Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 6 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६
नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
- सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
- ऊस दराची कोंडी फुटली; रास्त आणि किफायतशीर दराबरोबरच आणखी २०० रूपये वाढवून देण्याचा निर्णय
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी येत्या ७ डिसेंबरपासून राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्याचा किसान मंचचा निर्णय
- राज्य शासनाचे संगीत आणि नाट्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर
आणि
- महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेचं भारताला विजेतेपद
****
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचं, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. ते काल नागपूर इथं आयोजित धनगर आरक्षण निर्णायक
मेळाव्यात बोलत होते. धनगर समाजाला आरक्षण देण्यास शासन कटीबद्ध असून, याबाबत टाटा
समाज विज्ञान संस्थेचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, त्या आधारे केंद्र सरकारकडे आरक्षणाची
शिफारस करणार असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचं जाहिर केल्यानंतर धनगर
समाज बांधवानी सोलापूर इथं येळकोट येळकोट जय मल्हार अशी घोषणाबाजी करत भंडाऱ्याची उधळण
केली. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करुन जोरदार घोषणाबाजी
केली. तसंच दिलेला शब्द पाळल्याबद्दल शासनाचे आभार मानले.
दरम्यान, सोलापूर विद्यापीठाचं
नामांतर करून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचं शिवा आणि अखिल भारतीय विरशैव
लिंगायत युवक संघटनेनं म्हटलं असून मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर या संघटनांनी ठिकठिकाणी
निषेध नोंदवला तसंच काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा
पुतळाही जाळण्यात आला.
****
केंद्र सरकारसाठी देशाचा सर्वसमावेशक
विकास हा राष्ट्रधर्म तर गरीब, वंचितांचा सन्मानासह विकास ही राष्ट्रनिती असल्याचं
प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं आहे.
ते काल मुंबईत अल्पसंख्यांक कौशल्य विकासासंदर्भात आयोजित एका चर्चासत्रात बोलत होते. अल्पसंखांकांसोबतच दुर्बल घटकांच्या सामाजिक- आर्थिक
-शैक्षणिक सक्षमीकरणासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं
ते म्हणाले.
****
राज्य शासनाचे संगीत - नाट्य जीवनगौरव
पुरस्कार काल जाहीर झाले. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार,
ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत
रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना जाहीर झाला. सांस्कृतिक
कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. पाच लाख रूपये, मानपत्र
आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरुप आहे. येत्या २० तारखेला मुंबईत
बोरीवली इथं प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात
येणार आहेत.
****
राज्यातल्या ऊस दराची कोंडी
फुटली असून या वर्षीच्या साखर हंगामात रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपीवर आणखी २००
रूपये जादा देण्यावर शेतकऱ्यांच्या संघटना आणि कारखाना प्रतिनिधींच्या बैठकीत तोडगा
काढण्यात आला. कारखानदार आणि शेतकऱ्यांमधील ऊसदर कोंडीवर चर्चा करण्यासाठी कोल्हापूर
इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला. या निर्णयाला मान्यता देत आंदोलन मागे घेत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जाहीर केलं.
****
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी
देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी येत्या ७ डिसेंबरपासून राज्यभरात जेलभरो आंदोलन
करण्याचा निर्णय किसान मंचच्या राज्यस्तरीय बैठकीत काल औरंगाबाद इथं घेण्यात आला. यासाठी
दहा लाख शेतकरी शासनाच्या धोरणाविरूद्ध तुरूंगात जाण्याचं इच्छापत्र जिल्ह्याधिकाऱ्यांकडे
सादर करणार असल्याचं किसान मंचचे निमंत्रक शंकरअण्णा धोंडगे यांनी सांगितलं.
****
सरकारच्या
धोरणांमुळं शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला असून राज्यात आणि
देशात निर्माण झालेली परिस्थिती बदलून परिवर्तन करण्याची गरज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. उस्मानाबाद इथं आयोजित जन आक्रोश सभेत काल
ते बोलत होते. सरकारच्या कारभारावर कडाडून टिका करत शेतकरी आणि व्यापारी, जनतेचा आक्रोश
व्यक्त करण्यासाठी ही सभा असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठात राज्य शासनाचा आंतरविद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०१७ ला कालपासून प्रारंभ झाला. कुलगुरू डॉक्टर बी. व्यंकटेश्वरलू
यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं.
मोबाईल युगात संवाद संपला असल्यानं, कला संस्कृतीची जोपासना करणं, आवश्यक असल्याचं
कुलगुरू म्हणाले. आमदार पाटील यांनी, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ
मिळून, त्यातून चांगले कलाकार पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला.
****
आजच्या
युगात महात्मा गांधीजींचे विचार आत्मसात करणं महत्वाचं असल्याचं गांधीजींचे पणतु तुषार
गांधी यांनी म्हटलं आहे. काल लातूर इथं विद्यार्थी सहाय्यक मंडळाचं उद्घाटन केल्यानंतर
एकविसाव्या शतकाची आव्हाने आणि गांधी विचार या विषयावर ते बोलत होते. प्रश्न विचारण्याचा
प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो वापरलाच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
परिवर्तन
संस्थेचा, परिवर्तन नाट्यगौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखक गीतकार अरविंद जगताप यांना ज्येष्ठ
नाट्यकर्मी विजय दिवाण यांच्या हस्ते काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. शाल, सन्मान
चिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नाट्यमंदिराची निगा राखणं, ही महापालिकेइतकीच
नाट्य रसिक आणि सर्वसामान्य नागरिकांचीही जबाबदारी असल्याचं सांगून शहरातील संत एकनाथ
रंगमंदिराच्या दूरवस्थेबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
****
मराठी रंगभूमी दिन काल साजरा झाला. या अनुषंगानं ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं.
****
हिंदू धर्मात भोंदूबाबांसह
अंधश्रद्धेचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्याविरूद्ध जास्त बोलावं लागत असल्याचं अखिल भारतीय अंध्दश्रद्धा निर्मूलन
समितीचे संस्थापक प्राध्यापक शाम मानव यांनी म्हटलं आहे. हिंगोली इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. भोंदूविरुद्ध
थेट पुरावा पोलिसांना देऊन गुन्हा दाखल करा असं आपण अनेक वर्षांपासून सांगत आलो, मात्र
आता समाज पुढे येऊन भोंदूंना विरोध करत आहे असं त्यांनी नमूद केलं.
****
भारतानं
महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. जपानमध्ये काकामिगाहारा इथं
काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं चीनचा पेनल्टी शूट आऊटमध्ये पाच-चार असा पराभव
केला. या विजयामुळे भारतीय संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र
ठरला आहे.
****
जालना इथं आयोजित लांब अंतर
धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांच्या गटात बीडच्या संतोष मुंडेनं तर महिलांमधून
ज्योती गवते हीनं विजेतेपद पटकावलं. दहा आणि एकवीस किलोमीटर अंतरासाठी आणि पुरुष-महिला
खुला तसंच वृद्धांच्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यात जालन्यासह औरंगाबादच्या धावपटूंनी
प्रत्येकी सात पारितोषिकं मिळवली.
*******
No comments:
Post a Comment