आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०३ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
श्रीनगरमधल्या सीमा सुरक्षा
दलाच्या कॅम्पवर आज पहाटे दहशतवादी हल्ला झाला.
श्रीनगर विमानतळाजवळ असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या १८२ बटालियनच्या कॅम्पमध्ये
घुसून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाकडूनही दहशतवाद्यांना
चोख प्रत्युत्तर दिलं जात असून, या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले, तर तीन भारतीय जवान
जखमी झाले. एका इमारतीत आणखी तीन ते चार दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त केली जात
आहे. चकमक अद्याप सुरु आहे.
****
भारत आणि बांग्लादेश या देशांच्या सीमा सुरक्षा दल प्रमुखांच्या द्वैवार्षिक चर्चेला आजपासून
नवी दिल्ली इथं सुरुवात होत आहे. बॉर्डर गार्ड बांग्लादेशचे महासंचालक मेजर जनरल अब्दुल
हुसैन यांच्या नेतृत्वाखालील २४ सदस्यीय शिष्टमंडळ, भारतीय सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख
के के शर्मा यांची भेट घेणार आहे. महासंचालक स्तरावरची ही चर्चा तीन दिवस चालणार आहे.
या बैठकीत रोहिंग्या निर्वासित, बनावट भारतीय चलन, अंमली पदार्थांची तस्करी या प्रमुख
मुद्यांसह सीमेवरच्या घटनांवर चर्चा होणार आहे.
****
औरंगाबाद
-धुळे महामार्गावर कन्नड चाळीसगाव दरम्यानचा औट्रम घाट छोट्या, चारचाकी वाहनांसाठी
आज पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. धुळे सोलापूर महामार्गावरच्या या घाटातला रस्ता
खचल्यानं, २० ऑगस्ट पासून हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा आणि भोकर तालुक्यात तर परभणी,
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस झाला. लोहातालुक्यातल्या शंभरगाव शिवारात एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. भोकर तालुक्यातल्या आमदरी इथं शेतात
काम करणारी एक महिला वीज पडून मरण पावली. परभणी
जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातही राजेगाव इथं अंगावर वीज पडून एक शेतकरी ठार झाला.
****
केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात राज्यभर आंदोलनाचा
इशारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नाशिक इथं बोलताना
दिला. किसान मंचच्या वतीनं नाशिक इथं आयोजित अधिवेशनात काल ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment