Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 4 January 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ जानेवारी २०१८ दुपारी
१.०० वा.
****
राज्यसभेत
आज कामकाज सुरु होताच भिमा कोरेगाव प्रकरणावर चर्चा करण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांनी
या घटनेचा निषेध केला. ही घटना निंदनीय असून, राजकीय पक्षांनी याचं राजकारण करु नये,
असं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. भविष्यात अशा घटना घडू
नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तर छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या घराण्याचा वारस म्हणून या घटनेनं तीव्र दु:ख झालं असल्याचं खासदार छत्रपती
संभाजीराजे यावेळी म्हणाले. राज्यातल्या जनतेनं शांतता राखण्याचं आवाहन करत त्यांनी,
समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार
यांनी शांतता आणि ऐक्य राखण्याची गरज व्यक्त केली. सरकारनं राज्यातली तणावाची स्थिती
हाताळण्यासाठी सक्षम पोलिस यंत्रणा उभारली होती. यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली,
असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले.
****
दरम्यान, या घटनेनंतर राज्यात आज जनजीवन पूर्वपदावर
येत आहे. गेले दोन दिवस राज्यात दगडफेक, जाळपोळ यासारख्या घटनांनी तणावपूर्ण स्थिती
होती. आज सकाळपासून एसटी बस सेवा आणि इतर वाहतूक सुरळीत सुरु आहे.
****
देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात झाली.
हे सर्वेक्षण चार हजारांहून जास्त शहरांमध्ये केलं जाणार असून, या माध्यमातून शहरी
भागात स्वच्छतेच्या पातळीचं मूल्यांकन केलं जाणार आहे. येत्या दहा मार्च पर्यंत हे
सर्वेक्षण सुरु राहणार आहे. युवकांनी आपापल्या शहरातल्या स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग
नोंदवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या मन की बात या कार्यक्रमात
केलं होतं.
****
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड - बी एस एन एल नं अनिवासी
भारतीय, ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी मोबाईक
क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या व्यक्तींना
घरबसल्या मोबाईल आणि आधार क्रमांक जोडता येईल, असं बीएसएनएलनं जारी केलेल्या पत्रकात
म्हटलं आहे. बीएसएनएलच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
रेल्वे स्थानकांवर प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना,
रेल्वेगाडी एका तासापेक्षा जास्त उशिरानं धावत असल्यास, त्याची माहिती आता एस एम एस
द्वारे मिळणार आहे. एक हजार १०४ रेल्वेगाड्यांसाठी ही सुविधा उपलब्ध असल्याचं रेल्वेच्या
सूत्रांनी सांगितलं. या उपक्रमामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी कमी होण्यास मदत मिळाली
असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
दाट धुक्यामुळे राजधानी
दिल्लीत रेल्वे, तसंच विमान सेवेवर परिणाम झाला आहे. इंदिरा
गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दृष्यमानता कमी झाल्यानं २४ देशांतर्गत, तसंच
१२ आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या वेळेवर परिणाम झाला आहे. धुक्यामुळे
२१ रेल्वेगाडया रद्द करण्यात आल्या आहेत, तर
५९ गाड्या
उशिरानं धावत आहेत.
****
अमृतसरहून नांदेडला येणारी सचखंड जलद रेल्वेगाडी
१६ तास उशिरानं नांदेडला पोहचत असल्यामुळे, आज नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड जलद
रेल्वेगाडी रात्री साडे आठ वाजता सुटणार आहे, तसंच नांदेड- श्रीगंगानगर जलद रेल्वेगाडी
आज साडेतीन वाजता सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
जन्माच्या वेळी होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी गरीब कुटुंबातल्या
गर्भवतींकरता, प्रसूती होण्यापूर्वी रुग्णालयांच्या
जवळपासच्या परिसरात राहण्याची सोय करावी, अशी सूचना यासंदर्भातल्या समितीनं केली
आहे. या समितीनं ‘महिलांचं आरोग्य आणि संभाव्य उपाययोजना’ याविषयीचा
अहवाल संसदेत सादर केला. गरीब महिलांना प्रसूतीच्या वेळी रुग्णालयात
नेण्याकरता लागणारा वेळ आणि पैसे यांची त्यामुळे बचत होईल आणि माता बालमृत्यूंना काही
प्रमाणात आळा बसेल, असं
या अहवालात म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारच्या सिंचन आणि ऊर्जा मंडळातर्फे दिला जाणारा
उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. नवी दिल्लीत
काल झालेल्या सोहळ्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यात
सुमारे १३ लाख लाभ क्षेत्रावर तीन हजार २४२ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असून, याचीच
नोंद या पुरस्कारासाठी घेतल्याचं महाजन यांनी सांगितलं. राज्यात यावर्षी जवळपास ४०
लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे, हा राज्याच्या इतिहासातला
उच्चांक असल्याचं ते म्हणाले.
****
पुण्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेत
पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत, भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि जीवन
नेदुन्येझियान यांची लढत फ्रान्सच्या पिएरे ह्यूजेस
हर्बर्ट आणि गिलीज सिमॉन यांच्यांशी आज होणार आहे. रोहन
आणि जीवन यांनी याआधीच्या लढतीत भारताच्या लिअॅंडर पेस आणि पुरव राजा यांचा सहा-तीन,
सहा-दोन असा पराभव केला होता.
*****
No comments:
Post a Comment