Wednesday, 4 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 4 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक एप्रिल  २०१ दुपारी १.०० वा.

****



संसदेचं कामकाज आज विसाव्या दिवशीही सुरळीत होऊ शकलेलं नाही. कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळाच्या मुद्यावरून ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाच्या खासदारांनी दोन्ही सदनात हौद्यात उतरून केलेली घोषणाबाजी, तसंच तेलगु देशम, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस सह इतर पक्षांच्या खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तर लोकसभेचं कामकाज एकदा तहकूब झाल्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.



 लोकसभेत सकाळी कामकाज सुरू होताच, गदारोळ सुरू झाल्यानं, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अवघ्या काही मिनिटांत कामकाज तासाभरासाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर गदारोळ कायम राहिल्यानं अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.



 राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांना प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्याचं आवाहन केलं. आपण चर्चेची परवानगी देत आहोत, सरकार चर्चेसाठी तयार आहे, अशा परिस्थितीत सदनात चर्चा होऊ न देणं, ही लोकशाहीची हत्या असल्याचं मत सभापतींनी व्यक्त केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं, सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.



 त्यापूर्वी राज्यसभेच्या नवनिर्वाचित १२ सदस्यांना आज शपथ देण्यात आली, यामध्ये समाजवादी पक्षाच्या जया बच्चन, भाजपचे भूपेंद्र यादव, बीजू जनता दलाचे सौम्यराजन पटनाईक यांचा समावेश आहे.

****



 भारतातले इंधनदर संपूर्ण दक्षिण आशिया भागात तुलनेनं सर्वात जास्त असल्याचा दावा करत, काँग्रेस पक्ष पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्याच्या मागणीसाठी राज्यभरात लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती, काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. कर्जबुडव्या उद्योजकांची कर्जं सामान्य जनतेकडून वसूल करण्याच्या हेतूनं सरकार पेट्रोल आणि डिझेलवरचे कर वाढवत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

****

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता दहावीच्या गणिताच्या आणि इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्राच्या कथित पेपरफुटीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, मनुष्यबळ विकास मंत्रालयानं, मंडळाच्या परीक्षा घेण्याच्या पद्धतीची तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीनं परीक्षेची प्रक्रिया कशी सुरक्षित करावी, याबाबत ही समिती मार्गदर्शन करणार असून, येत्या एकतीस मे पर्यंत आपला अहवाल मंत्रालयाला सादर करणार आहे.

 दरम्यान, या मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची पुनर्परीक्षा घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. अशी पुनर्परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानंच निर्णय घ्यावा, न्यायालय यावर विचार करणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

****

 कॅथेटर, या वैद्यकीय उपकरणाच्या वापरासंबंधीचे नियम निश्चित करण्यासाठी राज्यसरकार केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी काल दिली. अनेक खाजगी रुग्णालयं कॅथेटरची अवाजवी किंमत रुग्णांकडून घेतात आणि कित्येक रुग्णालयं या कॅथेटर्सचा पुनर्वापर करतात, याकडे अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्ष वेधलं होतं, यासंदर्भात बापट यांनी ही माहिती दिली. कॉरोनरी स्टेंट सारख्या उपकरणांच्या किमतीबाबत केंद्रसरकारनं सीमा ठरवून दिली असली तरी इतर अनेक वैद्यकीय उपकरणांच्या किमतींवर काही नियंत्रण नसल्याचं नमूद करत, याबाबत, तसंच उपकरणांच्या पुनर्वापराबाबत सुस्पष्ट धोरण आणि मार्गदर्शक नियम निश्चित करण्यासाठी केंद्रसरकारशी चर्चा करणार असल्याचं बापट यांनी सांगितलं.

****

 परभणी जिल्ह्यातले हुतात्मा जवान शुभम मुस्तापूरे यांच्या पार्थिव देहावर उद्या गुरुवारी पालम तालुक्यात कोनेरवाडी या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. मुस्तापुरे यांचा पार्थिव देह एका विशेष विमानाने आज संध्याकाळपर्यंत औरंगाबादला पोहोचेल आणि त्यानंतर विशेष वाहनानं, पालम तालुक्यात कोनेरवाडी या त्यांच्या मूळगावी उद्या पहाटेपर्यंत पार्थिव देह पोहोचवण्यात येईल. सैन्य दलाच्या विशेष अधिकाऱ्याकडून ही माहिती देण्यात आली. काल जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मुस्तापुरे यांना वीरमरण आलं होतं.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...