Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 16 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०१७
सकाळी ६.५० मि.
****
** स्वच्छता हीच सेवा या मोहिमेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ
** महाराष्ट्र मिशन एक मिलीयन या फुटबॉल महोत्सवात २५ लाखावर विद्यार्थ्यांचा सहभाग
** नाशिक बालमृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-
राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
** सरकारचं नियोजन कोलमडल्याची अजित पवार यांची टीका
आणि
**
मराठवाड्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अनेक जिल्हयात मुसळधार
पाऊस
****
स्वच्छता राखण्याची जबाबदारी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांची नव्हे
तर आपणा सगळ्यांची असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. स्वच्छ भारत
अभियानाअंतर्गत स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा उत्तर प्रदेशात कानपूर इथं राष्ट्रपतींच्या हस्ते काल शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. अस्वच्छता
हा समाजासाठी अभिशाप असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. यावेळी राष्ट्रपतींनी
उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. येत्या दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला या अभियानाचा समारोप होणार आहे.
स्वच्छता अभियानाच्या निमित्तानं कचरा न करण्याचा तसंच
आपलं शहर स्वच्छ करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केलं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता हीच सेवा
या मोहिमेचा काल मुंबई इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. त्यावेळी
ते बोलत होते. मराठवाड्यात सर्वत्र या मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. औरंगाबाद इथं
जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड
यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून
स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
नांदेड इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अशोक शिनगारे, बीड इथं जिल्हाधिकारी एम डी सिंह, नगराध्यक्ष भारत भुषण क्षीरसागर,
हिंगोली नगरप पालिकेत नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याहस्ते या मोहिमेचं उद्घाटन झालं.
****
"महाराष्ट्र मिशन एक मिलीयन" या फुटबॉल खेळ
महोत्सवाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई इथं प्रारंभ केला. पुढच्या महिन्यात होणाऱ्या १७ वर्षांखालील
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं.
या फुटबॉल खेळ महोत्सवाअंतर्गत राज्यात
दहा लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र
सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात
२५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थी फुटबॉल
खेळले असल्याचं, क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.
औरंगाबाद इथं विभागीय क्रीडा
संकुलावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत या मोहिमेला प्रारंभ
झाला. अनेक शाळांचे सुमारे पाच हजारावर विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते.
लातूर शहरात यानिमित्त
विद्यार्थ्यांची संदेशफेरी काढण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलावर शालेय विद्यार्थ्यांच्या
४० संघात फुटबॉल सामने खेळवले गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड इथं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
यांनी तर उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी फुटबॉल मिशन
रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं. या अनुषंगानं उस्मानाबाद जिल्ह्यात आयोजित संदेश फेरीमध्ये
सुमारे ४७ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर,
हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे, तर बीड इथं जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी यांच्या
उपस्थितीत या फुटबॉल खेळ महोत्सवाला सुरूवात झाली.
****
पेट्रोलची मूळ किंमत ३० रुपये प्रतिलीटर असताना, ८१ रुपये का
वसूल केले जातात, असा सवाल, भाजपचे गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी उपस्थित केला
आहे. ते गोंदिया इथं बोलत होते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे हा
मुद्दा उपस्थित करणार असून, वेळ पडल्यास लोकसभेत देखील हा मुद्दा उचलणार असल्याचं पटोले
यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्हा रुग्णालयात
झालेले ५५ बालमृत्यू हे राज्य सरकारचं अपयश असून, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा
दिला पाहिजे अशी मागणी, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली
आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
आरोग्य, महिला आणि
बाल कल्याण तसंच आदिवासी विकास या तीन खात्यांच्या मंत्र्यांवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे
आरोप होत असूनही मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.
****
सरकारचं नियोजन कोलमडलं असून मंत्र्यांची आपल्या खात्यावर
पकड नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे. काल
औरंगाबाद इथं डॉक्टर उल्हास उढाण यांनी लिहिलेल्या ‘यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राचा
आशय’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफीची केवळ आश्वासनं,
वीज भारनियमन, विद्यापीठाचे रखडलेले निकाल, आदी मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. रेल्वे
फलाटांची उंची वाढवण्याचा प्रश्न जैसे थे असताना, बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवण्यात सरकार
गुंग असल्याचं पवार म्हणाले.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या १७
सप्टेंबरला साजरा होत असून, औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभाजवळ सकाळी
नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल.
बीड इथं जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते
सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यापूर्वी प्रियदर्शनी उद्यानात मराठवाडा मुक्ती
संग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
****
मराठवाड्यात कालही अनेक जिल्हयात मुसळधार पाऊस झाला. औरंगाबाद
शहर आणि परिसरात दुपारनंतर सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात
तसंच अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं, वाहनधारकांची तारांबळ उडाली. औरंगाबाद नजिक चिकलठाणा इथं घराचं छत कोसळून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर परवा पुराच्या पाण्यात वाहून
गेलेल्या युवकाचा मृतदेह काल सापडला.
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात
काल दुपारच्या सुमारास दोन तास भीज पाऊस झाला, कपाशीसाठी हा पाऊस लाभदायक असल्याचं,
शेतकरी वर्गातून बोललं जात आहे. या पावसामुळे भूजलाचा स्तर वाढण्यास मदत होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात झालेल्या जोरदार
पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला. यामुळे नदीकाठाच्या काही गावांचा संपर्क तुटला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांब मंडळात अतिवृष्टी झाली तर उस्मानाबाद जिल्ह्यात
झालेल्या पावसात तेर नदीला आलेल्या पुरात एक जण वाहून गेला.
वाशिम जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे
पैनगंगा नदीवरच्या बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची शक्यता असल्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या
भगवती, तपोवन, कण्हेरगाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोलापूर
जिल्ह्यातल्या उजनी धरणातून ७० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला
आहे. चंद्रभागेनदीतही उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून पंढरपूर इथं नदीकाठावरची अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी मेहकरी या
रस्त्यावर बस सेवा बंद करण्यात आली आहे. हा रस्ता दुरुस्त करुन बस सेवा पूर्ववत करावी,
अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
****
परभणी जिल्ह्यात
गंगाखेड तालुक्यात एका ग्रामसेवकाला एक हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात
आली. सतीश देशपांडे असं या त्याचं नाव असून, प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून
त्यानं लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं त्याला अटक करून, सोनपेठ पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या २३२ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कालपासून
ऑनलाइनं पद्धतीनं अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सरपंच आणि सदस्य पदासाठी
इच्छुक उमेदवारांना २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार असून सात ऑक्टोबर रोजी
मतदान होणार आहे.
****
लातूर
शहरात औद्योगिक वसाहतीतल्या हरित पट्ट्यावर असलेली अष्टविनायक प्रतिष्ठानच्या इंग्रजी
शाळेची अनधिकृत इमारत रिकामी करून दिवाळी सुटीपर्यंत महापालिकेच्या ताब्यात देण्याचे
आदेश मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment