसटीच्या अडचणींसंदर्भात महाराष्ट्र्
चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजच्या वतीनं नाशिक इथं आयोजित राज्यस्तरीय व्यापारी
परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते. जीएसटीतले बदल ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचं केसरकर म्हणाले.
****
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर
हजर व्हावं, असं आवाहन महिला आणि बालविकास विभागाच्या
सचिव विनिता वेद -
सिंघल यांनी केलं आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक
असून, त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती
सिंघल यांनी दिली. त्या काल मुंबईत बोलत होत्या. गेल्या ११ तारखेपासून अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मात्र या संपाचा पोषण आहार वाटप तसंच आरोग्यविषयक सुविधांवर परिणाम झाला नसल्याचं
सिंघल यांनी सांगितलं.
****
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या
खर्चासाठी सदस्य संख्येनुसार नवीन मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी काल वाशिम इथं
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सदस्य आणि सरपंच पदासाठी
तीन टप्प्यात ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
****
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा
मास्टर माइंड लश्कर ए तय्यबाचा कमांडर अबु इस्माईल आणि त्याचा एक साथीदार काल सुरक्षा
जवानांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. काश्मीरमध्ये नौगाम इथं काल दुपाऱच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गेल्या १० जुलै रोजी झालेल्या या हल्ल्यात पालघर जिल्ह्यातल्या
दोन महिलांसह सात भाविक ठार झाले होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज
ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
एक्क्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा प्रस्ताव हिवरा इथल्या विवेकानंद आश्रमानं मागे घेतला
आहे. संमेलन स्थळावर होत असलेल्या टीकेनंतर
आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती
दिली. यासंदर्भात अखिल भारतीय साहित्य महामंडळाला
सूचित केलं असल्याचं मालपाणी यांनी सांगितलं.
****
लोककलावंतांसाठी शासकीय योजनेतून घरकुल
मंजूर करण्यासह त्यांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री
राजकुमार बडोले यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर
इथं आयोजित लोककला महोत्सव - गुणगौरव सोहळयात ते काल
बोलत होते. लोककलावंतांचा यथोचित गौरव केल्यानं
त्यांना समाजकार्य करण्यास प्रेरणा मिळते असंही बडोले म्हणाले.
****
स्वच्छता हीच सेवा अभियानाला आजपासून
प्रारंभ होत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी मधुकर राजे आर्दड यांनी काल यासंदर्भात आढावा बैठक घेत, स्वच्छता हीच सेवा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश
दिले. या अभियानांतर्गत आज जिल्हा, तालुका तसंच ग्राम पातळीवर स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. आजपासून २ ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेमध्ये विविध उपक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषद स्वच्छ भारत
अभियानाच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत स्वच्छता जनजागृती रथाचं उद्घाटन
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आणी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या हस्ते आज सकाळी
११ वाजता होणार आहे.
बीड जिल्ह्यातही स्वच्छता ही सेवा ही
मोहिमेंतर्गत प्रशासनाबरोबरच समाजातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवून श्रमदानाच्या माध्यमातून
आपलं शहर, गाव आणी आपला परिसर स्वच्छ करावा आणि
ही मोहिम यशस्वी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केलं
आहे. विभागात हिंगोली, नांदेड सह सर्वत्र या अभियानाला आजपासून
प्रारंभ होत आहे.
****
नवी मुंबईत होणाऱ्या १७ वर्षांखालील
फिफा जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र फुटबॉल मिशन एक मिलियन हा कार्यक्रम
राज्यभरात राबवला जात आहे. मुंबई इथं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या
उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. फुटबॉल खेळाच्या माध्यमातून खेळातून आरोग्य विकास हे उद्दीष्ट असल्याची माहिती
शालेय क्रीडा आणि शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिली. याअंतर्गत आज राज्यभरात १० लाख मुलं फुटबॉल खेळतील असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
हिंदी राजभाषा दिनानिमित्त आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रात काल ‘राजभाषा हिंदी पंधरवड्या’ला प्रारंभ झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागातले प्राध्यापक
डॉक्टर सुधाकर शेंडगे यांच्या हस्ते या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. हिंदी भाषा राष्ट्रीय एकतेचं सूत्र मांडत असल्याचं शेंडगे
यावेळी म्हणाले. या पंधरवड्यादरम्यान कर्मचाऱ्यांसाठी
विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जालना जिल्हा परिषदेच्या काल झालेल्या
सर्वसाधारण सभेत मागच्या सभेनं अर्थसंकल्पात सुचवलेले बदल, विषय पत्रिकेत घेण्याच्या मागणीवरुन गोंधळ झाला. विरोधी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहातच विषयपत्रिका
फाडून फेकल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर
यांनी सभा आटोपती घेत गोंधळातच सर्व विषय मंजूर झाल्याचं जाहीर केलं. सभेनंतर भाजप सदस्यांनी अध्यक्षांना घेराव घातला.
****
No comments:
Post a Comment