Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी धनपाल
यांनी सत्ताधारी अखिल भारतीय अण्णा द्रमुक मुनेत्र कळघम - ए आय ए डी एम के पक्षाच्या
१८ आमदारांना अपात्र घोषित केलं आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले टी टी व्ही
दिनकरन यांच्या गटात समाविष्ट झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कायद्याअंतर्गत
या आमदारांना अपात्र घोषित केलं असल्याचं विधानसभा सचिव के भूपती यांनी जारी केलेल्या
निवेदनात म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीर मधल्या अरनिया सेक्टर इथं
मध्यरात्री पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी लष्करी तळ आणि
रहीवाशी भागांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा करण्यात आला. आज सकाळपर्यंत
दोन्हीकडून गोळीबार सुरु होता. अरनिया इथं सलग तिसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून गोळीबार
करण्यात आला.
दरम्यान, पाकिस्तानकडून घुसखोरी थांबत
नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा सुरु करणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ
सिंग यांनी सांगितलं.
****
सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर विद्यापीठ असं नामकरण करावं, या मागणीसाठी धनगर समाजाच्या कायकर्त्यांनी आज शिक्षण
मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यक्रमात घुसून पत्रके फेकल्याचं वृत्त आहे. तावडे हे
आज सोलापूरच्या दौऱ्यावर असून, राज्य शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम सुरु असताना
हा प्रकार घडला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यातलं कुपोषण आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी
महिला, बालविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत असून एकत्रित प्रयत्न
करत असल्याचं एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड यांनी सांगितलं. प्रकल्पाच्या
अहवालात देण्यात आलेली बालमृत्यूची आकडेवारी ही मलेरिया, न्युमेनिया, कॉलरा, डायरीया
इत्यादी साथीचे आजार, अपघात, सर्पदंश तसंच इतर विविध कारणामुळे झालेल्या बालमृत्युची
असून, ती फक्त कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूची नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
****
नाशिक जिल्ह्यात लासलगाव आणि नांदगाव
वगळता बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरु झाले.
प्राप्तिकर विभागानं कांदा व्यापाऱ्यावर छापे घातल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी
कांदा लिलाववर बहिष्कार घातला होता. काल जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं व्यापारी आणि बाजार
समितीची बैठक घेऊन, लिलाव सुरु न केल्यास व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा
दिला होता.
****
औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक परिसरात
काळा चबुतराच्या जागेवर हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद
तीर्थ यांचं स्मारक लवकरच उभारलं जाणार आहे. शहरातल्या मध्यवर्ती जागेवर रामानंद तीर्थ
यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका रेणापूरचे स्वातंत्र्यसैनिक मुर्गाआप्पा
खुमसे यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान तत्कालिन
न्यायमूर्तींनी पुतळा उभारणीसाठी योग्य जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. या
निर्देशांनुसार क्रांतीचौकातल्या काळा चबुतराजवळ उभारल्या जाणाऱ्या दोनशे फूट उंच ध्वजाच्या
बाजूच्या जागेची पाहणी करण्यात आली आणि त्याच जागेवर रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारण्यात
येणार असल्याचं पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितलं.
****
कर्नाटक किनारपट्टी ते केरळदरम्यान समांतर
कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळासारखी स्थिती
निर्माण झाली आहे, त्यामुळे राज्यात येत्या दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे.
गेले तीन महिने पावसानं ओढ दिलेल्या मराठवाड्यात
गेल्या तीन ते चार दिवसात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे ओढे नाले यांना पूर आला असून
पिकांना जीवदान मिळालं आहे. औरंगाबाद मध्ये पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी
८७ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या १० हजार ४१३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची
आवक सुरु आहे.
बुलडाणा जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरु
असून, चिखली जवळच्या सावंगी इथं वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर
जखमी झाले.
****
सरकारी कर्मचाऱ्यांनी वृध्द आई-वडिलांचा
तसंच त्यांच्या दिव्यांग भावडांचा सांभाळ केला नाही तर त्यांच्या मासिक पगारातून दहा
टक्के रक्कम कपात करण्याचा कायदा देशभरात लागू व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आसाम सरकारचं अनुकरण
करुन महाराष्ट्र सरकारनं हा कायदा त्वरीत करावा यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनाही भेटणार असल्याचं आठवले म्हणाले. तसंच संसदेतही असा कायदा मंजूर व्हावा यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीणार असल्याचं त्यांनी प्रसिध्दीला दिलेल्या
पत्रकात म्हटलं आहे.
****
१७ वर्षांखालील खेळाडूंना आगामी फुटबॉल
विश्वचषक स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तुंवर आयात शुल्कात सूट देण्याचा निर्णय सरकारनं
घेतला आहे. सहा ते २८ ऑक्टोबर दरम्यान भारतात ही स्पर्धा होणार आहे.
****
No comments:
Post a Comment