Tuesday, 5 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 05.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ सप्टेंबर २०१ दुपारी १.००वा.

****

दहशतवाद, सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासह दहा वचनबद्धतांसाठी ब्रिक्स देशांनी एकत्र येण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवव्या ब्रिक्स परिषदेत नव्या बाजारपेठा आणि विकासशील देश संवाद या चर्चासत्रात बोलत होते. ब्रिक्स नेतृत्वानं जागतिक परिवर्तन साधण्यासाठी मोदीं यांनी दहा थोर वचनबद्धता अवलंबण्याचं सूचित केलं. ब्रिक्स देशांद्वारे पुढील दहा वर्षांत चालवल्या जाणाऱ्या जागतिक परिवर्तनाच्या मोहिमेमुळे एक सुवर्ण दशक आपल्याला पाहायला मिळेल, असं मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखण्यावर सहमती दर्शवली.

ब्रिक्स परिषदेचा चीन दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी म्यानमारच्या दौऱ्यावर रवाना झाले.

****

सरकारनं जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील वस्तू आणि सेवाकराचा अंतिम भरणा करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. यानुसार आता जीएसटी आर-१ किंवा विक्रीकर भरणा १० तारखेपर्यंत तर जीएसटी आर-२ भरणा येत्या २५ सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहेत. तसंच जीएसटी आर-३ येत्या ३० सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे.

****

राष्ट्रीय जनता दलाच्या खासदार मिसा भारती यांच्या नवी दिल्लीतल्या फार्महाऊसवर सक्तवसूली संचालनालयानं जप्ती आणली आहे. काळा पैसा पांढरा करण्याच्या आरोपांसंदर्भात आज सकाळी ही कारवाई करण्यात आल्याचं पीटीआयचं वृत्त आहे. मिसा भारती या बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कन्या आहेत.

****

देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आज सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून डॉ राधाकृष्णन यांच्या स्मृतींना अभिवादन करत, देशभरातल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही डॉ राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण करत शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

आज शिक्षक दिनानिमित्तानं नवी दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात उपराष्ट्रपतींनी देशाच्या उज्ज्वल परंपरांसह गुरुशिष्य परंपरेचं स्मरण करत, आपण भारतीय असल्याची भावना शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत करावी, असं मत व्यक्त केलं. यावेळी पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये राज्यातल्या २५ शिक्षकांचा समावेश असून, मराठवाड्यातल्या लातूर इथले रामकिसन सुरवसे, गोपाल सूर्यवंशी, उस्मानाबाद इथल्या उर्मिला भोसले, तसंच बीड इथले नंदा राऊत, आणि कमलाकर राऊत यांनाही यावेळी गौरवण्यात आलं. सन्मान पदक, प्रमाणपत्र आणि ५० हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

राज्यभरात अनेक ठिकाणी आज सकाळपासून गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला. मुंबईत प्रसिद्ध गणेशगल्ली तसंच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली असून, घरगुती गणपतींचं ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांमध्ये विसर्जन करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात जिल्हा परिषद मैदानावरच्या मुख्य विसर्जन विहिरीसह शहरातल्या इतर विसर्जन विहिरींवर घरगुती गणपतींच्या विसर्जनाला प्रारंभ झाला आहे. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरणुकीला थोड्या वेळापूर्वीच प्रारंभ झाला. इतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातल्या इतर शहरांसह राज्यात धुळे, सोलापूर, नाशिक आदी शहरांमध्येही गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा इथं काल पावसानं हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अवयवदानामुळं गरजू व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत होते, त्यामुळे ते श्रेष्ठदान असल्याचं, औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय-घाटीच्या शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीनं आयोजित 'संवाद पर्व' कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. देशात अवयवदानाची आवश्यकता पाहता, सर्वांनी अवयवदानासाठी पुढे येण्याचं आवाहन डॉ जाधव यांनी यावेळी केलं.

****

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीत भारताच्या लिएंडर पेस आणि पुरव राजा या जोडीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. ‘अंतिम ३२’च्या फेरीत काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात रशियाच्या खाचनोव्ह-रूबलेव्ह जोडीने पेस-राजा जोडीचा ६-४, ९-७ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...