Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 19 September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
अतितीव्र कुपोषित
बालकांसाठी वेगळे दिशानिर्देश लवकरच जारी केले जातील, असं केंद्रीय महिला आणि बालकल्याण
मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत
होत्या. पूरक पोषणासंदर्भातल्या नव्या मार्गदर्शक सूचना येत्या काही दिवसांत जारी केल्या
जातील, असंही त्या म्हणाल्या. बालकांच्या सुरक्षेसोबतच पोषण महत्वाचं असल्याचं सांगत,
गांधी यांनी, गर्भवती महिलांना किमान एक हजार उष्मांक, तर बालकांना सहाशे उष्मांकयुक्त
आहार मिळणं गरजेचं असल्याचं नमूद केलं.
****
केंद्र सरकारचा
सागरमाला कार्यक्रम राज्यात राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत
प्रकल्पासाठी राज्याचा ५० टक्के निधी, पुरवणी मागणीद्वारे देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ
बैठकीत घेण्यात आला.
राज्यात ग्राम
सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यासाठी विविध स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांवर
शासकीय अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यास आणि अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात सहकार्य
करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पर्यटन क्षेत्राच्या
विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये महाराष्ट्र पर्यटन धोरणाशी सुसंगत सुधारणा
करायलाही यावेळी मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाची मुंबई, पुणे,
नागपूर इथं पुढच्या दोन वर्षासाठी खंडपीठं स्थापन करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत
घेण्यात आला.
जिल्हा परिषदेची
विशेष सभा बोलावण्यासाठी आता एकूण परिषद सदस्यांपैकी किमान दोन पंचमांश सभासदांनी लेखी
विनंती करणं आवश्यक करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात
सुधारणा करण्यासंदर्भातला अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
****
कुख्यात गुंड
दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे सत्र न्यायालयानं आठ दिवसांची पोलिस
कोठडी सुनावली आहे. कासकर याला खंडणी मागितल्याप्रकरणी तीन साथीदारांसह काल ठाणे पोलिसांनी
अटक केली. त्याच्या साथीदारांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडून
इक्बाल यानं खंडणीपोटी चार सदनिका घेतल्या असून, अधिक सदनिकांची मागणी केल्यावर संबंधित
व्यावसायिकानं केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. इक्बाल यानं आणखी काही
व्यावसायिकांकडूनही खंडणी मागितल्याचं ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी आज वार्ताहर परिषदेत
सांगितलं.
****
राज्यात आज
जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबईसह उपनगरात दुपारी मुसळधार पाऊस सुरु झाला. सातारा,
कोकणातही सगळीकडे आज मुसळधार पावसाचं वृत्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून सुरु
असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कोल्हापूर
जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस सुरु असून, राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरातही आज दुपारी काही वेळ जोरदार
पाऊस झाला.
पुढच्या २४
तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
पवन ऊर्जेपासून
एक हजार २७५ मेगावॅट वीज निर्मिती होत असून, त्यामुळे औरंगाबाद शहरातलं भारनियमन तात्पुरतं
बंद करण्यात आलं आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी आज औरंगाबाद इथं
वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. नगरसेवकांसोबत बैठक घेऊन वीज चोरी बंद करण्यासाठी
जनजागृती करण्याकरता अभियान राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
येत्या गुरुवारी
परवापासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार असून, नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावर नवरात्र
उत्सवासाठी संस्थानची तयारी पूर्ण झाल्याचं तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी सांगितलं.
नऊ दिवसांत दहा लाखांहून अधिक भाविक गडावर दर्शनासाठी येत असल्यानं सर्व चोख बंदोबस्त
केल्याचं वरणगावकर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
नाशिक सहकारी
साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी अवसायकांची नियुक्ती केली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती
सरकारी बँकेची सुमारे दीडशे कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं जिल्हा बँकेने या साखर कारखान्याचा
लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत सभासदांनी
विरोध केला असून, आता या बँकेवरील पाच सदस्यीय प्रशासक मंडळ हटवण्यात आलं असून, दोन
अवसायक नियुक्त करण्यात आले आहेत.
****
अखिल भारतीय
एसएनडीटी आंतर महाविद्यालयीन महिला क्रीडा स्पर्धा उद्यापासून औरंगाबाद इथं सुरु होत
आहेत. यात देशभरातले २५ महिला संघ सहभागी होणार आहेत. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज
ॲण्ड ॲग्रीकल्चर - सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांच्या हस्ते उद्या सकाळी नऊ वाजता
विभागीय क्रीडा संकुल इथं या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.
****
No comments:
Post a Comment