Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 3 April 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा.
****
अनुसूचित जाती-जमाती
अत्याचार प्रतिबंधक कायदा - अॅट्रॉसिटीबाबत केंद्र सरकारनं दाखल केलेल्या
पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज दुपारी दोन वाजता सुनावणी घेणार आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात विविध दलित संघटनांनी काल पुकारलेल्या भारत बंद
मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले,
त्यामुळे या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी महान्यायवादी के के वेणुगोपाल यांनी केली.
****
संसदेचं
कामकाज आज १९व्या दिवशीही बाधित झालं. काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल,
तेलगु देसम पक्ष, आणि अण्णाद्रमुक पक्षाच्या खासदारांनी आपल्या विविध मुद्यांवरुन घोषणाबाजी
केल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
त्यापूर्वी राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांना शपथ
देण्यात आली. यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातले रविशंकर प्रसाद, मनसुख मांडविया, जे
पी नड्डा, थावरचंद गहलोत, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, यांचा समावेश आहे. काँग्रेसचे
अभिषेक मनु सिंघवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वंदना चव्हाण, तृणमूल काँग्रेसचे
अबीर रंजन, शिवसेनेचे अनिल देसाई, काँग्रेसचे केशव उर्फ कुमार केतकर, आणि महाराष्ट्राचे
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह ४१ नव्या सदस्यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची
शपथ घेतली. या नंतर गदारोळ सुरू झाल्यानं, सभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
केलं.
लोकसभेचं कामकाज सुरु होताच अखिल भारतीय अण्णा द्रमुक
मुनेत्र कळघम - एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी कावेरी पाणी वाटपप्रश्नी व्यवस्थापन
मंडळ स्थापन करण्याची मागणी लावून धरत, अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन फलक झळकावले.
काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, तेलगु देसम पक्ष या पक्षांनीही आपल्या
विविध मुद्यांवरुन घोषणाबाजीला सुरुवात केली. या गदारोळामुळे अध्यक्षा सुमित्रा महाजन
यांनी सदनाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केलं होतं.
कामकाज पुन्हा सुरु होताच, गृहमंत्री राजनाथसिंह
यांनी गदारोळातच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात निवेदन करताना,
सरकार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. सरकारनं
हा कायदा अधिक सशक्त केल्याचं सांगतानाच, सिंह यांनी, देशात शांतता राखण्याचं आवाहन
केलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं दहावीच्या
गणित विषयाची पुनर्परीक्षा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गणित विषयाची प्रश्नपत्रिका
फुटल्यानं, ही परीक्षा परत घेणार असल्याचं, मंडळानं पूर्वी म्हटलं होतं, मात्र गेल्या
आठवड्यात मंडळानं, गरज भासल्यास फक्त दिल्ली तसंच हरियाणातच पुनर्परीक्षा घेणार असल्याचं
सांगितलं होतं. मात्र आज मंडळानं, दिल्ली तसंच हरियाणातही दहावीच्या गणित विषयाची पुनर्परीक्षा
होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
२०१७-१८ या संपलेल्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करसंकलन सुमारे १७ टक्क्यांनी
वाढलं आहे. या आर्थिक वर्षात एकूण नऊ लाख
९५ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती वित्त सचिव हसमूख अढिया
यांनी दिली आहे.
****
सर्व वस्तू आणि सेवांना एकसमान कर आकारणी शक्य
असली तरी राजकीय स्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं स्पष्ट मत,
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी व्यक्त केलं
आहे. ते बंगळूरु इथं एका कार्यक्रमात बोलत होते. वस्तू आणि सेवा कर
प्रणालीत सुलभता आणि समानता येणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद
केलं.
****
दिव्यांग व्यक्तींविषयी सर्वंकष धोरण तयार करता यावं
आणि दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी परभणी इथल्या जिल्हाधिकारी
कार्यालयात काल एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात
आलं होतं. या चर्चासत्रास उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी एच बिबे
यांनी मार्गदर्शन केलं. भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या संयुक्त विद्यमानं
या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली पंचायत समितीच्या ६६,
सगरोळी निर्वाचक गण तसंच लोहा पंचायत समितीच्या ८३, मारतळा निर्वाचक गण आणि कुंडलवाडी
नगरपरिषद प्रभाग क्रमांक पाच ब साठी पोटनिवडणूक येत्या शुक्रवारी सहा एप्रिलला होणार
आहे. या क्षेत्रातल्या मतदारांना मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यात
आली आहे.
****
ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड
कोस्ट इथं होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ध्वजारोहण समारंभात काल
भारतीय क्रीडा पथक सहभागी झालं. मुष्ठीयुद्ध स्पर्धेत पाचवेळा जागतिक विजेतेपद
पटकवणारी मेरी कोम, भालाफेक क्रीडा प्रकारात भारताचं अशास्थान असलेली
नीरज चोप्रा ह्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उद्या
होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यानंतर गुरुवार पासून विविध क्रीडा
स्पर्धांना प्रारंभ होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment