Saturday, 4 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारत संशोधन आधारित शिक्षणाकडे वाटचाल करत असून त्याआधारे देश उभारणीसाठी उत्पादन आणि तंत्रज्ञान निर्मिती करत असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये ४८ व्या भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आय आय टी दिल्लीच्या पदवीप्रदान समारंभात बोलत होते. आय आय टी व्यवस्था म्हणजे देशाच्या तंत्रशिक्षणाचं सुवर्ण मानक असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. प्रदुषणापासून संरक्षण करण्यासासाठी आय आय टी दिल्लीनं विकसीत केलेल्या नॅनो फिल्टर उपकरणाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं.

****

‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा मेळावा भारताच्या कृषी विकासासाठी एक उत्तम व्यासपीठ असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया या मेळाव्याअंतर्गत आयोजित फळं आणि भाज्यांसंबंधीच्या संमेलनात ते आज बोलत होते. सरकारनं अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक पावलं उचलली असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, वर्ल्ड फूड इंडियाच्या प्रदर्शनात आज आठशे किलो खिचडी शिजवण्यात आली. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल, योग गुरु बाबा रामदेव, प्रसिद्ध आचारी संजीव कपूर यावेळी उपस्थित होते. जागतिक विक्रम बनवण्यासाठी आणि भारतीय खाद्यपदार्थांचा जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

****

गुजरातमधल्या अक्षरधाम मंदीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल रशीद अजमेरी याला आज अहमदाबाद विमानतळावरुन अटक करण्यात आली. या हल्ल्यानंतर तो सौदी अरेबियामध्ये पळून गेला होता. २४ सप्टेंबर २००२ साली झालेल्या या हल्ल्यात ३२ जणांचा मृत्यू झाला होता.

****

येत्या तीन वर्षांत राज्याच्या कानाकोपऱ्यात वीजेचा पुरवठा करणारे फीडर बसवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथं उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रकल्पातून आगामी तीन महिन्यात दोन मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे सलग १२ तास अखंड वीज उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातला पहिला ग्रामरक्षक दलही अहमदनगर जिल्ह्यात स्थापन करण्यात आला असून, ग्रामरक्षक दलाच्या पुढाकारातून प्रत्येक गाव दारुमुक्त होऊ शकतं, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री सौर प्रकल्पाचं लोकार्पण करताना एका युवकानं व्यासपीठाच्या दिशेनं धाव घेतली, मात्र पोलिसांनी तातडीनं धावणाऱ्या युवकाला ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जवळ जाऊ न दिल्याच्या रागातून या तरुणानं सुरक्षाकडं तोडून व्यासपीठाकडे धाव घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

मुंबई-गोवा महामार्गावर टाकेवाडी-खारेपाटण इथं चालकाचा ताबा सुटल्यानं खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटून १२ जण जखमी झाले. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रामेश्वर ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून आचऱ्याला जात होती. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना कणकवलीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसचा चालक आणि क्लीनर फरार आहे.

****

जालना जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विवेकानंद हॉयस्कूलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शिक्षकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. शिक्षकांना करावी लागणारी ऑनलाइन कामं बंद करावी, जुनी पेंशन योजना लागू करावी आदी मागण्यांचं निवेदन समितीच्या वतीनं या वेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना देण्यात आलं.

****

जालना इथल्या फन रनर ग्रुपच्यावतीनं उद्या हॉफ मॅरेथान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. जालन्यात प्रथमच आयोजित या स्पर्धेत दोन हजार १०० धावपटू सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. 

****

व्हिएतनाम मध्ये सुरु असलेल्या आशिया महिला मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत  भारताची एम सी मेरी कोम उपान्त्य फेरीत पोहोचली आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेरी कोमनं चीनी तैपेईच्या मेंग ची पिनचा पराभव केला. उपान्त्य फेरीत मेरी कोमचा सामना जपानच्या त्सुबासा कोमुरा बरोबर होणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसरा टी-ट्वेंटी सामना आज होणार आहे. संध्याकाळी सात वाजता राजकोट इथं या सामन्याला सुरुवात होईल. गेल्या बुधवारी दिल्ली इथं झालेला पहिला सामना भारतानं जिंकून तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...