आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
४ जानेवारी २९१८ सकाळी
११.००
****
चारा घोटाळ्याप्रकरणी रांचीचं विशेष सीबीआय न्यायालय
आज शिक्षा सुनावणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालु प्रसाद यादव यांच्यासह १५
जणांना या प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. १९९१ ते
१९९४ या काळात देवघर कोषागारातून अवैध पद्धतीनं ८९ लाख
रुपये काढण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर
पुतीन यांनी भारत रशिया धोरणात्मक संबंधांना अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला
आहे. काल दूरध्वनीवरुन झालेल्या चर्चेत दोन्ही नेत्यांनी उभय देशांदरम्यान द्विपक्षीय
संबंध आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सहकार्य करण्यावर भर दिला.
****
वैयक्तीक शौचालयं बांधकाम ३० डिसेंबर पर्यंत पूर्ण
केल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा शंभर टक्के उघड्यावर शौचापासून मुक्त झाला आहे. या अभियानाला
गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाच्या वतीनं मिशन ९० दिवस हा उपक्रम
घेण्यात आला. या पुढच्या काळात स्वच्छता अभियानाच्या पुढच्या टप्प्यात गावागावात स्वच्छ
ग्राम सिंचन युक्त शिवार, साक्षर ग्राम, स्वास्थमय ग्राम, समृध्द ग्रामअंतर्गत पंचसूत्री
कार्यक्रम राबवला जाणार आहे. शौचालयाचा नियमित वापर, पाणी गुणवत्ता, जलसाक्षरता, परिसर
स्वच्छता, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन
सुविधा उपलब्ध करून देणं आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत
लातूर जिल्ह्यातल्या एक लाख पाच हजार ६६३ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर २५३ कोटी ८२
लाख रुपये जमा झाले आहेत. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी काल लातूर इथं वार्ताहर
परिषदेत ही माहिती दिली. उर्वरीत ५७ कोटी ५५ लाख रुपये येत्या दोन दिवसात जमा होणार
असल्याचं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल विषय
समित्यांच्या सभापतींची निवड झाली. भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार सभापतीपदी
बिनविरोध निवडून आला.
*****
No comments:
Post a Comment