Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 06 November 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
पॅराडाईज पेपर्स प्रकरणात केंद्र
सरकारनं चौकशीचे आदेश जारी करावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात वार्ताहरांशी बोलताना, विदेशात
काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकार काहीही कारवाई करत नसल्याची टीका
केली. काल जारी झालेल्या पॅराडाईज प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा, भाजपचे
राज्यसभेचे सदस्य आर के सिन्हा यांच्यासह ७१४ भारतीयांची नावं आली आहेत. सिन्हा यांनी
हे प्रकरण आपण पूर्वी काम करत असलेल्या कंपनीशी निगडित असून, त्याचा आपल्याशी वैयक्तिक
संबंध नसल्याचं, स्पष्ट केलं आहे.
****
बँकिंग
प्रणालीत असलेलं असंतुलन दूर करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं पंजाब नॅशनल बँकेच्या नवीन कार्यालयाचं
उद्घाटन आज जेटली यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी
उत्तम बँकिंग प्रणाली विकसित करण्यासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
डिजीटल शिक्षण नव्या विचारांना
जन्म देतं त्यामुळे येत्या काही वर्षात डिजीटल वर्ग मोहीम सुरू करणार असल्याचं केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं
नवी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यशाळेचं उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. शिक्षण
क्षेत्रातल्या महत्त्वाच्या संकल्पनांवर आणि डिजिटल शिक्षणावर चर्चा करण्यासाठी या
कार्यशाळेत शिक्षण क्षेत्राशी संबंधित स्वयंसेवी संस्था, खाजगी शिक्षणसंस्था तसंच शिक्षणतज्ज्ञ
सहभागी झाले आहेत.
****
एयर इंडिया या विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीमध्ये तृतीयपंथीयांसाठी
आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार तसंच एयर इंडियाला
नोटीस जारी केली आहे. कोणत्याही विमान कंपनीमध्ये नोकरीसाठी तृतीयपंथीयांचा विचार केला
जात नाही, त्यामुळे यात त्यांच्यासाठी तिसरी श्रेणी निर्माण करावी, अशी मागणी या याचिकेत
केली आहे. याचिकाकर्त्यांनं एयर इंडियाची केबिन क्रू ची परीक्षा उत्तीर्ण करूनही त्याला
सेवेत घेतलं नसल्यानं, त्यानं ही याचिका दाखल केली.
****
२०१९ हे साल राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार शरद पवार
यांचं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. खासदार
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचं दोन दिवसीय चिंतन शिबीर आजपासून रायगड जिल्ह्यातल्या
कर्जत इथं सुरु झालं, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या उद्घाटन सत्रात प्रदेशाध्यक्ष
सुनील तटकरे यांनी, कर्जमाफी योजनेवरून भारतीय जनता पक्षावर टीका केली. ही कर्जमाफी
फसवी असल्यानं जनतेत मोठी नाराजी असून, त्याचं प्रतिबिंब सामाजिक माध्यमांवरही ठळकपणे
उमटत असल्याचं ते म्हणाले.
****
मंत्रालयात आज झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनी नागरिकांच्या
विविध विभागांशी निगडीत १३ तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावणी घेतली. या लोकशाही
दिनात विविध विभागांशी संबंधित लातूर, औरंगाबाद,
हिंगोली या जिल्ह्यांतल्या तक्रारींचा समावेश होता. ‘आपले सरकार’ वेब पोर्टलवरच्या तक्रार
निवारण प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या पाच तक्रारींवरही यावेळी निर्णय घेण्यात आला.
****
राज्य उर्दु अकादमीचे २०१५ आणि २०१६ वर्षासाठीचे विविध
पुरस्कार आज जाहीर झाले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये औरंगाबादचे नुरुल हसनैन,
असवद गौहर, डॉ कीर्ती जावळे, डॉ शर्फुनिहार, अब्दुल वहीद, शेख मोहम्मद शरफुद्दीन, डॉ
अब्दुल अजीज, मोहम्मद अब्दुल हाई, डॉ सहर सईदी, इंतेकाज अफजल, बीडचे काझी मकदुम, सबीहा
बेगम, मोहसीन अहमद, सिद्दीकी मोहम्मद इरफान, अंबाजोगाईचे डॉ अकोला गौस, लातूरचे डॉ
मोहम्मद खलील सिद्दीकी, नांदेडचे मोहम्मद इमामुद्दीन, परभणीचे डॉ सलीम मोहियोद्दीन
यांचा समावेश आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना इथं उद्या 'समरसता संगम’ सभेचं आयोजन
करण्यात आलं आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्गे बुलडाण्याकड़े जाणाऱ्या मार्गावरील
वाहतूक उद्या दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत बंद असणार आहे.
****
नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस
गाडी येत्या १४ नोव्हेंबरला राजपुरा, ऐवजी चंदीगड मार्गे धावणार आहे. अंबाला कॅन्टीन
इथं रेल्वे पुलाच्या कामासाठी हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
****
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर इथल्या प्रशिक्षण
केंद्रात १४ व्या तुकडीतल्या ११७ प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी
प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा पोलीस उपमहानिरिक्षक डॉ डी
जे सिंह उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment