Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 5 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. या अधिवेशनात
राज्यसभेनं ३१ बैठकांमध्ये सुमारे ३४ तास काम केलं. या दरम्यान, ९ विधेयकं मंजूर करण्यात
आल्याची माहिती सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिली.
दरम्यान, संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २९ जानेवारीपासून
सुरु होणार आहे. संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी आज दिल्लीत संसदीय व्यवहार मंत्रिमंडळ
समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला
सादर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या अधिवेशनाचा पहिला टप्पा नऊ फेब्रुवारीला
संपणार आहे. तर दुसरा टप्पा पाच मार्च ते सहा एप्रिल पर्यंत चालणार आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन यशस्वी झाल्याचं अनंत कुमार यांनी
सांगितलं. या अधिवेशनात एकूण २२ विधेयकं पारित झाले, तिहेरी तलाक संदर्भातलं विधेयक
दोन्ही सदनात संमत होण्याची अपेक्षा होती, असं ते म्हणाले.
****
सेवानिवृत्त लोकांद्वारे बँकामंध्ये जमा केलेल्या रकमेवरील
करात सूट देण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचं अर्थ राज्यमंत्री
शिवप्रताप शुक्ला यांनी आज लोकसभेत सांगितलं. प्राप्तीकर अधिनियमाच्या तरतुदींनुसार
एकूण उत्पन्नावर कर लागू होतो, असं ते म्हणाले.
****
दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचं मत विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आज चौथ्या महाॲग्रो २०१८
प्रदर्शनाचं उद्घाटन बागडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दुधाच्या उत्पादकतेसोबत
गुणवत्ता वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीला आवश्यक
पाणयाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटल्याचं ते म्हणाले. यावेळी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग
करणाऱ्या मराठवाडा तसंच विदर्भातल्या १६ शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रदर्शनात
विविध विषयांवर कृषी तज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
****
शेतमाल तारण कर्ज योजनेत आतापर्यंत १०३ बाजार समित्या सहभागी झाल्या असल्याचं
सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं आहे. ते
आज मुंबईत बोलत होते. या योजनेंतर्गत चालू वर्षी ८६ हजार १६६ क्विंटल शेतमाल बाजार
समित्यांनी तारण ठेवला असून, शेतकऱ्यांना मागील फक्त चार महिन्यात सुमारे १६ कोटी रुपये
तारण कर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी कमी
भावाच्या काळात या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या दोन लाख ७८
हजार हेक्टर कपाशी क्षेत्रापैकी एक लाख ५८ हजार ७४६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले
आहेत. उर्वरीत क्षेत्रावरच्या कपाशीचे पंचनामे सुरु असून, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर
शासनाला सविस्तर अहवाल पाठवला जाईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी
दिली आहे.
****
विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या पार्थिव
देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. डावखरे यांचं काल रात्री मूत्रपिंडाच्या आजारानं निधन
झालं. ते ६८ वर्षांचे होते. डावखरे
यांच्या निधनानं राजकारणापलिकडे ऋणानुबंध जपणारा एक उमदा नेता आपण गमावला, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
जालना इथं आज भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल
मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. अंबड चौफुलीहून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत
काढण्यात आलेल्या या मोर्चात तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. वडू बुद्रूक, कोरेगाव
घटनेची चौकशी करून दोषींना अटक करावी, कोरेगाव ग्रामस्थांवर दाखल अॅट्रासिटीचे गुन्हे
मागे घ्यावे, वाहनांच्या तोडफोडीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्यांचे
निवेदन मोर्चेकरण्यांनी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना दिलं. मोर्चात सहभागी काही
तरुणांनी वाहने अडवून धरल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक काही वेळ ठप्प
झाली होती.
****
पाचवा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या
१८ ते २१ जानेवारी दरम्यान होणार आहे. १८ तारखेला सायंकाळी सहा वाजता प्रोझोन मॉलमध्ये
आयनॉक्स चित्रपटगृहात अतनु मुखर्जी दिग्दर्शित ‘रुख’ या हिंदी सिनेमाच्या सादरीकरणानं
या महोत्सवाचं उद्घाटनं होईल. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर या महोत्सवात
जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात
नऊ भारतीय चित्रपटांसह २७ विदेशी चित्रपटांचं प्रदर्शन, चित्रपट तज्ज्ञांचा मास्टर
क्लास, विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन इथं भारत आणि
दक्षिण आफ्रिका संघातल्या क्रिकेट कसोटी मालिकेला आज सुरुवात झाली. आज पहिल्या सामन्यात
दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र त्यांचे आघाडीचे फलंदाज
झटपट बाद झाले. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या चार बाद १३४ धावा
झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment