Thursday, 4 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ जानेवारी २०१ सकाळी .५० मि.

****



Ø भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद; काही ठिकाणी बंदला हिंसक वळण; दगडफेक आणि लाठीमारात अनेकजण जखमी

Ø घटनेची पाळंमुळं शोधून दोषींवर कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन; संसदेतही पडसाद, कामकाज स्थगित

Ø धान्य आणि साखर भरण्यासाठी गोणपाटाचा वापर अनिवार्य करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीची मंजुरी

Ø विदर्भातले माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांचं निधन

आणि

Ø उस्मानाबाद जिल्हा झाला संपूर्ण निर्मल

*****

 भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ काल राज्यभर पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल सायंकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, बंद शांततेत पार पडल्याचं सांगितलं.

 या बंदला मुंबई तसंच नवी मुंबईतही चांगला प्रतिसाद मिळाला, बाजारपेठा तसंच बहुतांशी शैक्षणिक संस्था  बंद होत्या. अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. मुंबईत रेल्वे तसंच मेट्रो वाहतुकही काही काळ रोखून धरण्यात आली होती. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पनवेल इथं रोखून धरण्यात आला होता. मुंबईत बेस्टच्या ४८ बसेसवर झालेल्या दगडफेकीत चार बस चालक जखमी झाले. भिवंडी इथं काढलेल्या निषेध मोर्चाला हिंसक वळण लागलं. मोर्चात सहभागी तरूणांनी खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. काही एसटी बसेस तसंच खासगी वाहनांचंही दगडफेकीत नुकसान झाल्याचं वृत्त आहे. पालघर रेल्वे स्थानकातही आंदोलकांनी रेल्वेगाड्या अडवून ठेवल्या होत्या.

सोलापूर इथं बहुतांशी बाजार बंद होता. एका बसवर झालेल्या दगडफेकीत पाच विद्यार्थी जखमी झाल्याचं वृत्त आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही दुकानं, वाहनांवर तसंच, पोलिसांवर दगडफेक झाली. दुपारपर्यंत शहराच्या सर्वच रस्त्यांवर मोर्चे, दगडफेक, घोषणाबाजी, पोलिसांचा लाठीमार झाल्यामुळे शहरातलं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. परिस्थिती  नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

 सातारा शहरातही आंदोलकांनी एका रिक्षाची तोडफोड केली. कोल्हापूर इथं प्रक्षुब्ध जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना आवाजी गोळीबार करावा लागला, जमावाच्या दगडफेकीत एका अधिकाऱ्यासह सात पोलिस जखमी झाले. अहमदनगर इथं एसटी बसेससह दूध संघाच्या कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक करून, संकलित केलेलं दूध ओतून दिलं. गडचिरोलीतही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भंडारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार न होता बंद शांततेत पाळण्यात आला.

 नाशिक जिल्ह्यातल्या कांदा बाजारपेठेत कांद्याचे लिलाव सकाळी बंद ठेवण्यात आले होते. वाशीम शहरात या बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे. नंदूरबार इथं एसटीबस वर दगडफेक झाली, धुळे जिल्ह्यात बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाला असून तिथे शाळा महाविद्यालयं, बाजारपेठ आणि एसटी सेवा बंद होती.

मराठवाड्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद शहरात ३७ ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. जमावाला पांगवण्यासाठी आठ ठिकाणी लाठीमार तर १४ ठिकाणी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. याशिवाय प्लास्टिक गोळीबारही काही भागात करण्यात आला. काल दिवसभरात शहरात ११ पोलिसांच्या वाहनांचंही नुकसान झालं, त्याचबरोबर दगडफेकीच्या घटनांमध्ये १७ पोलिस जखमी झाले. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतल्याचं, सिडको पोलिसांकडून सांगण्यात आलं. परभणी शहरासह जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला, जिल्ह्यात शैक्षणिक संस्था आणि एसटी सेवा बंद होत्या. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं दगडफेक करणाऱ्या जमावावर पोलिसांना लाठीमार करावा लागला. औंढा नागनाथ इथं आंदोलकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं. हिंगोली तहसील कार्यालयावर दगडफेक करून खिडक्यांची तावदानं फोडण्यात आली. वसमत इथंही मंगळवारी रात्री जाळपोळीच्या काही घटना घडल्या. एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती.

उस्मानाबाद शहरात बंद शांततेत पाळण्यात आला. बंद काळात शैक्षणिक संस्था तसंच बस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

 लातूर जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शांततेत होणाऱ्या बंदला निलंगा शहरात मात्र गालबोट लागलं. आंदोलकांच्या दगडफेकीत पोलीस अधीकारी कर्मचारी असे १३ जण जखमी झाले असून काही नागरिकही जखमी झाले आहेत. तणावाची परिस्थीती लक्षात घेवून शहरात रात्री ९ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली होती.

 नांदेड शहर आणि जिल्ह्यात बससेवा पूर्णपणे बंद होती. या बंद मुळे कालच्या आठवडी बाजारावर विपरीत परिणाम झाला. हदगाव तालुक्यात एका विद्यार्थ्याचा पोलिस लाठीमारात मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, मात्र पोलिसांनी हा मृत्य लाठीमारात झाला नसून चक्कर आल्यामुळे झाल्याचा खुलासा केला आहे.

 जालना जिल्ह्यात मंगळवारी १५ बसेसचं नुकसान झाल्यानं, काल एस टी बस सेवा पूर्ण बंद होती. दलित संघटनांनी एक मोर्चा काढून जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना एक निवेदन सादर केलं.

 मराठवाड्यात इतरत्रही बंदच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

****

 भीमा कोरेगाव इथल्या घटनेची प्रकरणाची पाळंमुळं शोधून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. रिपब्लीकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला.

****

 भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद काल संसदेत ही उमटले. राज्यसभेत काँग्रेस तसंच बहुजन समाज पक्षाच्या खासदारांनी भीमा कोरेगाव इथं घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात झालेल्या हिंसक आंदोलनाचा मुद्दा लावून धरला, त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं. लोकसभेत शून्यकाळात भीमा कोरेगाव हिंसक घटनेच्या मुद्यावर अनेक सदस्यांनी आपली मतं मांडली.  जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे, शिरूरचे खासदार शिवाजी आढळराव पाटील, यांच्यासह अनेक सदस्यांनी या घटनेचा निषेध केला. त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं.

****

 मुस्लीम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक संदर्भातलं विधेयक काल दुपारनंतरच्या सत्रात राज्यसभेत मांडण्यात आलं. काँग्रेस पक्षानं हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची मागणी केली. यावरून सुरू झालेला गदारोळ वाढत गेल्यानं, कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

 धान्य आणि साखर भरण्यासाठी गोणपाटाचा वापर अनिवार्य करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीनं काल मंजुरी दिली. या निर्णयामुळे, नव्वद टक्के धान्यं आणि वीस टक्के साखर अनिवार्यपणे ज्यूटच्या पिशव्यांमध्येच भरावी लागेल. या समितीनं जल मार्ग  विकास प्रकल्पालाही काल मंजुरी दिली. पर्यावरणानुकूल असणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे सव्वा कोटी रोजगार उपलब्ध होतील.

*****



 संत सेवालाल महाराज जयंती, संत गाडगे बाबा महाराज जयंती, संत तुकडोजी महाराज जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती, आणि बिरसा मुंडा जयंती साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याची मागणी  विविध स्तरावरून शासनाकडे वारंवार केली जात होती.

****

उस्मानाबाद नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाली. भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार, तर  काँग्रेस, राष्ट्रवादी  काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार सभापतीपदी  बिनविरोध निवडून आल.

****

 ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री मधुकरराव किंमतकर यांचं काल सकाळी नागपूर इथं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केलं होतं. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ- म्हाडाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.

****

 स्वच्छ भारत अभियानातर्गंत उस्मानाबाद जिल्ह्यात ३० डिसेंबर अखेर दोन लाख ३२ हजार ५९७ वैयक्तिक शौचालयं बांधण्यात आली आहेत, यामुळे जिल्हा १०० टक्के  निर्मल झाला आहे. या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.....



 वैयक्तीक शौचालय बांधकाम ३० डिसेंबर पर्यंत पूर्ण केल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा १०० टक्के हगणदारीमुक्त अर्थात निर्मल जिल्हा झाला आहे. या अभियानाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाच्या वतीनं मिशन ९० दिवस हा उपक्रम घेण्यात आला. या पुढच्या काळात स्वच्छता अभियानाच्या पुढच्या टप्प्यात गावागावात स्वच्छ ग्राम सिंचन युक्त शिवार, साक्षर ग्राम, स्वास्थमय ग्राम, समृध्द ग्रामअंतर्गत पंचसूत्री कार्यक्रम राबवला जाणार आहे. शौचालयाचा नियमित वापर, पाणी गुणवत्ता,जलसाक्षरता,परिसर स्वच्छता,घणकचरा,सांडपाणी व्यवस्थापन, किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन सुविधा उपलब्ध करून देणं आदि उपक्रम राबवले जाणार आहेत.



****

      मुंबईत मरोळ भागातल्या मैमून इमारतीला आग लागून चार जणांचा मूत्यू तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही आग लागली.

****

 जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्याविरुद्ध काल विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात कार्यरत महिला अधिकार्यानं  यासंदर्भात फिर्याद दिली होती. प्रकल्प अहवालबाबत माहिती देण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात गेल्यानंतर त्यांनी अन्टीचेंबरमध्ये बोलावून विनयभंग केल्याचं फिर्यादित म्हटलं आहे.

*****


No comments: