Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 January 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५
जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§ भीमा कोरेगावच्या घटनेनंतर राज्यात
निर्माण झालेली तणावाची स्थिती काल निवळली
§
बिगर
इंग्रजी शाळांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण
मंडळ स्थापन करण्याची शालेय
शिक्षण मंत्र्यांची घोषणा तर शाळाबाह्य कामातून
शिक्षकांना मुक्त करण्याची ग्रामीण विकास मंत्र्यांची ग्वाही
§
ठाणे इथले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, विधान
परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे आणि ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं निधन
आणि
§
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून केपटाऊन
इथं पहिला कसोटी क्रिकेट सामना
****
भीमा कोरेगावच्या घटनेनंतर राज्यात निर्माण झालेली तणावाची
स्थिती काल निवळली असून जनजीवन पूर्वपदावर
आलं आहे. गेल्या
तीन दिवस राज्यात दगडफेक, जाळपोळ
यासारख्या घटनांनी तणावपूर्ण स्थिती होती. काल सकाळपासून
राज्य परीवहन महामंडळाची बस सेवा आणि इतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. बाजारपेठा सुरू झाल्या असून सर्व व्यवहारही सुरळीत
झाले आहेत.
दरम्यान, राज्यसभेत काल कामकाज सुरु होताच भिमा कोरेगाव प्रकरणावर चर्चा करण्यात आली. सर्वपक्षीय
नेत्यांनी या घटनेचा निषेध केला. ही घटना निंदनीय असून, राजकीय
पक्षांनी याचं राजकारण करु नये, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. भविष्यात
अशा घटना घडू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी
केलं. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा वारस म्हणून या
घटनेनं तीव्र दु:ख झालं असल्याचं खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी म्हणाले. राज्यातल्या
जनतेनं शांतता राखण्याचं आवाहन करत त्यांनी, समाजकंटकांवर
कारवाई करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी शांतता
आणि ऐक्य राखण्याची गरज व्यक्त केली. सरकारनं राज्यातली तणावाची स्थिती हाताळण्यासाठी
सक्षम पोलिस यंत्रणा उभारली होती. यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली, असं
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले.
****
देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षणाला कालपासून
सुरुवात झाली. हे सर्वेक्षण चार हजारांहून जास्त शहरांमध्ये केलं जाणार असून, या
माध्यमातून शहरी भागात स्वच्छतेच्या पातळीचं मूल्यांकन केलं जाणार आहे. येत्या
दहा मार्चपर्यंत हे सर्वेक्षण सुरु राहणार आहे. युवकांनी
आपापल्या शहरातल्या स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग नोंदवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी मागच्या मन की बात या कार्यक्रमात केलं होतं.
****
रेल्वे स्थानकांवर प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना, रेल्वेगाडी
एका तासापेक्षा जास्त उशिरानं धावत असल्यास, त्याची
माहिती आता एस एम एस द्वारे मिळणार आहे. एक हजार १०४ रेल्वेगाड्यांसाठी ही सुविधा
उपलब्ध असल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं. या
उपक्रमामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी कमी होण्यास मदत मिळाली असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
सांगितलं.
****
देशातली ६५ टक्के लोकसंख्या लवकरच एफ.एम.
ट्रान्समिटर्सच्या कक्षेत येईल, असं केंद्र सरकारनं काल
लोकसभेत सांगितलं. ५२ टक्के लोकसंख्या याआधीच या प्रक्षेपणाच्या क्षेत्रात आल्याची
माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली.
आकाशवाणीचे ५७ मनोरे भाडेतत्वावर खाजगी रेडिओ वाहिन्यांना दिले जातील, असं
माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं. २०१६-१७ या वर्षात
आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मनोरे भाडेतत्वावर देऊन सरकारला ४१ कोटी रुपये महसूल
मिळाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
बिगर इंग्रजी शाळांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे
यांनी जाहीर केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोस इथं सुरु असलेल्या प्राथमिक
शिक्षक समितीच्या अधिवेशनात ते काल बोलत होते. हे मंडळ या शाळांसाठी अभ्यासक्रम निश्चित करील. पहिल्या टप्प्यात
१०० शाळांना तो लागू केला जाईल, असं ते म्हणाले. शैक्षणिक प्रगतीमध्ये राज्य २६ व्या क्रमांकावरून तिसऱ्या
क्रमांकावर आणायचं आणि २५ हजार मुलं पुन्हा मराठी शाळेत आणण्याचं श्रेय शिक्षकांचं
असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, जनगणना, विविध प्रकारचे सर्व्हे अशा शाळाबाह्य
कामातून शिक्षकांची मुक्तता करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी
दिली याच अधिवेशनात बोलतांना दिली. शिक्षकांनी केवळ ज्ञानदानाचं काम करावं आणि विद्यार्थ्यांची
गुणवत्ता विकसित करण्यावर भर देण्याबरोबरच शिक्षकांना पूर्ण वेळ मिळावा म्हणून हा निर्णय
घेतला जाईल, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. ऑनलाईन पध्दतीनं शिक्षकांच्या आंतरजिल्हा
बदल्या करण्याच्या निर्णयाचं राज्यभरातून स्वागत झालं आहे. याबाबत अजूनही काही अडचणी
असतील अशा शिक्षकांनी आपल्या अडचणी मांडाव्यात. मे २०१८ पर्यंत या बदल्या केल्या जातील,
असं त्यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
गेल्या तीन वर्षात राज्यातली अकरा हजार
गावं जल परिपूर्ण झाली असून यावर्षी आणखी पाच हजार गावं दुष्काळमुक्त होतील असा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. जलयुक्त शिवार योजनेचे २०१५-१६
या वर्षासाठीचे विविध स्तरावरील पुरस्कार काल
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत वितरित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झालं असून या गतीनं पुढील दोन
वर्षे कामं केली, तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
ठाणे इथले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, विधान परिषदेचे
माजी उपसभापती वसंत डावखरे यांचं काल रात्री मूत्रपिंडाच्या आजारानं निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यापासून
ते जीवन रक्षक प्रणालीवर होते. डावखरे यांनी ठाणे महापालिकेचे नगरसेवक तसंच महापौर
म्हणून कार्य केलं होतं. आज दुपारी तीन वाजता ठाणे इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
केला आहे.
****
ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं काल
मुंबईत निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या संगीत
संचात बापट यांनी १९७८ पासून १९९४ पर्यंत संतूरची साथसंगत केली होती. २०१४ मध्ये
त्यांना पंचमरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
****
औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या व्यवस्थापकाला
४० हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल अटक
केली. हरीश पाटील या अधिकाऱ्यानं सौर ऊर्जा यंत्राच्या खरेदीवर केंद्र शासनातर्फे
देण्यात येणारं ३० टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी एका व्यावसायिकाला ४० हजार रुपयांची
लाच मागितली होती, व्यावसायिकानं ई-मेलद्वारा तक्रार केल्यानंतर विभागानं ही कारवाई
केली.
****
बीड -पाटोदा मार्गावर शंभरचिरानजिक
झाडावर मोटार आदळून झालेल्या अपघातात बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नारायण
क्षीरसागर यांच्यासह एक जणाचा मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. बीडहून
पाटोद्याकडे जात असतांना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी
सांगितलं.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या बोरगाव इथं
कापसाचा ट्रक अंगावरून गेल्यामुळे एक जण ठार झाला. काल
दुपारी हा अपघात झाला.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून
केपटाऊन इथं पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी
दोन वाजता सामन्याला सुरूवात होईल. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर
कर्णधार विराट कोहली पुन्हा भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. सलग नऊ क्रिकेट मालिका
जिंकणारा भारतीय संघ जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये प्रथम स्थानावर आहे.
****
अमृतसरहून नांदेडला येणारी सचखंड जलद रेल्वेगाडी १६ तास
उशिरानं नांदेडला पोहचत असल्यामुळे, आज नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड जलद रेल्वेगाडी रात्री
साडे अकरा वाजता सुटणार आहे.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी
जिल्हा परिषद शाळेत काल सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘लेक
वाचवा, लेक शिकवा’ हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त सकाळी
गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थिनींनी शाळेत नाटिका सादर करत बेटी
बचाव, बेटी पढावचा संदेश दिला. केवळ मुली असणाऱ्या पालकांचा
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
प्रशासकीय कामात गतीमानता आणण्यासाठी प्रत्येक कार्यालय
कागदविरहीत करण्यात येणार असून याची सुरुवात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापासून होईल
असं जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी सांगितलं आहे. परभणी इथं काल ते वार्ताहरांशी बोलत
होते. कर्जमाफी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या ८३ हजार आठशे सत्त्याऐंशी लाभधारक
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४३३ कोटी रुपये आतापर्यंत जमा करण्यात आल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं.
//********//
No comments:
Post a Comment