आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
६ जानेवारी
२०१८ सकाळी ११.००
****
दर्पण दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना
अभिवादन करण्यासाठी सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पत्रकारितेच्या
क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल, विविध संस्था संघटनांच्या वतीनं पत्रकारांना पुरस्कार
देऊन गौरवलं जाणार आहे.
****
राज्य सरकारनं खासगीरित्या पुरवल्या जाणाऱ्या पोलिस संरक्षणासंदर्भातले निकष
काल जारी केले. सशस्त्र अथवा साध्या सुरक्षेसाठी आता शुल्क अदा करावं लागणार आहे. संबंधित
नागरिकाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन, हे शुल्क आकारले जाईल. संबंधित व्यक्तीला तीन
महिन्याच्या शुल्काइतकी रक्कम बँक गॅरंटी म्हणून जमा करावी लागेल. मासिक ५० हजार रुपयांपेक्षा
कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना मात्र आवश्यकतेनुसार ही सुविधा विनाशुल्क पुरवली जाणार
आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं परवा घडलेल्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत
चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी
म्हटलं आहे. उपविभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, बुधवारी पुकारण्यात
आलेल्या बंद दरम्यान निलंगा इथं झालेल्या दगडफेक प्रकरणी, दीडशे महिला पुरुषांविरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेड इथून सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज धावणार नाही. अमृतसर हून येणारी सचखंड एक्सप्रेस
उशीरा धावत असल्यानं, हा निर्णय घेण्यात आला. नांदेड - उना हिमाचल नांगलडेम एक्स्प्रेसही सकाळी अकरा वाजेऐवजी
दुपारी चार वाजता सुटणार आहे.
****
मांजरा प्रकल्पाचं
उपविभागीय कार्यालय लातूरहून अंबाजोगाईला स्थलांतरित करू नये, अशी मागणी लातूर जिल्ह्यातून
केली जात आहे. मांजरा प्रकल्पाच्या एकूण लाभक्षेत्राच्या सुमारे ६५ टक्के क्षेत्र हे
लातूर जिल्ह्यातलं असून, हे कार्यालय स्थलांतरित झाल्यास, शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची
शक्यता वर्तवली जात आहे.
****
एक ते १५ जानेवारी
हा कालावधी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ म्हणून साजरा केला जातो. हिंगोली जिल्ह्यात
त्यानुसार विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयानं दिले
आहेत.
*****
No comments:
Post a Comment