Wednesday, 3 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.01.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 3 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ जानेवारी २०१ दुपारी १.०० वा.

****



 भारिप बहुजन महासंघासह इतर अनेक संघटनांच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये आंदोलकांनी सकाळी रेल्वेमार्गांवर उतरून रेल रोको केल्यामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची सेवा काही काळ विस्कळित झाली. नाशिक मध्ये शहर बससेवा सुरळीत असल्याचं मात्र दुकानं आणि चित्रपटगृहं बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यातल्या कांदा बाजारपेठेत कांद्याचे लिलाव सकाळी बंद ठेवण्यात आले होते. वाशीम शहरात या बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे. नंदूरबार इथं एसटीबस वर दगडफेक झाली, धुळे जिल्ह्यात बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाला असून तिथे शाळा महाविद्यालयं, बाजारपेठ आणि एसटी सेवा बंद आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून, तिथल्या शैक्षणिक संस्था आणि एसटी सेवा बंद आहेत. हिंगोली तहसील कार्यालयावर काल रात्री दगडफेक करून खिडक्यांची तावदानं फोडण्यात आली. वसमत इथं रात्री जाळपोळीच्या काही घटना घडल्या. एसटी सेवा बंद ठेवण्यात आली असून, बाजारपेठेत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. जालना इथं दलित संघटनांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली, सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोलापूर इथं बसवर झालेल्या दगडफेकीत पाच विद्यार्थी जखमी झाल्याचं वृत्त आहे. साताऱ्यात आंदोलकांकडून रास्ता रोको आणि वाहनांच्या मोडतोडीच्या घटना घडल्याचं आणि तिथली एसटी सेवा बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद आज संसदेत ही उमटले. राज्यसभेत काँग्रेस तसंच बहुजन समाज पक्षाच्या खासदारांनी भीमा कोरेगाव इथं घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात झालेल्या हिंसक आंदोलनाचा मुद्दा लावून धरला, त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.

****

 लोकसभेत शून्यकाळात भीमा कोरेगाव हिंसक घटनेच्या मुद्यावर अनेक सदस्यांनी आपली मतं मांडली. या घटनेसंदर्भात सर्व सदस्यांनी जबाबदारीनं मतं मांडून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं. या प्रकरणी पंतप्रधानांनी निवेदन द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी या प्रकरणी राजकारण करू नये, असं आवाहन केलं. जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे, शिरूरचे खासदार शिवाजी आढळराव पाटील, यांच्यासह अनेक सदस्यांनी या घटनेचा निषेध केला. त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केली.

****

 त्यापूर्वी प्रश्नोत्तराच्या तासात हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी देशाच्या सीमेवर अभेद्य बंकर्स उभारण्याची कालमर्यादा तसंच बुलेटप्रूफ जॅकेट्सच्या खरेदीबाबत प्रश्न विचारला, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी, बंकर्सच्या कामासाठी विविध संस्थांकडून निविदा प्राप्त झाल्या असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरात लवकर हे काम पूर्ण होणं अपेक्षित असल्याचं सांगितलं. सध्या ५० हजार बुलेटप्रूफ जॅकेट्सची खरेदी पूर्ण झाली असून, सुमारे दोन लाख जॅकेट्स खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचं, त्यांनी सांगितलं.

 रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी, रेल्वेची अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा लवकरच कार्यान्वीत होणार असून, यामुळे रेल्वे वाहतुक अधिक सुरळीत होणार असल्याचं सांगितलं. कमी दृष्यमानतेतही, रेल्वे वाहतुक सुरळीत ठेवणारं तंत्रज्ञान कार्यान्वीत केल्यानं, दाट धुके असताना गाड्या उशीरा धावण्याचं प्रमाण कमी झाल्याचं गोयल म्हणाले.

 जम्मू काश्मीरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर सैन्यदलातल्या जवानांना हौतात्म्य येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याकडे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी लक्ष वेधलं. सीमेपलिकडून होणारे हल्ले मोडून काढण्याचे सेनेला स्पष्ट आदेश द्यावेत, असं यादव म्हणाले.

****

 आज स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. राज्यभरात यानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या नायगाव इथे आज, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते, सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा तसंच माझी कन्या भाग्यश्री, या योजनेच्या प्रचार चित्ररथाचा शुभारंभ होणार आहे.

*****

No comments: