Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 05 April 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०५ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.
*****
Ø औद्योगिक वसाहती
आणि वीज निर्मिती प्रकल्पांना धरणांचं पाणी दिलं जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
Ø दहावीचा नवीन
अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनुकूल – शिक्षणमंत्री विनोद तावडे
यांचं मत
Ø परभणी जिल्ह्यातले
शहिद जवान शुभम मुस्तापूरे यांच्या पार्थिवावर
आज कोनेरवाडी इथं अंत्यसंस्कार
आणि
Ø औरंगाबाद महानगरपालिका
अशास्त्रीय पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावत असल्याचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण
मंडळाचं खंडपीठात शपथपत्र
*****
औद्योगिक वसाहती आणि वीज निर्मिती प्रकल्पांना यापुढे
धरणांचं पाणी दिलं जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल केली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगर पालिकेच्या भारतीय जनता पक्ष
- राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. औरंगाबादच्या
दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रकल्पाला देखील धरणाचं पाणी दिलं जाणार नाही असं शासनाचं धोरण
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नगरपालिकांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प
शासनाकडे सादर करावेत असं सांगून, वैजापूर
नगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापनासाठीचा प्रकल्प सादर केल्यास, त्याला त्वरीत मान्यता
दिली जाईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
यंदा देशात नैऋत्य मोसमी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या
१०० टक्के इतका सामान्य असेल, अशी शक्यता, 'स्कायमेट वेदर' या खाजगी हवामान अंदाज संस्थेनं काल व्यक्त केली. जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी
पावसाची दीर्घकालीन सरासरी सुमारे ८८७ मिलीमीटर आहे. त्यामुळे मोठ्या देशव्यापी अवर्षणाची
किंवा अपुऱ्या पावसाची शक्यता नसल्याचं, या
संस्थेनं स्पष्ट केलं आहे.
जूनमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या १११ टक्के पाऊस होईल,
आणि हा पाऊस ९० टक्के सामान्य असण्याची शक्यता असल्याचं, या संस्थेनं म्हटलं आहे.
****
दहावीचा नवीन अभ्यासक्रम कृतीयुक्त, उपयोजनात्मक,
तसंच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनुकूल असेल, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे
यांनी म्हंटलं आहे. दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमासंबंधी काल मुंबईत आयोजित चर्चासत्रात
ते बोलत होते. येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं
बदलणार आहेत, या पुस्तकांचं प्रकाशनही तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. दहावीच्या
नव्या पुस्तकांत प्रत्येक पाठाला क्यू आर कोड देण्यात आला आहे, क्यू आर कोडच्या सहाय्यानं
ग्रामीण भागातले विद्यार्थीही इंटरनेटद्वारे जोडले जाणार असल्यानं, ही डिजिटल अभ्यासक्रमाच्या
वाटचालीची सुरुवात असल्याचं तावडे म्हणाले.
****
राज्यात आता सूक्ष्म, लघु आणि मध्यम अन्न प्रक्रिया
उद्योग उभारण्यासाठी वापरण्यात येणारी जमीन ही, औद्योगिक ऐवजी कृषी वापर जमीन गृहीत
धरण्यात येणार आहे. कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्यानं जाहीर
केलेल्या अन्न प्रक्रिया धोरणात सुधारणा करण्यासंदर्भात, अधिसूचना महसूल आणि जलसंपदा
विभागानं काल जारी केली. या अधिसूचनेनुसार
जलसंपदा विभागाच्या अखत्यारितल्या पाणीसाठ्याचा या उद्योगांना स्त्रोत म्हणून वापर
करावयाचा असल्यास, पाणी आरक्षणाच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही.
****
मल्टीप्लेक्स मध्ये विकण्यात येणाऱ्या पाणी आणि
अन्नपदार्थांच्या किंमती ठरवण्यासंबधी सहा आठवड्यात एक धोरण आखलं जाईल, अशी माहिती,
राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयाला दिली. या चित्रपटगृहां मध्ये विकलं जाणार
पाणी आणि अन्नपदार्थ, हे वाजवी पेक्षा जास्त किंमतीला विकले जातात, तसंच चित्रपट गृहांमध्ये
घरचे अन्न पदार्थ आणि पाणी नेऊ दिलं जात नसल्यानं, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते,
अशा आशयाच्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही माहिती देण्यात आली.
