Tuesday, 14 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.11.2017 01.00PM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १४ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

*******

फिलिपाईन्सची राजधानी मनीला इथं सुरु असलेल्या आसियान देशांच्या संमेलनात आज हवामान बदलावर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. विकसित राष्ट्रांनी जैवविविधता आणि आर्थिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी साधनं पुरवावीत, असं या निवेदनात म्हटलं आहे. आसियान राष्ट्रांमध्ये हवामान बदलाचं प्रमाण कमी करण्यासाठी विकसित देशांनी शंभर अब्ज डॉलर मदत देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासही यावेळी सांगण्यात आलं. 

दरम्यान, या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रोद्रिगो दुतेर्ते यांच्या बरोबर द्विपक्षीय चर्चा केली. दहशतवादाला आळा घालणं, व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याकरता सहकार्य करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी उभय देशांदरम्यान संरक्षण सहकार्य, शेती, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांबाबत चार सामंजस्य करार करण्यात आले.

पंतप्रधानांनी आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल, व्हिएतमानचे पंतप्रधान ग्वेन चॉन फुक, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, ब्रुनेई दारुसलामचे सुलतान हसन अल बोकिया, न्यूझीलंडचे पंतप्रधान जसिंडा आर्देन यांची भेट घेऊन परस्पर सहाकार्य वाढवण्यावर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी फिलिपाईन्स दौर्याच्या शेवटच्या दिवशी आज बारावी पूर्व आशिया शिखर परिषद आणि १५व्या आसिआन -भारत शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

****

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज बाल दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. शिक्षण, संगीत, क्रिडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या बालकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. 

****

विरोधी पक्षांच्या दबावामुळे सरकारला सुमारे २०० वस्तूंवरच्या वस्तू आणि सेवा करात कपात करावी लागली असल्याचा काँग्रेस पक्षानं केलेला दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावला आहे. कराच्या दरांमधे सुसूत्रता आणण्यासाठी गेले तीन ते चार महिने सतत काम चालू होतं, त्यानंतरच कराच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, निवडणुकांचं उद्दीष्ट डोळयांसमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचं म्हणणं हे बालीश राजकारण ठरेल, असं ते म्हणाले. करप्रणालीतला बदल हा सुरळीत पध्दतीनं व्हावा आणि त्याचा ताण जनतेला अचानकपणे येऊ नये हाच सरकारचा उद्देश असून, वाव मिळेल तेव्हा प्रक्रिया सुरळीत करण्याचे प्रयत्न चालूच राहतील असंही जेटली यांनी नमूद केलं.

****

जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. कुलगाम जिल्ह्यातल्या काजीगुंड भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या भागात शोधमोहीम सुरु केली, त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या परिसराला घेराव घालण्यात आला आहे.

तर दुसरीकडे पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागातल्या वनक्षेत्रात दुसरी चकमक झाली. ही चकमक अद्यापही सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जागतिक मधुमेह दिवस आज पाळण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह संघानं मधुमेहावर नियंत्रण आणण्यासाठी हा दिवस पाळण्याचं ठरवलं होतं. सर्वांनी सुदृढ आरोग्य राखण्याचा संकल्प केला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

****

कर्नाटकातल्या बेळगाव इथं आजपासून सीमावासीयांचा माहमेळावा सुरु झाला. मात्र या मेळाव्यात महाराष्ट्राच्या नेत्यांना बंदी घालण्यात आल्याचं बेळगावच्या जिल्हाधिकार्यांनी सांगितलं. या नेत्यांना आज मध्यरात्रीपर्यंत बेळगावमध्ये प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. भाषिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यानं ही बंदी घालण्यात आल्याचं या आदेशात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या छावणी परिसरातल्या सामान्य रुग्णालयात दाखल होत असलेल्या गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, हजारो रुग्णांवर उपचार सुरु आहेत. प्रशासनाने या भागातल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, रूग्णांची संख्या जास्त असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****

२०१९ मध्ये होणाऱ्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यासाठी सुरु असलेल्या साखळी सामन्यात आज भारताचा सामना म्यानमार विरुद्ध होणार आहे.

दरम्यान, फिफा जागतिक चषक फुटबॉल स्पर्धेसाठी गेल्या  ६० वर्षांमधे प्रथमच इटली अपात्र ठरला आहे. चार वेळा चषक जिंकलेल्या इटलीच्या संघाला यंदा जागतिक चषकासाठीच्या युरोपियन पात्रता साखळीत स्वीडनकडून शून्य-एक असा पराभव पत्करावा लागला. 

****

चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा आजपासून चीनमधल्या फुझोऊ इथं सुरु होत आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणय या स्पर्धेत हाभागी होत आहेत. के श्रीकांतनं दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

*******

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...