Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
श्रीनगर विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, सुरू असलेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा
झाला. आज पहाटे दहशतवाद्यांनी या छावणीवर
हल्ला करुन अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी
या हल्ल्याला चोख उत्तर देत, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
****
शासकीय धोरण म्हणून दहशतवादाचा वापर सहन केला जाणार नसल्याचं भारतानं संयुक्त राष्ट्र संघाला सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय
दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांसंदर्भात स्थापन संयुक्त
राष्ट्राच्या एका समितीला संबोधित करताना, संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या स्थायी मिशनच्या कायदेशीर सल्लागार एडला उमाशंकर
यांनी, दहशतवादाविरोधात सगळ्यांनाच संघर्ष करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त
केलं. आंतरराष्ट्रीय समुदायानं दहशतावदी
गटांना संपवण्यासाठी मतभेद बाळगू नये, असं त्या म्हणाल्या. दहशतवाद्यांना
अनेक स्तरातून निधी पुरवला जात असल्याबद्दलही उमाशंकर यांनी नाराजी व्यक्त केली.
****
तामिळनाडूचा सत्ताधारी
पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रमुक मुनेत्र कळघम - एआयएडीएमके
मधून बाहेर पडेलेले नेते टी टी व्ही दिनकरन यांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री इ के पलानीसामी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी
ही कारवाई करण्यात आली. दिनकरन यांच्यासोबत त्यांच्या आठ सहकार्यांनाही अटक करण्यात
आली असून, त्यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. राजकीय
हेतूनं पोलिसांनी ही अटक केल्याचा आरोप दिनकरन यांनी केला आहे.
****
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद
यादव आणि त्यांचे पुत्र बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना परवा पाच आणि
सहा ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. २००६ साली रेल्वे उपाहारगृहाचं
कंत्राट देण्यासंदर्भातल्या एका प्रकरणात ही चौकशी होणार आहे.
****
लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला बाबा राम
रहीम उर्फ गुरमीत सिंह ची साथीदार हनीप्रीतने तिच्यावर लावलेले देशद्रोहाचे आरोप फेटाळले
आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हनीप्रीतने या प्रकरणी पंजाब आणि
हरियाणा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं. हनीप्रीत विरोधात लुकआऊट नोटीस
जारी केलेली असून, ती आत्मसमर्पण करेल, असा अंदाज, वृत्तसंस्थेनं वर्तवला आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्यानजीक कळवा रेल्वे स्थानकावर
रेल रोको आंदोलन केलं. मुंबईतल्या प्रभादेवी - परळ स्थानकावर झालेल्या चेंगचेंगरीच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी
रेल्वे प्रशासन काहीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप करत हे
आंदोलन करण्यात आलं. मात्र रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी
हे आंदोलन मोडून काढल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या
आंदोलनाचा रेल्वेच्या वेळापत्रकावर काहीही परिणाम झाला नसल्याचं मध्य रेल्वेच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यानं सांगितलं. गेल्या
२९ सप्टेंबरला झालेल्या या दुर्घटनेत २३ जण ठार झाले होते, तर ३९ जण जखमी झाले होते.
एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. इतर २२ मृतांच्या वारसांना तसंच जखमींना सानुग्रह
अनुदानाचे धनादेश वितरित करण्यात आले असल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी शंभर टक्क्यांवर कायम आहे.
धरणात सध्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची
आवक सुरू आहे. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून अनुक्रमे एक हजार आणि पाचशे घनफूट
प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
विभागात माजलगाव प्रकल्प ७४ टक्के तर विष्णुपुरी बंधाराही शंभर
टक्के भरला आहे. सिद्धेश्वर आणि येलदरी प्रकल्पात मात्र समाधानकारक पाणी साठा नाही,
सिद्धेश्वर धरण ५४ टक्के तर येलदरी धरणात फक्त सुमारे बारा टक्के पाणी आहे.
****
डग्लस इथं झालेल्या
आयजल ऑफ मॅन बुद्धीबळ स्पर्धेत पाच वेळा जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद पटकावणारा भारताचा
विश्वनाथन आनंद दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यानं
चीनचा ग्रँड मास्टर होऊ यिफान चा पराभव केला. आनंदला हा दुसरा
क्रमांक अमेरिकेच्या नाकामुरा हिकास सोबत विभागून मिळाला आहे. जागतिक विजेता मॅग्नस
कार्लसन यानं साडेसात गुणांसह विजेतेपद पटकावलं.
****
आंतरराष्ट्रीत क्रिकेट संघटनेच्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाज रोहीत शर्मा
पुन्हा एकदा पहिल्या पाच मध्ये पोहोचला आहे, तर कर्णधार
विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजांच्या यादीत
अक्षर पटेल सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
****
No comments:
Post a Comment