Wednesday, 3 January 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.01.2018 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 3 January 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना हा बंद शांततेत पार पडल्याचं सांगितलं. ते म्हणाले….

लोकांचा पाठींबा देऊन आम्ही असं बंदचा दिलेला कॉल हा विथड्रॉ करतो आहे.आणि पुन्हा लोकांचं आम्ही जाहीर आभार मानतो आहे.

आजच्या बंदला मुंबई तसंच नवी मुंबईसह राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला, बाजारपेठा तसंच शैक्षणिक संस्था बहुतांशी बंद होत्या. अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. मुंबईत रेल्वे तसंच मेट्रो वाहतुकही काही काळ रोखून धरण्यात आली होती. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पनवेल इथं रोखून धरण्यात आला होता. मुंबईत बेस्टच्या ४८ बसेसवर झालेल्या दगडफेकीत चार बसचालक जखमी झाले.

भिवंडी इथं काढलेल्या निषेध मोर्चाला हिंसक वळण लागलं. मोर्चात सहभागी तरूणांनी खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. काही एसटी बसेस तसंच खासगी वाहनांचंही दगडफेकीत नुकसान झाल्याचं वृत्त आहे. पालघर रेल्वे स्थानकातही आंदोलकांनी रेल्वेगाड्या अडवून ठेवल्या होत्या.

सोलापूर इथं बहुतांशी बाजार बंद होता. मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सातारा शहरातही आंदोलकांनी एका रिक्षाची तोडफोड केली. कोल्हापूर इथं प्रक्षुब्ध जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना आवाजी गोळीबार करावा लागला, जमावाच्या दगडफेकीत सात पोलिस जखमी झाले. अहमदनगर इथं एसटी बसेससह दूध संघाच्या कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक करून, संकलित केलेलं दूध ओतून दिलं. गडचिरोलीतही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं दगडफेक करणाऱ्या जमावावर पोलिसांना लाठीमार करावा लागला. औंढा नागनाथ इथं आंदोलकांनी रास्ता रोको केला. नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन हिंगोलीचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केलं आहे.

नांदेड शहर आणि जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बससेवा पूर्णपणे बंद होती. या बंद मुळे आज आठवडी बाजारावर विपरीत परिणाम झाला. पोलिसांनी काही समाजकंटकाना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

जालना जिल्ह्यात काल १५ बसेसचं नुकसान झाल्यानं, आज एस टी बस सेवा पूर्ण बंद होती. दलित संघटनांनी एक मोर्चा काढून जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना एक निवेदन सादर केलं.

औरंगाबाद शहरात आजही काही भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. दगडफेक करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतल्याचं, सिडको पोलिसांकडून सांगण्यात आलं. मराठवाड्यात इतरत्रही बंदच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारनं शक्य ते सगळे उपाय केले असल्याचं, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलं आहे. आज संसद परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. आता परिस्थिती निवळत असल्याचं सांगून, लोकांनी शांतता पाळावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

मुस्लीम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक संदर्भातलं विधेयक आज दुपारनंतरच्या सत्रात राज्यसभेत मांडण्यात आलं. काँग्रेस पक्षानं हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची मागणी केली. यावरून सुरू झालेला गदारोळ वाढत गेल्यानं, कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

धान्य आणि साखर भरण्यासाठी गोणपाटाचा वापर अनिवार्य करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीनं आज मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे, नव्वद टक्के धान्यं आणि वीस टक्के साखर अनिवार्यपणे ज्यूटच्या पिशव्यांमध्येच भरावी लागेल. या समितीनं जल मार्ग विकास प्रकल्पालाही आज मंजुरी दिली. पर्यावरणानुकूल असणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे सव्वा कोटी रोजगार उपलब्ध होतील.

****

भारतीय गुप्तहेर संस्था रॉ चे माजी प्रमुख राजिंदर खन्ना, यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती समितीनं ही नेमणूक केली आहे.

****

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री मधुकरराव किंमतकर यांचं आज सकाळी नागपूर इथे निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते.

//********//

No comments: