Monday, 2 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 April 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

****



Ø  ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भातल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका आज केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार

Ø  दक्षिण काश्मीरमध्ये  सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत १३ दहशतवादी ठार; तीन जवानांना वीरमरण

Ø  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याला १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

आणि

Ø  शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, शेतमालावरची निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवण्याची शेतकरी सुकाणू समितीची मागणी

*****



 अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून आज केंद्र सरकार एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका ट्विटरसंदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. या कायद्याखाली दाखल झालेल्या प्रकरणांमधल्या आरोपींना चौकशी झाल्याशिवाय अटक करू नये, असे निर्देश न्यायालयानं नुकतेच दिले असून, अशा प्रकरणातल्या आरोपींसाठी अटकपूर्व जामिनाची तरतूदही उपलब्ध करून दिली आहे. यामुळे या कायद्यातल्या तरतुदी निष्प्रभ होतील आणि गुन्हेगारांना कायद्याची भिती राहणार नाही, परिणामी निर्णयाचा पुनर्विचार होणं आवश्यक आहे, असं सरकारचं मत आहे.

****



 इसिस या दहशतवादी संघटनेकडून इराकमध्ये मारल्या गेलेल्या एकोणचाळीस भारतीयांपैकी अडोतीस जणांचे मृतदेह आज भारतात आणण्यात येत आहेत. हे मृतदेह इराकच्या आरोग्य मंत्रालयाकडून भारतीय दूतावासाकडे सोपवले गेल्याची, तसंच ते एका विशेष विमानाद्वारे भारतात आणले जाणार असल्याची माहिती भारताचे इराकमधले राजदूत डॉक्टर प्रदीपसिंह राजपुरोहित यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली. परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह या विमानात असतील आणि प्रथम अमृतसर, मग कोलकता आणि नंतर पाटणा इथे हे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येतील. जून २०१४ मध्ये  चाळीस भारतीय लोकांचं इराकमधल्या मोसूल इथून दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं, त्यातल्या एकानं स्वत:ची सुटका करून घेतली, तर बाकीच्या एकोणचाळीस जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली.

****



 दक्षिण काश्मीरमध्ये काल सुरक्षा दलानं  अतिरेक्यांच्या तीन अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यात १३ दहशतवादी ठार झाले. या चकमकीत लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आलं तर चार स्थानिक नागरिकांचा मृत्यु झाला. घातपाती कारवाया घडवण्यासाठी अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर गुप्त बैठका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर द्रग्गड, काचदुरू आणि अनंतनाग इथं असलेल्या अतिरेक्यांच्या या अड्ड्यांवर लष्करानं हल्ला चढवला. यात १३ दहशतवादी मारले गेले. परवा रात्रीपासून सुरू झालेली ही चकमक काल दुपारपर्यंत सुरू होती. या मोहिमेदरम्यान लेफ्टनंट उमर फयाज यांच्या हत्येचा सूत्रधारांनाही कंठस्नान घालण्यात आल्याचं सुरक्षा दलानं सांगितलं.

****



 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजेनत २४ जुलै ते २२ सप्टेंबर २०१७ या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात आले होते, मात्र या कालावधीत ज्या शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत मुदतीत अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, ती आता येत्या १४ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी अर्ज सादर करण्यास ३० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

****



 संपूर्ण देशात लवकरच हवाई सेवेद्वारे माल वाहतूक करण्याचं धोरण विचाराधीन असल्याचं केंद्रीय नागरी वाहतूक आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं वार्ताहरांशी बोलत होते. रात्रीच्या वेळी देशांतर्गत विमान सेवा बंद असते, त्या वेळेचा उपयोग माल वाहतुकीसाठी करण्यात येणार असून, छोट्या अंतरासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोकणच्या आंब्याची अशाच प्रकारे वाहतूक करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं काल नवा उच्चांक नोंदवला. पेट्रोलियम कंपन्यांनी काल पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १८ पैशांनी वाढ केल्यामुळे औरंगाबादेत पेट्रोलचा भाव ८२  रूपये ६६ पैसे तर डिझेलचे भाव  ६९ रूपये ८७ पैसे इतका झाला. पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त असल्यामुळे पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. यानुसार गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात ९ रुपये तर डिझेलच्या दरात ७ रुपयांनी वाढ झाली आहे.

****



 वाहन कंपन्या आता लवकरच नंबर प्लेट लावलेल्या चारचाकी गाड्या बाजारात आणणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. वाहनांच्या किमतींमध्येच नंम्बर प्लेटच्या किंमतीचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या या नम्बर प्लेटस वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या निर्धारित  संस्थांकडून खरेदी करण्यात येतात, असं नमूद करून त्यांनी कंपन्याकडून  नंम्बर प्लेटस आणल्यामुळं त्या सर्व राज्यात एकसारख्या राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, शेतमालावरची निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी, अशी मागणी शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक रघुनाथ पाटील यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातून २३ मार्चपासून सुरू झालेल्या हुतात्मा अभिवादन जागर सभेचं काल नाशिक जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं, त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. भांडवलदार आणि उद्योजकांचं हित साधण्यासाठी सरकार शेतमालाच्या निर्यातीवर निर्बंध लादत असल्यामुळे शेतमालाचे भाव घसरत असल्यानं शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

****



 जालना जिल्ह्यातल्या निम्न दुधना प्रकल्पातून परभणी आणि पूर्णा शहरासाठी काल पाणी सोडण्यात आलं. प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून, त्यातून एक हजार दोनशे अठरा घनफूट प्रतिसेकंद पाणी दुधना नदीपात्रात सोडलं जात आहे. निम्न दुधना प्रकल्पात ४८ टक्के जिवंत पाणीसाठा असून, पाण्याचा विसर्ग तीन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

****



 नांदेड - बिदर या एकशे सत्तावन्न किलोमीटर्स लांबीच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाचा समावेश केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रकल्पात करण्याची मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. या मार्गासाठीचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून, हा मार्ग पूर्ण झाल्यावर नांदेडचा उत्तर आणि दक्षिण भारताशी थेट संपर्क होईल, तसंच दिल्ली-बंगलोर अंतर दोनशे चाळीस किलोमीटर्सनी कमी होईल, असं खतगावकर यांनी म्हटलं आहे. नांदेड विभाग दक्षिण मध्य रेल्वेतून वगळून मध्य रेल्वेला जोडण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

****



 बीडच्या पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीनं, विविध क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्कार  मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांना काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

****



 लोकसहभाग वाढवून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केल्यास, पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही, असा विश्वास परभणीचे सहायक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात सोस इथं शोष खड्ड्याच्या कामाला काल कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. पाण्याचा गावात तसंच शेतात नियोजनपूर्वक वापर करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शिवारफेरी काढून गाव शिवारात पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातून सुरू असलेल्या कामाची यावेळी पाहणी करण्यात आली.

****



 औरंगाबाद शहरात संकेत कुलकर्णी या युवकाची कारखाली चिरडून हत्या करणाऱ्या  आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी काल झालेल्या निषेध सभेत करण्यात आली. संकेतची ज्या ठिकाणी हत्या झाली तिथेच ही निषेध सभा घेण्यात आली. या सभेला महिला आणि युवकांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

****



 ईस्टर संडे काल साजरा झाला. ख्रिस्ती धर्माचे प्रेषित येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चमध्ये सामुहिक प्रार्थना पठणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत.

****



 महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये आता स्त्री संसाधन केंद्रं उभारली जाणार आहेत. राज्य महिला आयोगानं  राज्यातल्या सगळ्या पालिकांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. महिलांच्या अडचणी सोडवून, त्यांच्या कौशल्याला वाव देणाऱ्या या यंत्रणेला सक्षमा कक्ष असं संबोधण्यात येणार आहे. यासाठी नव्या वर्षात महानगरपालिका आणि नगरपालिकांनी आर्थिक तरतूद करावी, असे निर्देश आयोगानं दिले आहेत.

*****

***


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...