Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार; अनेक नव्या
चेहऱ्यांचा समावेश
** ज्येष्ठ
कवयित्री आणि लेखिका शिरीष पै यांचं काल मुंबईत
वृद्धापकाळानं निधन
** लातूर शाळा तुकड्या घोटाळ्यातली साडे सहा कोटींवर रक्कम दोषींकडून वसूल करण्याचे
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
आणि
** जालना इथं नाफेडच्या खरेदी केंद्रावर बोगस तूर विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज सकाळी साडे
१० वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं, याबाबतच्या बातमीत
म्हटलं आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची
शक्यता आहे. यामध्ये सत्यपालसिंह, हरदीप पुरी, अल्पोन्स कन्ननथनम, या या माजी नोकरशहांसह
अश्विनीकुमार चौबे, वीरेंद्रकुमार, शिवप्रताप शुक्ल, आदींचा समावेश असल्याचं पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात संयुक्त जनता दल, अण्णाद्रमुक तसंच शिवसेनेच्या
खासदारांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय
नेतृत्वाकडून आपल्याला काहीही निरोप आला नसल्याचं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
तसंच संयुक्त जनता दलाचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी म्हटलं आहे.
****
वस्तू आणि सेवा कर प्रणाली जी.एस.टी अंतर्गत ज्या व्यापारी तसंच कंपन्यांनी
अद्याप विवरण पत्र सादर केलेलं नाही, त्यांना विलंबाबाबत दंड न आकारण्याचा निर्णय सरकारनं
घेतला आहे. केंद्रीय उत्पादन मंडळ आणि सीमाशुल्क विभागानं याबाबत परिपत्रक जारी केलं
आहे. तांत्रिक अडचणींमुळे विवरणपत्र सादर करता न आल्यामुळे ही सूट देण्यात आली आहे.
नियमानुसार विहित मुदतीत विवरण पत्र सादर न केल्यास दररोज २०० रुपये याप्रमाणे दंड
आकारण्याची या कायद्यात तरतूद आहे.
****
ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका शिरीष पै यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं
निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. त्यांचे वडील, प्रसिद्ध साहित्यिक प्र के अत्रे
यांच्याकडून लेखनाचं बाळकडू मिळालेल्या शिरीष पै, स्त्रीवादी
दृष्टीकोनातून साहित्य निर्मिती करणाऱ्या स्वतंत्र प्रतिभेच्या लेखिका म्हणून ओळखल्या
जातात. त्यांनी
कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक आदी सर्वत्र क्षेत्रात विपुल लेखन केलं.
त्यांचे एकतारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र हे कवितासंग्रह,
खडकचाफा, चैत्रपालवी, सुखस्वप्न हे कथासंग्रह, तसंच, हे ही दिवस जातील, लालन, बैरागी,
या कादंबऱ्या आणि पप्पा, प्रियजन ही पुस्तकं लोकप्रिय ठरली. हायकू हा जपानी काव्य प्रकार
त्यांनी मराठीत रुजवला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्या सहभागी झाल्या होत्या.
आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकाचं संपादकपद त्यांनी काही काळ सांभाळलं होतं.
पै यांच्या निधनानं मराठी साहित्य समृद्ध करणारी, त्याला नवं वळण देणारी एक
विदुषी आपण गमावली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली
अर्पण केली. तर, स्वतंत्र लेखनशैली निर्माण केलेल्या, शिरीष पै यांच्या निधनानं मराठी
साहित्य विश्वानं हरहुन्नरी साहित्यिक गमावल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे
यांनी म्हटलं आहे.
****
नाशिक मुंबई रेल्वेमार्गावर आसनगाव- वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान
दुरांतो एक्सप्रेसला गेल्या मंगळवारी झालेल्या अपघातानंतर, ठप्प झालेली रेल्वे सेवा
काल पाच दिवसानंतर सुरू झाली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी
ही माहिती दिली. सध्या केवळ विशेष गाड्या सोडल्या जात असून, गाड्या वेळापत्रकानुसार
धावत नसल्याचं, उदासी यांनी सांगितलं. सिकंदराबादहून नांदेड, औरंगाबादमार्गे मुंबईला
जाणारी देवगिरी एक्सप्रेस, मुंबई - नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस आणि मुंबई - नांदेड
तपोवन एक्सप्रेस या गाड्या आजही रद्द केल्या आहेत.
उत्तर भारतात होत असलेल्या पावसामुळे उना हिमाचल एक्स्प्रेस २२ तास उशिरा धावत
आहे. यामुळे काल दोन तारखेला नांदेड इथून सकाळी ११ वाजता सुटणारी नांदेड ते उना हिमाचल
नांगलदम एक्स्प्रेस आज सकाळी ७ वाजता सुटेल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
ईद उल जुहा अर्थात बकरी ईद काल सर्वत्र
भक्तिभावानं साजरी करण्यात आली. औरंगाबाद इथं
छावणी परिसरात ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईदची सामुहिक नमाज अदा करून, परस्परांना
ईदच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्यात परभणीसह सर्वत्र बकरीईद पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली. सर्वच ठिकाणी
मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. नाशिक
इथं गोल्फ क्लब मैदानावर ईदनिमित्त विशेष नमाज पठण करण्यात आलं. यावेळी तिहेरी तलाक
विषयी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं, तसंच
दहशतवादाचा निषेध करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या छत्तीसाव्या वर्धापनदिनानिमित्त
आज औरंगाबाद इथं संत तुकाराम नाट्यगृहात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं
आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय
ललित उपस्थित राहणार असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
****
लातूर जिल्हा परिषदेच्या २६२ शाळा तुकड्यांचा घोटाळ्यातली सहा कोटी ५८ लाख एवढी
रक्कम दोषींकडून वसूल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले
आहेत. हा घोटाळा उघड करणारे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विठ्ठल भोसले यांनी २०१३ मध्ये
उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी तत्कालीन पाच शिक्षणाधिकारी, १३ वरिष्ठ
अधिकारी कर्मचाऱ्यांसह, ९९ शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापक अशा एकूण
३१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या सर्वांनी बोगस विद्यार्थी दाखवून वाढीव तुकड्या
मंजूर करून घेतल्या, त्यावर शिक्षकांच्या नेमणुका करत, शासनाचं अनुदान लाटल्याचं तपासात
समोर आलं आहे.
****
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या
नावावर तूर विकणाऱ्या १८ व्यापाऱ्यांसह ४९ शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. जिल्ह्यात परतूर, अंबड आणि तीर्थपुरी इथंही नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर झालेल्या
खरेदीची स्वतंत्र चौकशी सुरू असून, या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी काही
व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात तूर खरेदी गैरप्रकाराची संपूर्ण चौकशी
करून दोषींविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी
म्हटलं आहे. खासदार राजीव सातव यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल जिल्हाधिकाऱ्यांची
भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. घोषणापत्र देऊनही अनेक शेतकरी तूर खरेदीपासून वंचित
आहेत. त्यांना शासनानं न्याय द्यावा, अशी मागणी खासदार सातव यांनी केली.
****
बीड इथं बार्शी रस्त्यावर बिंदुसरा नदीवरच्या खचलेल्या पुलाची काल जिल्ह्याच्या
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली. वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेता या पुलावरून हलकी वाहनं सोडण्याबाबत तसंच पर्यायी
रस्त्याचं काम लवकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नुकत्याच झालेल्या मुसळधार
पावसानंतर हा पुल खचल्यानं, जिल्हा प्रशासनानं पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद केली होती.
या मार्गावर नवा पुल मंजूर केला असून, पावसाळ्यानंतर त्याचं काम सुरू होणार आहे.
****
गेल्या सुमारे १० दिवसांत परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. मात्र वातावरणातला
उष्मा अद्यापही कायम आहे. त्यामुळे जिल्हाभरात साथीचे रोग आणि तापाच्या रुग्णांची संख्या
वाढत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं, पैठणच्या जायकवाडी धरणात
गोदापात्रातून होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. काल सायंकाळी सुमारे साडे चार हजार
घनफूट प्रतिसेकंद वेगानं धरणात पाण्याची आवक सुरू होती. दरम्यान, धरणातला पाणीसाठा
८० टक्क्याच्या वर पोहोचला आहे. पावसाचा जोर वाढल्यास, पाण्याची आवकही वाढेल, यामुळे
धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागल्यास, मराठवाड्यात गोदाकाठच्या गावातल्या नागरिकांनी
सावध राहावं, असं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment