Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 4 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्यसभेत
आज देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, गुंतवणुकीचं वातावरण, रोजगार निर्मिती आणि बेरोजगारी
यावर चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी यावर चर्चेला सुरुवात करत अर्थव्यवस्थेच्या
सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम
झाल्याचं ते म्हणाले. व्यापार निर्देशांकात आणि जागतिक स्पर्धेत गेल्या तीन वर्षात
मोठी सुधारणा झाल्याचं भारतीय जनता पक्षाचे भूपेंद्र यादव यांनी सांगितलं. आर्थिक मंदी
हे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होण्याचं कारण असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी
सांगितलं.
****
देशातली
६५ टक्के लोकसंख्या लवकरच एफ.एम.ट्रान्समिटर्सच्या कक्षेत येईल, असं केंद्र सरकारनं आज लोकसभेत सांगितलं. ५२ टक्के लोकसंख्या याआधीच या प्रक्षेपणाच्या
क्षेत्रात आल्याची माहिती, केंद्रीय माहिती
आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली. आकाशवाणीचे ५७ मनोरे भाडेतत्वावर खाजगी रेडिओ वाहिन्यांना दिले जातील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती
इराणी यांनी सांगितलं. २०१६-१७ या वर्षात आकाशवाणी
आणि दूरदर्शनचे मनोरे भाडेतत्वावर देऊन सरकारला ४१ कोटी रुपये महसूल मिळाल्याची माहिती
त्यांनी दिली.
****
जम्मू काश्मीरमधल्या
अरनिया सेक्टर इथं आज सीमा सुरक्षा दलानं
पाकिस्तानी सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी एक घुसखोर ठार झाला, तर पाकिस्तानच्या दोन चौक्या उध्वस्त
झाल्या.
****
भीमा कोरेगाव हिंसाचारासंदर्भातला
तथ्याधारित अहवाल राज्य सरकारनं केंद्रीय गृह मंत्रालयाला सुपूर्द केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं
आज ही माहिती दिली. तणावाच्या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान राज्य आणि केंद्र सरकार सातत्यानं संपर्कात होते, असं त्यांनी सांगितलं. हिंसाचार
नियंत्रणात आणणं आणि आंदोलन योग्यरित्या हाताळत, परिस्थिती सामान्य करण्याकरता आवश्यक
ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही, केंद्र सरकारनं राज्याला दिली आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
****
भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं काल
पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान आंदोलन करणाऱ्या ३०० पेक्षा जास्त
कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, १६ प्राथमिक माहिती अहवाल दाखल
केले आहेत. या बंददरम्यान राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोनशेहून अधिक बसेसचं नुकसान
करण्यात आल्याचं महामंडळाच्या सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर
मुंबईत आज गुजरातमधले आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी नेता उमर खालिद यांचा सहभाग
असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली.
मात्र हा कार्यक्रम होण्यावर छात्रभारतीचे कार्यकर्ते ठाम असल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना
ताब्यात घेतलं.
****
बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटरनॅशनल
बोर्ड स्थापन करणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोस इथं सुरु असलेल्या प्राथमिक शिक्षक समितीच्या सोळाव्या
राज्य त्रैवार्षिक अधिवेशनात ते आज बोलत होते. शैक्षणिक प्रगतीमध्ये राज्य २६व्या क्रमांकावरून
तिसऱ्या क्रमांकावर आणायचं आणि २५ हजार मुलं पुन्हा मराठी शाळेत आणण्याचं श्रेय शिक्षकांचं
असल्याचं ते म्हणाले. यापुढे शिक्षकांना बाह्यकामं करावी लागू नयेत, यासाठी प्रयत्नशील
असल्याचं त्यांनी सांगितलं. या अधिवेशनाला राज्यभरातून एक लाख शिक्षक उपस्थित आहेत.
****
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर-जीएसटी
विभागातले बारा हजार
अधिकारी-कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या सामूहिक रजेवर गेले आहेत. राजपत्रित अधिकारी
आणि कर्मचारी संघटनेच्या वतीनं समन्वय समितीनं हे आंदोलन पुकारलं असून, गट-ड सह इतर
सर्व संवर्गांतील रिक्त पदे भरणे, विभागातल्या वेतनत्रुटीचे
प्रश्न मिटवून केंद्राच्या धर्तीवर समान काम, समान पदे आणि समान वेतन ही त्रिसूत्री
राज्यातही राबवावी, तसंच विभागीय संवर्ग वाटप आणि संरचना अधिनियमातून राज्यकर विभागास
कायमस्वरुपी सूट द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
****
ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास
बापट यांचं आज मुंबई इथं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. संगीतकार आर.डी.बर्मन यांच्या
संगीताला बापट यांनी १९७८ पासून १९९४ पर्यंत संतूरची साथसंगत केली होती. २०१४ मध्ये त्यांना
‘पंचमरत्न’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या बोरगाव
इथं कापसाचा
ट्रक अंगावरून गेल्यामुळे एक जण ठार झाला. आज दुपारी हा अपघात झाला.
****
No comments:
Post a Comment