Tuesday, 3 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र

३ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा - अॅट्रॉसिटीबाबत केंद्र सरकारनं दाखल केलेल्या फेरविचार याचिकेची सुनावणी लवकर घ्यावी अशी मागणी महाधिवक्ता के.के वेणूगोपाल आज सर्वोच्च न्यायालयाकडे करणार आहेत. केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. कालच ही याचिका न्यायालयानं दाखल करुन घेतली आहे. दलितांवरचा अत्याचार हा दखलपात्र आणि अजामिनपात्र गुन्हा ठरवणारी या कायद्यातली तरतूद कायम ठेवावी, अशी मागणी या फेरविचार याचिकेत केली आहे.

****



 लोकसभेत आज अनियमीत ठेव योजना प्रतिबंध विधेयक २०१८ सादर होण्याची अपेक्षा आहे. अशा ठेव योजनांवर बंदी घालण्यासाठी आणि ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी व्यापक यंत्रणा उपलब्ध करुन देणारं हे विधेयक आहे. मानवी तस्करी प्रतिबंध, संरक्षण आणि पुनर्वसन विधेयक, फरार आर्थिक गुन्हेगार विधेयकही आज लोकसभेत सादर होणं अपेक्षित आहे. तर राज्यसभेत मोटार वाहन संशोधन विधेयक, भ्रष्टाचार निर्मुलन सुधारणा विधेयक यासारखी महत्वाची विधेयकं संमत होण्याची शक्यता आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असून, विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात अद्याप सुरळीत होऊ शकलेलं नाही.

****



 राज्यात एक फेब्रुवारीपासून आधारभूत दरानं तूर खरेदीला सुरुवात झाल्यानंतर आजपर्यंत १६७ खरेदी केंद्रांवर १,१६,२४५ शेतकऱ्यांची  १३,९९,१५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तूर खरेदीचा काळ तीन महिने असून आतापर्यंत ४,०३,३७६ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. सध्या कार्यरत खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रं सुरू करण्यात येणार असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.

****



 लातूर इथल्या विलास सहकारी साखर कारखानाच्या अठराव्या गळीत हंगामात विक्रमी गाळप झालं आहे. कारखाना उभारणी नंतर चाचणी हंगामापासून गेल्या सतरा वर्षातलं सर्वांधिक पाच लाख ७५ हजार मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं असून, ४२ लाख लिटर इथेनॉलचं विक्रमी उत्पादन झालं असल्याची माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...