Tuesday, 14 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा लाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या चकमकीत भारतीय सेनादलाचा एक जवानही शहीद झाल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुरक्षा दलाच्या जवानांना काजिगडमधल्या नौबग गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली, त्यानंतर जवानांनी गावाला चारही बाजूंनी घेराव घातला. त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. अजूनही ही चकमक सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नागरिकांना उत्तम आरोग्य उपलब्ध करुन देणं, हे सरकारचं प्रमुख उद्दीष्ट असून, त्यातूच सामाजिक आणि आर्थिक विकास साधता येईल, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं देशात आजारांच्या वाढत्या प्रमाणाचा अहवाल नायडू यांनी आज जारी केला, त्यावेळी ते बोलत होते. देशात कुपोषणामुळे होणाऱ्या गंभीर आजरांवर लवकरात लवकर उपचार होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय आरोग्य धोरणात वाढत्या आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा कार्यान्वित करण्याची शिफारस करण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी यावेळी सांगितलं.

****

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज ठिकठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मधल्या रामगिरी इथं नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
बाल दिनही आज मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई इथं महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मंडळच्यावतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भावी आयुष्य निकोपपणे घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर त्यांची निरागसता जोपासली पाहिजे, असं मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केलं. औरंगाबाद इथंही बाल दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.

****

क्रांतीगुरू लहुजी साळवे यांची २२३वी जयंती आज औरंगाबाद इथं उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातल्या बळीराम पाटील शाळेजवळील क्रांतीगुरू लहुजी साळवे चौकातल्या पुतळ्यास महापौर नंदकुमार घोडले, उपमहापौर विजय औताडे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जिल्हा जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटना आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

****

वस्तू आणि सेवा कर प्रणालीत हॉटेल आणि उपाहारगृहांचे कर दर पाच टक्क्यांनी कमी करण्यात आले असून, याबद्दलची अधिसूचना निर्गमित होताच या कमी कर दराचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन अर्थमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी केलं आहे. मुंबई इथं आज हॉटेल आणि उपाहारगृहांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी मुनगंटीवार यांची भेट घेऊन करदर कमी केल्याबद्दल आभार व्यक्त केले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना शासनानं नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं ते म्हणाले.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी मनसेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकली नाही. मनसेच्या सहा नगरसेवकांचं पक्षांतर बेकायदेशीर असून, त्यांना अपात्र ठरवावं अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांपुढे आज ही सुनावणी होणार होती. गेल्या महिन्यात मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

****

जालना जिल्ह्यातल्या ३६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागानं आज निलंबित केले. यवतमाळ इथं कीटकनाशक फवारणीनंतर काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जालना कृषी विभागानं कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये जवळपास १०० कृषीसेवा केंद्रांमध्ये कीटकनाशक विक्रीच्या नियमांचं पालन होत नसल्याचं समोर आल्यानंतर कृषी विभागानं ही कारवाई केली. ५० कृषी सेवा केंद्रचालकांना नोटिसा बजावण्यात आल्याचं जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी आकाशवाणी प्रतिनिधिशी बोलताना सांगितलं.

****

औरंगाबाद इथल्या छावणी परिसरात दूषित पाण्यामुळे मागील दोन दिवसांपासून तीनशेहून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. अजूनही काही जणांना आजाराची लागण सुरूच आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज रूग्णांची भेट घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी जलवाहिनीमधल्या दूषित पाण्याचीही पाहणी केली. प्रशासनानं या भागातल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, रूग्णांची संख्या जास्त असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...