Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 03 April 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०३ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात
केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल; दलित संघटनांच्या भारत
बंद दरम्यानच्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू
Ø अनाथ बालकांना
शिक्षण आणि नोकरीसाठी एक टक्का आरक्षण लागू करणारा अध्यादेश जारी
Ø येत्या पाच वर्षात
देशात नवीन शैक्षणिक रचना करावी लागेलं - ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांचं
मत
आणि
Ø ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी
गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचं प्रदीर्घ आजारानं पुण्यामध्ये निधन
*****
अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी
कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयावर केंद्र सरकारनं
काल दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयानं स्वीकारली आहे. न्यायालयानं दिलेल्या
निर्णयाशी सरकार सहमत नसल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे. या कायद्याखाली दाखल झालेल्या
प्रकरणांमधल्या आरोपींना चौकशीशिवाय अटक करू नये, असे निर्देश न्यायालयानं दिले होते,
अशा प्रकरणातल्या आरोपींसाठी अटकपूर्व जामीन देण्याची मनाई देखील न्यायालयानं हटवली
होती, यामुळे या कायद्यातल्या तरतुदी निष्प्रभ होतील आणि गुन्हेगारांना कायद्याची भीती
राहणार नाही, परिणामी निर्णयाचा पुनर्विचार होणं आवश्यक आहे, असं सरकारचं मत आहे.
दरम्यान, ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात न्यायालयाच्या
या निर्णयाविरोधात अनेक दलित संघटनांच्या वतीनं काल भारत बंद पुकारण्यात आला होता.
या बंदमध्ये काल देशभरात नऊ जण मृत्यूमुखी पडले. अनेक भागात वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत
झाली होती. ज्या हिंसक घटना घडल्या, त्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार जबाबदार
आहे, असं मत भारीप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.
केंद्र सरकार दलितांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण करत आहे, असं आंबेडकर म्हणाले.
राज्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. औरंगाबादसह
मराठवाड्यात ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं तसंच बंद पाळण्यात आला. जालना
इथं अंबडकडे जाणाऱ्या एका बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बसच्या समोरच्या काचा फुटून
नुकसान झालं. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर
तणाव निवळला.
धुळे शहरात साक्री मार्गावर रस्ता रोको करण्यात आला.
तसंच जिल्ह्यातल्या शिरपूर, निजामपूर इथं बंद पाळण्यात आला. धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निदर्शनंही करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात या बंदला
हिंसक वळण लागलं. शहादा शहरात बंद दरम्यान चार बसेसची तोडफोड करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे
****
अनाथ बालकांना शिक्षण आणि नोकरीसाठी एक टक्का आरक्षण
लागू करणारा अध्यादेश राज्य शासनानं काल जारी केला. महिला बाल विकास विभागाचं, अनाथ
प्रमाणपत्र असलेल्या बालकांना काल दोन एप्रिल २०१८ पासून खुल्या प्रवर्गातून एक टक्का
समांतर आरक्षण लागू असेल, असं या अध्यादेशात म्हटलं आहे. नोकरभरतीत अ ते ड पर्यंतच्या
सर्व पदांसाठी, तसंच शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, वसतीगृह प्रवेश, आणि व्यावसायिक शिक्षणांतर्गत
शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी हे आरक्षण लागू असेल.