****
भारतातले इंधन दर संपूर्ण दक्षिण आशिया भागात तुलनेनं
सर्वात जास्त असल्याचा दावा करत, काँग्रेस पक्ष पेट्रोल आणि डिझेलला, वस्तू आणि सेवा
कराच्या कक्षेत आणण्याच्या मागणीसाठी, राज्यभरात लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती,
काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. कर्जबुडव्या उद्योजकांची कर्ज,
सामान्य जनतेकडून वसूल करण्याच्या हेतूनं सरकार पेट्रोल आणि डिझेलवरचे कर वाढवत असल्याचा
आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाचं पालकत्व
तहसिलदार स्वीकारणार असून, या कुटूंबियांची वारंवार भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवणार
असल्याचं, विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितलं. औरंगाबाद शहराजवळच्या
जटवाडा इथल्या, शेख शानुर शेख डोंगर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची
भापकर यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना
शासनाच्या कोण-कोणत्या योजनांचा लाभ देता येईल, यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी,
महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून विशिष्ट अर्ज भरुन घेत आहेत. हा
उपक्रम विभागीय आयुक्तांच्या पुढाकारातून तयार झाला आहे.
****
परभणी जिल्ह्यातले हुतात्मा जवान, शुभम मुस्तापूरे
यांच्या पार्थिवावर आज पालम तालुक्यात कोनेरवाडी या त्यांच्या मूळगावी सकाळी १० वाजता
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काल सायंकाळी या जवानाचं पार्थिव सेनादलाच्या
विशेष विमानानं औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर आणण्यात आलं. विमानतळावर मानवंदना
दिल्यानंतर ते परभणीकडे रवाना करण्यात आलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,
महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परवा जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून
झालेल्या गोळीबारात मुस्तापुरे यांना वीरमरण आलं होतं.
****
औरंगाबाद महानगर पालिके तर्फे कचऱ्याची विल्हेवाट
अशास्त्रीय पद्धतीनं होत असल्या संबधीचं शपथपत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काल दाखल केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्देशानुसार गठीत उच्चस्तरीय समितीच्या निर्देशानुसार कचरा विल्हेवाटीचं काम सुरू
आहे, आता शहरात तीसगाव, मिटमिटा, कांचनवाडी,
गांधेली इथं कुठेही कचरा टाकला जात नाही, असं शपथपत्रं औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे दाखल करण्यात आलं होतं.
याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा,
असे निर्देश खंडपीठानं दिले होते. प्रदूषण
नियंत्रण मंडळानं सादर केलेल्या, अहवालाच्या अनुषंगानं सुधारीत शपथपत्रं येत्या मंगळवारपर्यंत
दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला
दिले आहेत.
****
लातूर जिल्ह्यातली तूर आणि हरबऱ्यासाठीची दहाही आधारभूत
खरेदी केंद्र दोन दिवसात सुरू करण्याची मागणी लातूरच्या शेतकरी संघटनेनं राज्य पणन
संघाकडे केली आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नोंदणी केली
आहे, अशावेळी ही खरेदी केंद्रं जागेअभावी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचं
सांगत, ही खरेदी केंद्रं दोन दिवसात सुरू करण्याची मागणी संघटनेनं केली आहे.
****
जालना-खामगाव रेल्वे मार्गाला, शिवसेनेचा पाठींबा
असल्याचं, शिवसेनेचे जालना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितलं. रेल्वे संघर्ष
समितीच्यावतीनं जालना शहरातल्या गांधी चमन इथं काल धरणं आंदोलन केलं. यावेळी आंदोलनस्थळी
अंबेकर यांनी आंदोलकांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या मार्गामुळे मराठवाडा
उत्तरेकडच्या राज्यांना जोडला जाऊन व्यापार
वाढीसाठी, तर शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठी वेगवेगळ्या बाजार पेठा उपलब्ध होतील,
असं ते म्हणाले.
****
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत
पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातला गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून राज्य
शासन, मॅरिको इनोव्हेशन फाऊंडेशन आणि अंबाजोगाईची मानवलोक ही स्वयंसेवी संस्था, यांच्यातर्फे
संयुक्तपणे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात धरणातला पाच लाख घनमीटर
गाळ काढण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे.
****
जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातल्या बरवडा आणि
कर्णावळ गावाअंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ काल पाणीपुरवठा मंत्री बबनराव
लोणीकर यांच्या हस्ते झाला. विद्युत पुरवठ्या
अभावी या योजनेच्या कामांना विलंब होऊ नये यासाठी ५० टक्के सौर ऊर्जेचा वापर केला जाणार
असल्याचं लोणीकर यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.
****
उद्या आणि परवा मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाची
शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी
आपल्या कापलेल्या आणि इतर पिकांची काळजी घ्यावी, तसंच विजा चमकत असतांना झाडाखाली न
थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असंही या सूचनेत म्हटलं आहे.
दरम्यान राज्यात काल जळगाव इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक
सहा अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं ४१ पूर्णांक पाच, नांदेड
४० पूर्णांक पाच तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
*****
***
No comments:
Post a Comment