Tuesday, 3 October 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 3 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना गेल्या काही दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या प्रकरणाची गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या समितीमार्फत चौकशी करण्याचा आणि अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत मास्क वाटप करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

रक्त नाते संबंधातल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे कुटुंबातल्या इतर व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला.

प्रभादेवी-परळ पादचारी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.

****

सरसकट कर्जमाफी केल्यावर निकषांची गरज काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे. ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या निर्णयासोबत घातलेल्या नियम आणि अटींविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. येत्या पाच नोव्हेंबरला औंरगाबाद इथं शेती संबंधित अधिवेशन आयोजित करण्यात आलं असून, त्यात या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. जपानची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी बुलेट ट्रेन हा प्रकल्प सुरु केला असल्याचं सांगत पवार यांनी, देशात महागाई, बेरोजगारी वाढत असल्याचं सांगितलं.  

****

लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला बाबा राम रहीम उर्फ गुरमीत सिंहची साथीदार हनीप्रीतला हरियाणातल्या जिरकपूर नजीक आज अटक करण्यात आली. बाबा राम रहीमला अटक केल्यानंतर हनीप्रीत विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.

****

राजकीय पक्षांना निधी देण्याच्या कायद्यात केलेल्या सुधारणांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला उत्तर देण्यास सांगितलं आहे. या सुधारणांमुळे राजकीय पक्षांना कंपन्यांकडून मिळणारा निधी बंद होणार असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.

****

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी येत्या १७ ऑक्टोबर पासून संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य वाहतुक कामगार संघटनेच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या या संपाला महाराष्ट्र मोटार कामगार महासंघ, विदर्भ एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस - इंटकनं पाठिंबा दिला असल्याचं महाराष्ट्र राज्य वाहतुक कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती तसंच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहीता आणि निवडणूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिले आहेत. नांदेड इथं निवडणूक आढावा बैठकीत ते आज बोलत होते. या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन मधल्या ३७ मतदान केंद्रांवर मतदान केल्याची पावती देणारं व्ही व्ही पॅट यंत्र राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी प्रथमच वापरण्यात येणार आहे. या यंत्राचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं.

****

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या एकशे चौदाव्या जयंतीदिनानिमित्त आज विधान भवन परिसरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामानंद तीर्थ यांना आदरांजली अर्पण केली.

****

येत्या पाच ते १६ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याकाळात शेतकऱ्यांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठेवावा, असं आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या आठव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बीडच्या केशरकाकू महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. क्षीरसागर यांनी संत ज्ञानेश्वर एवं संत मीराबाई की मधुराभक्ती या हिंदी ग्रंथासह नऊ मराठी पुस्तकं लिहीली आहेत.

****

औरंगाबाद इथं २०१२ साली दहशतवाद विरोधी पथकानं अटक केलेल्या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयानं दहा वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हिमायतबाग परिसरात झालेल्या या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. दोन आरोपींची न्यायालयानं सबळ पुराव्या अभावी सुटका केली.

****

किंगफीशर कंपनीचा मालक विजय मल्ल्या याला लंडन इथं अटक करण्यात आली आहे. काळा पैसा पांढरा केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...