****
प्लॅस्टिक आणि थर्मोकोल बंदीबद्दल जागरुकता निर्माण
करण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनानं
केली आहे. यासंबधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. २३ मार्च रोजी शासनानं प्लॅस्टिक
आणि थर्मोकोलवर बंदी घातली आहे. दरम्यान, ही बंदी उठवण्यासंबधी राज्य शासन पुनर्विचार करणार नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या बंदीमुळे प्लॅस्टिक
उत्पादकांच्या समस्यांबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती विचार करेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यातलं
भाजपचं निष्क्रीय सरकार जाऊन, बळीचं राज्य येवो असं साकडं आपण अंबाबाईला घातलं आहे, असं
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भापासून
सुरु झालेल्या या आंदोलनाच्या चौथ्या टप्प्याला काल
कोल्हापूरातून सुरुवात झाली, त्यावेळी
पवार बोलत होते. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर
चर्चा न होता, बाकीचे मुद्दे मांडले गेले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
****
शिक्षण क्षेत्रात भविष्यात होणारे अपेक्षित बदल लक्षात
घेता येत्या पाच वर्षात देशात नवीन शैक्षणिक रचना करावी लागेलं असं मत जेष्ठ वैज्ञानिक
डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं आहे. जालना इथं काल महाराजा अग्रसेन फाउंडेशनच्यावतीनं
उच्च शिक्षणावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
२०३५पर्यंत विविध १२ क्षेत्रामंध्ये करावयाच्या बदलाबाबत केंद्र सरकारचा मार्गदर्शक
आराखडा तयार असून यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या कचरा व्यवस्थापन प्रश्नी महापालिकेनं
गती घेतली असून येत्या काही महिन्यात कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचं
आश्वासन, महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय
केंद्र आणि महात्मा गांधी मिशन यांच्या वतीनं काल औरंगाबाद इथं आयोजित कचरा कोंडी जागर
संवादात ते बोलत होते. मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्रात कार्यरत पद्मश्री डॉ.शरद
काळे यांच्यासह राज्यातल्या विविध स्वयंसेवी संस्था आणि मान्यवर या खुल्या संवादात
सहभागी झाले. यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर काळे यांनी, प्रत्येकानं
घरातला कचरा, घराबाहेर जाऊ न दिल्यास कचरा कोंडी सुटेल, असं मत नमूद केलं. या वेळी
उपस्थितांना कचरा न करण्याची, अन्न वाया न घालण्याची, तसंच प्रत्येकानं तीन झाडं लावण्याची
शपथ देण्यात आली.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
ज्येष्ठ
समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य उर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य यांचं काल
प्रदीर्घ आजारानं पुण्यामध्ये निधन
झालं. ते ८९ वर्षांचे
होते. शालेय जीवनातच १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन
आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या आंदोलनादरम्यान, अनेकवेळा त्यांनी तुरूंगवासही भोगला. समाजवादी
विचारधारेचे पाईक असलेले भाई वैद्य यांनी जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस,
समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष
अशी पदे भूषविली होती. पुण्याचे महापौर आणि राज्याचे गृह राज्यमंत्री
म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. भाई वैद्य यांनी सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करणारं विपुल लेखन
केलं आहे. आज सायंकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत
अंत्यसंस्कार करण्यात येतील. मुख्यमंत्र्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल
शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
****
औरंगाबाद शहरात एकच सदनिका दोघांना विकून फसवणूक
केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक प्रफुल्ल मांडे याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि ५०
हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावली आहे. सदनिकेचं
खरेदीखत केलेलं असतांना देखील आणि तक्रारदाराचा ताबा त्या सदनिकेवर असतांना देखील व्यावसायिकानं
ती सदनिका दुसऱ्या ग्राहकाला विकली होती.
****
तिहेरी तलाक विरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी
काल हिंगोली शहरात मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांच्या शिष्टमंडळानं
आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं.
****
उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते काल संदल मिरवणुकीनं हजरत शमसुद्दीन गाझी उरूसाला सुरूवात झाली. या उरुसामध्ये
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात काल सर्वात जास्त ४२ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस
तापमान नांदेड इथं नोंदवलं गेलं. परभणी ४०
पूर्णांक नऊ, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान,
येत्या दोन चार दिवसात मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं
वर्तवली आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या माणिक हॉस्पिटलला काल अचानक आग
लागली. सुदैवानं या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आग लागल्यानंतर रूग्णालयात उपचार
घेणाऱ्या रूग्णांना अन्य इस्पितळात हलवण्यात आलं. आगीच्या या घटनेची चौकशी करण्याचे
आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या ब्रह्मवाकडी
गावच्या महिला रपंचांचे पती नानासाहेब वनवे याला शौचालयाच्या बांधकामासाठी अनुदान मिळवून
देण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच स्वीकारताना काल सेलू इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
पथकानं रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी सेलू पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील बंद असलेले
कांद्याचे लिलाव कालपासून पुन्हा सुरू झाले. आर्थिक वर्षाअखेर व्यापारी वर्गाला ताळेबंद
करायचा असल्यानं मार्च महिन्याच्या शेवटच्या सात दिवसांपासून हे लिलाव बंद होते.
दरम्यान, काल
बाजार सुरू झाल्यानंतर सर्वच बाजार समित्यांमध्ये सरासरी सातशे ते साडे सातशे
रुपये प्रति क्विंटल असा कांद्याला भाव मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment