Friday, 5 January 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 05.01.2018 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 5 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ जानेवारी २०१ दुपारी १.०० वा.

****

लोकसभेचं कामकाज आज प्रश्नकाळानंतर दुपारच्या सत्रापूर्वी अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं. अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या अधिवेशन काळात १६ सरकारी विधेयक पुनर्स्थापित करून, त्यातली १२ विधेयकं संमत झाल्याची माहिती दिली. सदनाच्या एकूण १३ बैठका झाल्या, त्यात सुमारे ६१ तास कामकाज झालं. मात्र विविध कारणांमुळे आलेल्या व्यत्ययानं सदनाचा १४ तास ५१ मिनिटं एवढा वेळ वाया गेला. सदस्यांनी कामकाजाच्या वेळपेक्षा अधिक काळ सदन चालवून, हा वेळ भरून काढला. या अधिवेशन काळात सदस्यांनी २८० तारांकित प्रश्न विचारले, तसंच २०१७च्या पुरवणी मागण्यांना सदनानं मंजुरी दिल्याची माहिती महाजन यांनी दिली.

राज्यसभेत डॉ कर्णसिंह, जनार्दन द्विवेदी, परवेझ हाश्मी या तीन सदस्यांचा कार्यकाळ या महिन्यात पूर्ण होत असल्यानं त्यांना निरोप देण्यात आला. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांना निरोप दिला.

बहुचर्चित तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा न देऊन काँग्रेस पक्ष मुस्लिम महिलांसोबत अन्याय करत असल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसनं लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला, मात्र राज्यसभेत पारित करण्यास सहकार्य करत नसल्याचं ते म्हणाले.  

****

नौदल आणि लष्करासाठी दोन हजार ४०० कोटी रुपयांच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयानं मंजूरी दिली आहे. त्यात पी.एट.आय. शिकाऊ विमानं आणि लो इटेंसिटी कॉन्फिल्क्ट इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम यांचा समावेश आहे. दहशतवादी संघटनांकडून वापरल्या जाणाऱ्या संपर्क यंत्रणांवर प्रभावीपणे मात करण्यासाठी लष्कराला याचा उपयोग होणार आहे.

****

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं भारतातल्या पहिल्या ऑन्कोलॉजी डिजीटल ऑनलाईन ट्युटोरीअल मालिकेचा काल नवी दिल्ली इथं शुभारंभ केला. देशभरातल्या डॉक्टरांना विविध प्रकारच्या कर्करोगांचं सुरुवातीच्या टप्प्यावरचं निदान, बचाव, रोग प्रतिबंध तसंच उपचारांबाबत प्रशिक्षित करण्याच्या उद्देशानं ही मालिका सुरु करण्यात आली आहे. टाटा मेमोरिअल सेंटर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एकत्रित प्रयत्नांतून या शिकवणी मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या मुळे डॉक्टरांना त्यांचं ज्ञान आणि कौशल्य अद्ययावत करण्यामदत होईल, असं मत, आरोग्य सचिव प्रिती सुदान यांनी या मालिकेचा शुभारंभ केल्यानंतर व्यक्त केलं.

****

अनाथालयांचं कामकाज, तिथं लहान मुलांना मिळणारी वागणूक आणि दत्तक देण्याची पध्दत याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांकडे विचारणा केली आहे. याबाबत कोलकाता उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरुध्द राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं काल सुनावणी घेतली. दत्तक देण्याच्या नावाखाली मुलांची विक्री होणं ही अत्यंत भयंकर बाब आहे, असं सांगत न्यायालयानं या याचिकेची व्याप्ती वाढवली, आणि सर्वच राज्यांना याबाबत दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे.

****

सोलापूर इथं अवैध वाळूची वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकाऱ्यांच्या अंगावर वाळूचा टिप्पर घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल रात्री ही घटना घडली. टिप्पर चालक आणि त्याचे साथीदार फरार आहेत.

****

जिल्ह्यांच्या परिवर्तनाबाबत नवी दिल्लीत आयोजित परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मार्गदर्शन करणार आहेत. नीती आयोगानं या परिषदेचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमादरम्यान एकूण शंभर जिल्ह्यांच्या परिवर्तनासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांबरोबर पंतप्रधान संवाद साधणार आहेत. २०२२ पर्यंत नवा भारत घडवण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जात आहे. विकासाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करावी यासाठी जिल्ह्यांच्या परिवर्तनाची रुपरेषा यात आखली आहे.

****

पुण्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत रोहन बोपन्ना आणि जीवन नेदुंहोजियान या भारतीय जोडीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. काल झालेल्या सामन्यात गिले सिम्सन आणि पेरे ह्युजे हर्बर्ट या फ्रेंच जोडीनं त्यांचा तीन-सहा, पाच-सात असा पराभव केला. युकी भांब्री आणि दिविज शरण या दुसऱ्या भारतीय जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी रॉबर्ट लिंडेस्टे आणि फ्रँको स्कगोर या स्वीडीश-क्रोएशियन जोडीवर सात-पाच, दोन-सहा, दहा-सहा अशी मात केली.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून केपटाऊन इथं पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सामना सुरू होईल. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकांमध्ये विश्रांती घेतल्यानंतर कर्णधार विराट कोहली पुन्हा भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. सलग नऊ कसोटी मालिका जिंकणारा भारतीय संघ जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये प्रथम स्थानावर आहे.

****

No comments: