आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१८ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
एयर मार्शल
पद्मविभुषण अर्जन सिंग यांच्या पार्थिव देहावर आज दिल्ली इथल्या बरार स्क्वायर इथं
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परवा १६ सप्टेंबरला ह्रदयविकाराच्या धक्क्यानं
त्यांचं निधन झालं. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण
अडवाणी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
केंद्र सरकार सबको शिक्षा,अच्छी
शिक्षा या संकल्पनेच्या माध्यमातून शिक्षण
क्षेत्राच्या विकासात जनतेला सहभागी करण्यासाठी
प्रयत्नशील असून ही चळवळ जनतेच्या सकारात्मक प्रतिसादानेच यशस्वी होईल असं प्रतिपादन
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. मुंबई इथं काल आयोजित
एका कार्यक्रमात ते बोलत होते. खर्चिक शिक्षण म्हणजे दर्जेदार शिक्षण ही समजुत चुकीची
असून लोकांनी सरकारी शाळांवर विश्वास ठेवायला पाहिजे असं ते म्हणाले. देशात मॉन्टेसरी
ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्यांची संख्या २९ कोटी असून त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं
प्रत्येक क्षेत्रात संशोधन-नवीनीकरणाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचही जावडेकरांनी
नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी येत्या २४ सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या
सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर,
माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
मराठवाड्यात
काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. नांदेड तसंच परभणी इथं पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना शहर परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला, पहाटेपर्यंत
पावसाची संततधार सुरू होती. औरंगाबाद शहर परिसरातही काल रात्री सुमारे दीड तास जोरदार
पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment